झाली एकदाची सहामाहीची परीक्षा… अभ्यासातून पोरं मुक्त झाली… दिवाळीची सुट्टी सुरू. पोरांना खरे वेध लागले होते ते किल्ला बनवण्याचे… तशी त्यांची चर्चा आधीच सुरू झाली होती. शेवटचा पेपर झाला की, संध्याकाळी सोसायटीतल्या पोरांची गॅंग खाली जमली. चवथी ते सातवीतल्या छोट्या मावळ्यांबरोबर नववीतले सेनापती… दादा मदतीला होते.
दगड, माती कुठून, कशी आणि कोणी आणायची? याची खलबतं सुरू झाली. मुख्य लागणार होत्या विटा… मागच्या गल्लीत एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. मग त्यातल्या त्यात साध्याभोळ्या दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या दोन पोरांना या कामगिरीवर पाठवण्यात आले. ते दोघे अदबीने जाऊन तिथल्या सुपरवायझरच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले,
“काका एक रिक्वेस्ट होती. आम्हाला दिवाळीतल्या किल्ल्यासाठी विटा हव्या आहेत, मिळतील का? दिवाळीनंतर आम्ही परत करतो.”
काकांना हसू आले. ते गावाकडून आलेले होते… म्हणाले, “देतो की! पण अरे आता मातीच्या विटा नाहीत… या सिमेंटच्या आणि जड आहेत… त्या तुम्ही कशा नेणार?”
हेही वाचा – दिवे
“काका, ते आम्ही बघतो.”
ते म्हणाले, “तुम्हाला जमतंय का न्यायला… मग घ्या लागतील तितक्या विटा…”
कामगिरी फत्ते…
मुलं खुश. सायकली आणल्या… कॅरिअरवर दोन दोन विटा ठेऊन ते घेऊन आले. आसपास मिळतील तिथून दगड… किल्ल्याच्या बांधकामासाठी येत होते. छोट्या मावळ्यांना माती आणायला पाठवले जात होते. कोणी घरातून पोती आणली होती. तोपर्यंत अंधार पडायला लागला… आयांच्या हाका सुरू झाल्या… मातीने बरबटलेले शर्ट-पॅन्ट… पोरं तशीच घरी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच गॅंग परत खाली हजर! दोन दादांनी पन्हाळा किल्ल्याचा अभ्यास केला होता. यावेळेस तोच करायचा ठरला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम सुरू झाले… महाराजांचे सिंहासन तयार झाले. गडावर विहीर करणं अवघड व्हायला लागल्यावर पायथ्याला विहीर केली… पायऱ्या करताना अडचणी येत होत्या… बऱ्याच विचारांनंतर तोफेची जागा ठरली… दोन वाघ होते त्यांच्यासाठी गुहा करण्यात आली. मधेच दोन-चार जणांची बुरुज करण्यावरून भांडणं सुरू झाली. त्यांच्यात समझोता केला गेला… तहानभूक विसरून पोरं कामं करत होती.
“खरंतर, लाल मातीच्या चार विटा हव्या होत्या,” असं दादा म्हणाला. मग दोघांनी कोणालाही न विचारता शेजारच्या बागेतून विटा उचलून आणल्या…
“चोरी करणं पाप आहे. महाराजांना असे वागणे कधी आवडले नसते,” असं सांगून दादाने चोरून आणलेल्या विटा परत जागेवर नेऊन ठेवायला लावल्या. त्या दोन मुलांना रडूच आले…
किल्ला लवकर झाला तर अळीव पेरता येतील, म्हणजे नॅचरल लूक येईल, म्हणून दोन दिवस पोरं सतत कामं करत होती. किल्ल्याच्या डेकोरेशनची जबाबदारी मुलींना देण्यात आली. त्यांनी हिरव्या कागदाची झाडं तयार केली. मोठी कमान किल्ल्याच्या दरवाजापाशी लावली. गवळणी विहिरीजवळ ठेवल्या… ‘पन्हाळगड’ असं सुरेख अक्षरात कार्डबोर्डवर लिहून आणले. किल्ल्याच्या नावाची पाटी तयार होती… पण हा पन्हाळा वाटतोय की, नाही हे कळत नव्हतं. दादाला आयडिया सुचली तो म्हणाला,
“कोणी विचारलंच तर, ‘किल्ला अंडर कन्स्ट्रक्शन’ आहे, असं आपण सांगूयात…” मग तसंच सांगायचं ठरलं.
खाली गाव, घरं, रस्ता, झाडं-झुडपं भराभर तयार झाली. खरंतर मारुतीचं देऊळ करायचं होतं, पण मारुती कोणाकडे नव्हता. एकजण शंकराची छोटी मूर्ती घेऊन आला. ती मूर्ती डोंगरावर ठेवण्यात आली.
तटबंदी घालून झाली. पोरं आपण केलेल्या किल्ल्याकडे कौतुकाने बघत होती. घराघरातून मातीची खेळणी आणली गेली. किल्ला सजवला गेला. पहारा देणारे मावळे दोघांनी आणले होते…
“तुझ्यापेक्षा माझेच मावळे जास्ती शक्तिमान आहेत!” असा थोडा वाद त्यांच्यात झाला. पण गडाच्या संरक्षणासाठी चारही मावळे ठेवावे, असा निर्णय देण्यात आला.
हेही वाचा – अरे देवा…
“आपला किल्ला फार भारी झाला आहे. डोळ्यात तेल घालून त्याचे रक्षण करा…” दादांनी बजावले. त्यानुसार राखणीसाठी दोन दोन तासांच्या बॅच ठरवण्यात आल्या.
आता किल्ला फायनली पूर्ण झाला होता. मुलं प्रेमाने किल्ल्याकडे बघत होती. दादानी शिवाजी महाराजांना त्यांच्या सिंहासनावर बसवले. आनंदाने टाळ्या वाजवत सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला…
इतिहासातही असेच घडले असेल…
शिवाजी महाराजांचे प्रेम तसेच त्यांची शिकवण मुलांच्या मनात जागृत करणारा हा दिवाळीतला किल्ला बनवायला मुलांना प्रोत्साहन द्या. कारण तो नुसता किल्ला नव्हता. त्यातून मुलं खूप काही शिकत होती. नियोजन, एकता, मैत्री, प्रेरणा, काही वेळेस माघार घेणं, श्रमाची – कष्टाची आणि जबाबदारीची जाणीव, आपल्या जाज्वल्य इतिहासाचा अभिमान आणि अजून खूप काही…
यातूनच आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण त्यांना मिळत असते. मुलांना मातीत, चिखलात खेळू द्या… शिवरायांकडून थोडी स्फूर्ती घेऊ द्या… आवडीचा किल्ला बनवू द्या… आता तुम्हीही जोरात म्हणा की…
“छत्रपती शिवाजी महाराज की जय!”


