लेखिका विभावरी शिरुरकर यांचा ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला, तेव्हा मराठी साहित्य विश्वात सतत चर्चा झाली आणि यावर संमिश्र प्रतिक्रियांचा कल्लोळ उठला. त्या काळात स्त्रीचे इतके मोकळे वास्तववादी लेखन अपेक्षित नव्हते. टीकेची झोड उठणार याची कल्पना असल्यामुळे प्रकाशकांनी लेखिकेबद्दल गुप्तता बाळगली. कथासंग्रहाची प्रस्तावना श्रीधर व्यंकटेश केतकरांनी लिहिली आहे. ते लिहितात, “या लेखिकेला ते ओळखत नाहीत, कधी भेटले नाहीत, तिच्याबद्दल काही माहिती नाही.” ते पुढे म्हणतात, “स्त्रीलेखिका म्हणून ज्या काळात कौतुक वाटून चांगले अभिप्राय द्यावयाचे, तो काल आता संपत आला आहे, असे मी गृहीत धरतो आणि प्रस्तुत प्रसंगी मी जे लिहित आहे, ते अभिनव लेखिकेस उत्तेजनासाठी नसून लेखनाच्या क्षेत्रात प्रविष्ट झालेल्या व्यक्तीचे यथागुण स्वागत व्हावे, या भावनेने लिहित आहे.” हे वाक्य फार महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी लेखिकेला स्त्री असल्याचा खास दर्जा न देता समान मानले आहे.
मालतीबाई बेडेकर यांनी विभावरी शिरुरकर या टोपण नावाने हे पुस्तक लिहिले. मालतीबाईंनी याबद्दल इतकी गुप्तता बाळगली होती की, खुद्द त्यांचे पती, विश्राम बेडेकरांना सुद्धा सांगितले नव्हते. याचे गंमतीशीर वर्णन विश्राम बेडेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे.
एकोणीसाव्या शतकात ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष तुलना नावाचा निबंध लिहिला होता, ज्याने खळबळ उडवून दिली होती. तसेच या कथासंग्रहामुळे झाले. ‘मराठी कथा’ हा विषय अभ्यासणाऱ्याला या पुस्तकाची दखल घ्यावीच लागते. माझ्याकडे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे. आईने मराठीत एम.ए .करताना विकत घेतलेले, जीर्ण झालेले पुस्तक… ज्याची पाने आता फाटू लागली आहेत, ते आहे.
हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता
स्त्रियांच्या कथा सोज्वळ, पारंपरिक असण्याच्या त्या काळात, या कथा बंडखोर वाटल्या आणि होत्याच. स्त्रीने सरळ टोकदार शब्दात इतके कटू अनुभव सांगून दु:ख प्रकट केलेले नव्हते. तसे करणे समाजमान्य सुद्धा नव्हते. स्त्री ही पत्नी, माता, बहीण यापलीकडे जाऊन ती एक व्यक्ती असते आणि ती नक्कीच देवता वगैरे नाही, हे या कथांनी दाखवून दिले. सगळ्या कथा स्वगत स्वरुपातल्या आहेत.
‘बाबांचा संसार माझा कसा होईल?’ ही गाजलेली कथा! घरातली सर्वात मोठी कमावती सुशिक्षित मुलगी वडिलांचा संसार सांभाळते, लहान भावंडाना मोठे करते आणि अविवाहित राहते. तिने हेच करावे, त्याग करावा ही तिच्याकडून केवळ अपेक्षा नसते, तर बंधन असते. याचबरोबर एका कथेत ती मुलगी स्वत:च अविवाहित राहण्याचा निर्णय घेते. वडिलांनी तिच्या विवाहाचा विचार केला म्हणून कृतज्ञ असते. ती म्हणते, मी आत्ता लग्न करणे म्हणजे माझ्या कुटुंबाला भर समुद्रात नावेने नेऊन वल्ही काढून घेण्यासारखे आहे.
‘रिकाम्या भांड्यांचे निनाद’ या कथेत ती स्वतःच्या चंचल मनोवृत्तीला दोष देते. एक सुसंपन्न स्थितीतली नायिका गरीब बुद्धिमान मुलावर प्रेम करते, वडिलांचा रोष पत्करते. पण नंतर त्या मुलाच्यात जे बदल घडतात, त्यामुळे ती त्याला नाकारते.
हेही वाचा – बनगरवाडी… लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी
आवडत्या पुरुषाशी विवाह होऊ शकत नाही, तेव्हा नायिकेला पतीबरोबरचा संसार कोरडा वाटतो. परजातीच्या मुलाशी विवाह ठरवल्यावर कुटुंबाने पाठ फिरवल्यामुळे नायिकेला दु:ख होतं, तर दारुड्या नवऱ्याबरोबर राहून आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा सुखी होण्याचा मार्ग शोधला, तर समाजाची पर्वा का करायची? असा प्रश्न विचारणारी नायिका त्या काळाच्या बरीच पुढे होती. पती परमेश्वर किंवा पदरी पडले ते पवित्र मानायचे… या प्रथांना ती नाकारते. या सगळ्या नायिकांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजांची जाणीव आहे, त्यामुळे एका कथेत ‘नायकावरचे प्रेम प्लॅटोनिक आहे,’ असे म्हणताना तिला वास्तवाची जाणीव होते.
आता स्त्रियांनी लिहिलेल्या कथा अधिक बोलक्या, मोकळ्या, क्रांतीकारक (उत्क्रांतीकारक?) आहेत. त्यामुळे या कथा वाचून आश्चर्य वाटत नाही, पण काळाची चौकट पाहिली तर, लेखिकेच्या धाडसाचे कौतुक करावेसे वाटते. सध्याच्या स्त्री लेखिकांनी मोठा पल्ला गाठला आहे. स्त्रियांनी विपुल प्रमाणात लेखन केलं आहे आणि तेही साहित्याच्या सर्व प्रकारांत. त्यानंतरच्या काळातल्या लेखिकांच्या कथा अधिक बंडखोर, सामाजिक बंधने झुगारून देऊन लिहिल्या गेल्या. त्यांना बळ देण्याचं, भक्कम पाया देण्याचं काम या कथासंग्रहाने केलं आहे. या लहानशा पुस्तकावर इतक्या समीक्षा झाल्या, इतके लिहिले गेले की, त्याचेही एक वेगळे पुस्तक आहे. ‘कळ्यांचे नि:श्वास’ समाजाला ऐकायला भाग पडणार्या या कथा नक्कीच वाचायला हव्यात.


