दिवाळी म्हटलं की, सर्वांत आधी आठवतात दिवे… बाजारात कितीतरी प्रकारचे दिवे आलेले आहेत. काचेचे, पितळेचे… चमचमणारे, रंगीबेरंगी खड्यांचे, लोलक लावलेले… लुकलुकणारे… शोभेचे नक्षीदार… हे असे अनेक दिवे मिळतात. ते घरी आणा आणि दारात, खिडकीत, गच्चीत, गॅलरीत लावा. त्यांच्या उजेडाने चैतन्य, आनंद घरभर पसरेल… दिवे हीच तर आपल्या दिवाळीची ओळख आहे!
आता यावर्षी अजून एक वेगळा उपक्रम करूया. या दिव्यांबरोबरच अंतरंगात एक ‘ज्ञान दिवा’ लावूया! नवं काही शिकूया… अगदी फार मोठी गोष्ट शिकायला पाहिजे, असे काही नाही. छोटीशी असली तरी चालेल. एखादी कला आत्मसात करून घेऊया… दारात रांगोळी काढून बघा… पूजेचे ताट सजवून बघा… त्यातही आनंद मिळतो. त्याच बरोबरीने सामाजिक भान राखून समाजासाठी जमेल तसे काम करूया.
हेही वाचा – नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व
आसपास जरा नीट बघितलं की, आपल्याला नवनवीन अनेक गोष्टी दिसतात, त्या जाणून घेऊया. आधुनिक नवविचारांचा, बदलांचा स्वीकार करूया. हळूहळू त्याची सवय होईल… आपण तसं केलं की, हा संदेश घरातील इतरांना समजेल. हा ज्ञान दिवा तेवत राहील… त्याचा अखंड उजेड पाडेल… आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटेवर… त्याच्या प्रकाशात चालणे सुखावह, आनंददायी आणि सुरक्षित असेल…
मनोनिग्रह, प्रयत्न, सातत्याने अभ्यास, सराव करत राहायचे…. की तेवढे तेल या दिव्याला पुरेसे आहे…
दिवाळी संपली तरी सुखावणारा हा ज्ञान दिवा आहे. म्हणूनच म्हटलेले आहे –
“दीपस्य प्रकाशः न केवलम् भवतः
गृहम् ऊज्वलायतु जीवनम् अपि”
तशीच एक छोटी ज्ञानाची पणती आपल्या हृदयात लावूया… आपलेच अंत:करण उजळणारी, शांतपणे तेवणारी… ही दिवाळीच्या चार दिवसांसाठी नाही तर, अखंड तेवत राहाणारी हवी. त्यासाठी जिव्हाळा, दया, माया, प्रेम, आपुलकीची स्निग्धता हवी… मगच ही पणती अखंड जळत राहील. त्यावर काजळी धरू नये, म्हणूनही काळजी घेऊया – आपल्याच शब्दांची! नाही तरी शब्दांचाच तर सारा खेळ असतो…
हा तेजाचा उत्सव आहे, आपल्याला प्रकाशाची आराधना करायची आहे. हो… पण त्याबरोबर दाराशी मंद उजेड देणारी साधीशी मातीची पणती लावूया… तीच तर आपले पाय भक्कमपणे मातीशी जोडून आपल्याला जमिनीवर ठेवते.
“दीपज्योती: परब्रम्ह दीप ज्योतिर्जनार्दनः
दीपोहरतो मे पापं दीपज्योतिर्नमोस्तुते”
हेही वाचा – आपला धर्म आणि संस्कृती
या दिव्याचं महत्त्व इतकं आहे की, या ज्योतीला प्रत्यक्ष परब्रम्ह मानलेले आहे. ती जणू काही परमेश्वर आहे म्हणूनच तिला नमस्कार करायचा. कारण ती मनातल्या पापाचा आणि अंधाराचा नाश करते. किती विशाल अर्थ सांगितला आहे आपल्या पूर्वजांनी!
मग या दिवाळीत लावाल ना, असा हा स्नेहदीप!
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा…


