हल्ली गाणी ऐकणं फार सोप्पं झालंय. अनेक apps पैकी एकाची निवड करायची, जी हवी ती गाणी निवडायची आणि सुखेनैव ऐकत रहायची. असंख्य गाणी, अगदी क्षणात हजर… अगाध आणि अचाट किमया तंत्रज्ञानाची!
काल सहजच 80 च्या दशकातील गाणी ऐकत होतो आणि लता आणि SP यांच्या आवाजातलं, ‘हम बने, तुम बने’ हे गाणं सुरू झालं. क्षणार्धात मी काही दशकं ओलांडून मागे गेलो आणि ते दिवस अचानकच रुंजी घालू लागले मनात.
‘एक दुजे के लिये‘ हा खरोखरच एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. कोवळी रती अग्निहोत्री, दाक्षिणात्य रांगडेपणा मिरवणारा कमल हसन, त्यांची उमलणारी अनोखी प्रेम कहाणी आणि तिचा हृदयद्रावक अंत, हे सगळं काल पाहिल्यासारखं लख्ख आठवू लागलं…
मला आठवतंय, या सिनेमाची तेव्हा TV वर जाहिरात यायची आणि मी खुळावून जायचो. आमच्या घराजवळच माटुंग्याला ‘अरोरा‘ चित्रपटगृहात हा सिनेमा लागला आणि मग अनेक वर्षे तिथे तो ठाण मांडून बसला. प्रत्येक खेळ हाऊसफुल्ल गर्दीत चालायचा आणि चार ते पाच पटीने जास्त दरात काळ्या बाजारात तिकिटे विक्रीसाठी यायची. बसचा थांबा आला की, बस वाहक ‘चला एक दुजे के लिये‘ अशी हाळी द्यायचा. वेगळाच अनुभव होता तो.
हेही वाचा – तूप मेतकूट भात
सुरुवातीची गर्दी थोडी कमी झाल्यावर मग मी मित्रांसह चित्रपट बघितला आणि नंतर तो तब्बल दहा ते बारा वेळा बघितला. इकडून तिकडून जमवलेले पैसे असायचे, ते घेऊन मी आणि माझा मित्र परत परत तो बघायचो, असं गारुड मनावर झालं होतं.
‘हम बने, तुम बने एक दुजे के लिये’ या गाण्यातला मोटारसायकल स्टंट, ‘तुम हो बुद्धू मान लो’ या वाक्याला निरागसपणे मान झुकवणारा वासू आणि मग ‘you are handsome जान लो’ म्हणत त्याला आपलंसं करणारी सपना… रतीच्या दोन वेण्या, कमल हसनचा गॉगल आणि जाकीट, त्याचे उत्स्फूर्त अंगविक्षेप… ‘I want to dance and play’ म्हणत घसरगुंडीवर लोळणं, अगदी चपखल इंग्रजी ओळी, मोटारसायकलवर तिला पुढे बसवून घेण्याची करामत, सगळंच उत्स्फूर्त होतं… तेव्हा तमाम तरुणाई या जोडीच्या आकंठ प्रेमात बुडालेली होती.
स्थळ काळ विसरून, लिफ्ट मधेच थांबवून ‘मेरे जीवन साथी, प्यार किये जा’ म्हणत रती मदनाचा चंचल, अवखळ आणि बराचसा शृंगारिक आविष्कार आणि त्यात हरवून गेलेली, स्वतःला तिथे पाहणारी, बेभान झालेली अख्खी पिढी. गाण्यात गुंफलेली चित्रपटांची नावं…. पट अगदी झरझर सरकत होता.
समुद्र किनाऱ्यावर, संपूर्णपणे वाळूत गाडून घेतलेले वासू आणि सपना. कुत्रा येत असलेला बघून वासूने स्वतःला दिव्याच्या खांबाची दिलेली उपमा आणि मग त्या वाळूतच बोगदा करून सपनाला केलेल्या गुदगुल्या, सपनाच्या पोटावर फिरवलेला भोवरा आणि त्या वेळचा तिचा मुद्राभिनय निव्वळ जान लेवा! असे किती प्रसंग वर्णावेत?
‘हम तुम दोनो जब मिल जायेंगे’ म्हणत एक नवा इतिहास रचून स्वतःच्या विश्वात रमणारे प्रेमीजीव आणि त्यांची अनोखी कहाणी यांचं अधिराज्य होतं तमाम जनतेच्या मनावर कित्येक काळ, अविरत. मी ही त्याच लाटेत वाहणारा, डुंबणारा…
एकमेकांच्या बंधनात अडकलेले पण तरीही ‘तेरे मेरे बीचमे कैसा है ये बंधन… अंजाना’ म्हणणारे हे प्रेमीजीव म्हणजे आदर्श वाटायचे सगळ्याच युगुलाना. त्यांच्या आकंठ प्रेमाची गाथा खरोखर अनोखी होती. ‘आपडिया’ म्हणणारा वासू आणि खळाळून हसत ‘जैसे सब समज गया’ म्हणणारी सपना. काय भारी वाटायचं.
एकापेक्षा एक सरस गाण्यांचा कळसाध्याय म्हणजे ‘सोला बरस की बाली उमर को सलाम‘… लता आणि अनुप जलोटा, यांचं हे गीत म्हणजे प्रेमीयुगुलाच्या मूर्तिमंत विरह वेदना, डोळ्यात पाणी आणायच्या, काळजाला घरं पाडायच्या!
हेही वाचा –आजीचा मूलमंत्र… निपटून घ्या!
दाक्षिणात्य तडका, भिन्न संस्कृती आणि भाषांचा संघर्ष, लता आणि SP यांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर आणि यासोबत मादक रती आणि मला मदन भासे हा, असा कमल हसन, गोव्याचा निसर्ग, वेडावणारे समुद्र किनारे, अगदी सगळं सगळंच बेफाम जमून आलं होतं.
घरच्यांचा विरोध, विरह, गैरसमज आणि तरीही असलेली मिलनाची ओढ, भन्नाट गाणी आणि यातून उलगडत जाणारी ती अनोखी प्रेमकहाणी. आपण प्रेम केलं, तर ते अगदी असंच असावं… असं वाटायला लावणारी.
सुखांत पाहून निवांत घरी जाणाऱ्या प्रेक्षकांना या चित्रपटाचा शेवट म्हणजे जबर धक्का होता. असा सुन्न करणारा धक्का नंतर कयामत से कयामत तक, सैराट वगैरे चित्रपटांनी दिला. उत्फुल्ल प्रेम आणि त्याचा झालेला शोकात्म अंत बघून डोळ्यात आलेलं पाणी पुसत बाहेर पडणारा प्रेक्षक मी पाहिला आहे, कारण मीही त्यातलाच एक असायचो. याच काळात कित्येक प्रेमकथा पडद्यावर आल्या, पण ‘एक दुजे के लिये‘ म्हणजे मैलाचा दगड होता.
का कोणास ठाऊक, पण आजही ती रती, तो कमल हसन, ती गोव्याची रमणीयता आणि सपनाची कमनीयता अढळ आहे मनात ध्रुव ताऱ्यासारखी. ते कमनशिबी पण सर्वोच्च बलिदान देणारं युगुल, का कोणास ठाऊक पण चक्षूंसमोरून हलतच नाही आणि हलणारही नाही, कधीच.
आज ते गाणं ऐकलं आणि मन परत विदीर्ण झालं. सुखद आणि दुःखद क्षणांच्या हिंदोळ्यावर झुलतच बसलं. आठवणी, कधी मोहक तर कधी दाहक येतच राहणार. कसं थांबवणार त्यांना…..?


