होमिओपॅथी ही नियमांवर आधारित रोगचिकित्सा पद्धती आहे. तिचे नियम अतिशय साधे, सहज आणि सोपे आहेत. ते समजायला अजिबात अवघड नाहीत. होमिओपॅथीतील मूळ सिद्धांत म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं तर, ‘काट्याने काटा काढणं.’ हे आपण सिंकोनाच्या भागामध्ये पाहिलंच आहे.
पण याची सुरुवात कशी होते? आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो. निसर्गाचं निरीक्षण करतो, त्यातून निष्कर्ष काढतो आणि त्यानुसार गोष्टींची रचना करतो, त्या वापरण्याच्या पद्धती ठरवतो. निसर्गात वाहणारे पाण्याचे प्रवाह असोत किंवा लागणारी आग असो—अशा अनेक गोष्टींच्या निरीक्षणातून माणूस शिकत आला आहे. निसर्गात निर्माण होणारी आग पाहूनच माणूस आगीचा वापर करायला शिकला.
आपणही याच निसर्गाचा एक भाग आहोत. इतर प्राणी आणि वनस्पती यांच्याप्रमाणेच मानवही निसर्गाचाच एक घटक आहे. निसर्गाशी समतोल राखला, तरच आपलं आयुष्य सुखी होतं.
न्यूटनच्या आधी हजारो लोकांनी सफरचंद आणि इतर फळं खाली पडताना पाहिली होती. ही घटना घडतच होती. पण न्यूटनने जेव्हा ती पाहिली, तेव्हा त्याच्यातल्या चिकित्सक आणि संशोधक वृत्तीने त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून गुरुत्वाकर्षणाचा नियम समोर आला. त्याचप्रमाणे हॅनिमनने सिंकोनाच्या सालीवर प्रयोग केले आणि त्या निरीक्षणांतून होमिओपॅथीचा शोध घेतला.
हे समजायला अगदी सोपं आहे. आपल्या रोजच्या जीवनातही आपण अशा प्रकारच्या तत्त्वांचा वापर करतो.
होमिओपॅथीचा सिद्धांत असा सांगतो की एखादा पदार्थ आपल्या शरीरावर क्रिया करतो, तेव्हा तो एक प्रकारची छाप सोडतो. ही छाप दूर करण्यासाठी अशा पदार्थाचा वापर केला जातो, ज्याची शरीरावर तत्सम छाप निर्माण करण्याची क्षमता असते. हॅनिमनच्या मांडणीनुसार, या दुसऱ्या प्रभावामुळे पहिला प्रभाव दूर होतो आणि माणूस बरा होतो.
हे ऐकायला थोडं कठीण वाटेल. म्हणून रोजच्या जीवनातली काही उदाहरणं घेऊया.
आपण एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी गेलो, तर तिथला दुर्गंध आपल्या घ्राणेंद्रियांवर प्रभाव करतो. अशा वेळी आपण अगरबत्ती लावतो. तिचा सुगंध जाणवू लागला की दुर्गंधाचा प्रभाव कमी होतो.
सकाळी सूर्य उगवतो, तेव्हाही आकाशात तारे आणि चंद्र असतातच. पण सूर्याच्या प्रकाशामुळे ते निष्प्रभ ठरतात. अशा प्रकारची अनेक उदाहरणं हॅनिमनने दिली आहेत.
हेही वाचा – Homeopathy : मटेरिया मेडिकाची पार्श्वभूमी
युद्धाच्या वेळी सैनिकांमध्ये वीरश्री संचारावी म्हणून ढोल, ताशे आणि इतर रणवाद्यं वाजवली जात. ढोलताशांचा अनुभव आपल्याला गणपतीच्या वेळी चांगलाच आला आहे. विद्यानंद बापट नावाच्या एका पुणेरी माणसाने ही रणवाद्यं आहेत, असा मुद्दा मांडून त्यांचा आवाज कमी करायला लावला. त्याचा नफा-नुकसान हा भाग वेगळा! पण त्यांनीही ही गोष्ट स्पष्टपणे मांडली की दुंदुभी आणि नगारे ही रणवाद्यं आहेत; त्यांचा उद्देश अंगात वीरश्री संचारवणं हा आहे.
या रणवाद्यांच्या नादाने अंगात वीरश्री संचारते आणि माणूस युद्धाला तयार होतो. त्याचबरोबर युद्धातले भयावह आवाज आणि आक्रोश यांचा प्रभाव कमी होऊन भीतीही कमी होते.
आपल्या आयुष्यात भावनांच्या बाबतीतही आपण काही गोष्टी अनुभवतो. एखादी व्यक्ती आपल्यावर चिडली आणि आपणही तिच्यावर चिडलो, तर रागात आणखी भर पडते. पण हॅनिमनने असं म्हटलेलं नाही की एखादा तुमच्यावर चिडला, तर तुम्हीही त्याच्यावर चिडा. रागाचा मुकाबला संयमाने आणि शांततेने करा. समोरचा चिडला, तर तुम्ही साधं स्मितहास्य द्या. कधीकधी त्या स्मितहास्याने त्याचा रागही काही क्षणांत शांत होतो.
हिंसेला अहिंसेने उत्तर, रागाला प्रेमाने उत्तर आणि द्वेषाला प्रेमाने उत्तर—अशा प्रकारे एका प्रभावाला दुसऱ्या प्रभावाने शांत करण्याची उदाहरणं आपल्या रोजच्या जीवनात दिसतात. याच निरीक्षणांशी होमिओपॅथीच्या तत्त्वाचा संबंध जोडून हॅनिमनने आपली मांडणी केली.
आता औषधांच्या प्रयोगांकडे वळूया. आपण पाहिलेलंच आहे की एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात माणसाला दिला, तर त्याच्यामध्ये काही लक्षणं निर्माण होतात. होमिओपॅथिक औषधांचे प्रयोग जेव्हा निरोगी माणसांवर केले गेले, तेव्हा त्यांना कोणती स्वप्नं पडली, खाण्यापिण्याच्या कोणत्या इच्छा झाल्या, शरीराच्या कोणत्या भागात दुखलं किंवा खुपलं—या सगळ्या गोष्टी हॅनिमनने नोंदवल्या.
हेही वाचा – Homeopathy : औषधी ज्ञानाचा इतिहास
या नोंदींमधूनच त्यांनी आपला मटेरिया मेडिका लिहिला. म्हणूनच ते त्याला ‘मटेरिया मेडिका प्युरा’ म्हणतात.
आता समजा, ‘क्ष’ नावाचं एक औषध आहे. निरोगी माणसाला ते दिल्यावर त्याला पोटशूळ होतो आणि उलटीची भावना निर्माण होते. हॅनिमनच्या तत्त्वानुसार, अशीच लक्षणं असलेल्या रुग्णाला तेच औषध योग्य मात्रेत दिलं, तर त्याचा पोटशूळ आणि उलटीची भावना कमी होते.
इथे औषधाची मात्रा आपण नियंत्रित करू शकतो. पण नैसर्गिक रोगकारकाचा—उदाहरणार्थ, विषाणूचा—शरीरावर होणारा परिणाम आपण औषधाच्या मात्रेप्रमाणे नियंत्रित करू शकत नाही.
म्हणून हॅनिमनच्या मांडणीनुसार, रोगासारखीच लक्षणं निर्माण करण्याची क्षमता असलेलं औषध योग्य मात्रेत वापरून त्या रोगाचा प्रभाव दूर करता येतो. यालाच आपल्या साध्या भाषेत म्हणतात—‘काट्याने काटा काढणं.’


