पेपर वाचता वाचता निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर राजची नजर एका जाहिरातीवर खिळली…
“हरवले आहेत. सापडवून द्यायला मदत कराल का? संपर्क क्रमांक…”
जाहिरात वाचून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“अजबच आहे! हरवले आहेत म्हणे! पण फोटो नाही, नाव नाही, वय नाही, पत्ता नाही! मग शोधायचं तरी कसं आणि कोणाला?”
त्याने लगेच जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन लावला.
“हॅलो, मी राज बोलतोय. तुमच्या जाहिरातीसंदर्भात फोन केला आहे. कोण हरवलंय?”
“आपण कृपया या पत्त्यावर याल का? प्रत्यक्ष भेटल्यावर सगळं सांगते.”
राजने पत्ता लिहून घेतला. राज नुकताच पोलीस खात्यातून निवृत्त झाला होता. त्यामुळे एखादं गूढ प्रकरण सोडवायला मिळणार, या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता उमटली… दिलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. एका उच्चभ्रू सोसायटीतला तो सुंदर बंगला होता. दार उघडताच सावित्रीबाईंनी त्याचं स्वागत केलं.
“या, या सर!”
“बरं, सांगा. कोण हरवलंय? नाव, वय, फोटो वगैरे काही आहे का?”
“सदानंद. वय अठ्ठावन्न.”
“फोटो?”
“फोटो कशाला? मी तुमची त्यांच्याशी भेटच करून देते.”
“ते हरवले कधी होते? कधी सापडले? आता ते तुम्हाला सापडले आहेत तर मी निघतो.”
हेही वाचा – आंधळा मागतो एक डोळा…
“थांबा ना! आधी माझं सगळं ऐकून तर घ्या.”
सावित्रीबाईंच्या आवाजातली अगतिकता राजच्या लक्षात आली.
“तीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. सदानंद एका नामांकित आयटी कंपनीत मॅनेजर होते. गेली तीस वर्षं त्यांनी त्या कंपनीत प्रामाणिकपणे काम केलं. तीन महिन्यांनी ते निवृत्त होणार होते.”
“मग?”
“लॉकडाऊनमुळे सदानंद घरूनच काम करत होते. रोज ऑनलाइन मीटिंग्ज, प्रोजेक्टचं काम, टीम मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण एके दिवशी सकाळी त्यांना त्यांच्या मॅनेजरचा ई-मेल आला…”
“काय म्हटलं होतं त्यात?”
“तुम्ही काम करत असलेला प्रोजेक्ट बंद झाला आहे, त्यामुळे कंपनीला आता तुमच्या सेवेची आवश्यकता नाही.”
“काय? फक्त एका ई-मेलवर? तीस वर्षांच्या सेवेचा असा शेवट?”
“ना आधी चर्चा, ना निरोप, ना कुणाचा फोन… ज्या कंपनीसाठी आयुष्य घालवलं, तिथून एका क्षणात बाहेर! विशेष म्हणजे ईमेल आला, नातं तुटलं… पण नंतर साधा फोनही नाही!”
सावित्रीबाईंचा आवाज कातर झाला.
“दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले. आंघोळ केली, फॉर्मल कपडे घातले, लॅपटॉप सुरू केला. पण स्क्रीनवर कंपनीचा लॉगइनच येईना. ते बराच वेळ प्रयत्न करत राहिले. शेवटी माझ्याकडे वळून म्हणाले, ‘सावित्री, तीस वर्षं ज्या कंपनीचा पासवर्ड लक्षात ठेवला, त्या कंपनीने एका क्षणात मला बाहेर टाकलं!’”
राज शांतपणे ऐकत होता.
“तेव्हापासून त्यांच्यात खूप बदल झाला. सकाळी उठतात, तयार होतात, लॅपटॉपसमोर बसतात आणि मग लक्षात येतं की आता कामच नाही. कधी ते जुन्या सहकाऱ्यांना फोन लावतात; पण समोरून प्रतिसाद मिळाला नाही की, शांतपणे फोन ठेवतात. ज्यांच्या एका फोनवर संपूर्ण टीम कामाला लागायची, तेच आता कोणाच्या तरी फोनची वाट पाहत बसतात. कधी स्वतःशीच बोलतात, तर कधी तासन्तास खिडकीत बसून राहतात, खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, औषधं घ्यायलाही विसरतात. कधी बराच वेळ खोलीतून बाहेर पडत नाहीत. घरात असूनही ते कुठेतरी हरवले आहेत. मला माझे पूर्वीचे सदानंद परत हवे आहेत.”
राज काही क्षण विचारात पडला. पोलीस खात्यात असताना त्याने अनेक हरवलेल्या माणसांचा शोध लावला होता, पण या प्रकरणात माणूस घरातच होता आणि तरीही तो हरवला होता!
“मी प्रयत्न करतो,” एवढंच तो म्हणाला.
घरी आल्यावर नेहा म्हणजे राजच्या मुलीने विचारलं, “बाबा, आज कुठल्या गुन्हेगाराला पकडून आलात?”
“गुन्हेगार नाही. एक माणूस हरवल्याची जाहिरात पेपरमध्ये वाचली, त्याबद्दल माहिती घ्यायला गेलो होतो.”
“कधी हरवला? कुठे हरवला?” नेहाने विचारलं.
“हरवला नाही, घरीच आहे!”
“काय? मग पेपरमध्ये जाहिरात कशाला दिली? काही षडयंत्र तर नाही ना?”
राज हसला… त्याने नेहाला सगळी हकीकत सांगितली.
“बाबा, मला एकदा सावित्रीकाकूंना भेटायचं आहे. त्यांचा नंबर आणि पत्ता देता का मला?”
दुसऱ्याच दिवशी नेहा सावित्रीबाईंना भेटायला गेली. सदानंदांच्या कामाबद्दल, अनुभवाबद्दल आणि तांत्रिक कौशल्याबद्दल तिने सावित्रीबाईंकडून माहिती घेतली.
“काकू, मला काही करता येतं का ते पाहते. पण त्यासाठी खर्च मोठा येऊ शकतो.”
सदानंद माणसांत परत येणं हे सावित्रीबाईंसाठी खूप मोठं होतं. म्हणून त्या म्हणाल्या, “चालेल. मला मान्य आहे; पण मांत्रिक-तांत्रिक यावर माझा विश्वास नाही.”
“नाही, नाही. असं अजिबात नाही. मी जे करेन ते खूप वेगळं असेल; पण काय ते विचारू नका आणि माझ्याबद्दल तसेच पैशांबद्दल कोणाशीही बोलू नका.”
हो म्हणण्याखेरीज दुसरं काय होतं त्यांच्या हातात?
काही दिवसांनी सदानंदांच्या घरी एक कुरिअर आलं. त्यात एका कंपनीचं ऑफर लेटर होतं.
पद : सीनियर टेक्निकल मॅनेजर.
काम : तांत्रिक मार्गदर्शन, प्रोजेक्ट रीव्ह्यू आणि टीमला सल्ला.
कामाचा कालावधी : दररोज एक तास, तीन महिन्यांसाठी
मानधन : रुपये 1 लाख महिन्याला
सदानंदांनी पत्र दोन-तीन वेळा वाचलं…
“सावित्री, बघितलं का? मला नोकरीची ऑफर आली आहे!”
“तुम्ही अजून उत्तम काम करू शकता, हे त्यांना कुठून तरी कळलं असेल!”
“पण रोज फक्त एक तास? आणि एवढं मानधन?”
“तुमच्या तीस वर्षांच्या अनुभवाची किंमत आहे ती, तुम्ही किती वेळ देता त्याची नाही. आता जास्त विचार न करता जॉइन व्हा!”
सदानंदांनी ऑफर स्वीकारली.
सदानंद पहिल्या दिवशी व्हिडीओ मीटिंगसाठी तयार झाले. त्यांनी परीटघडीचा फॉर्मल शर्ट घालून टाय लावला. सावित्रीबाई त्यांना पाहून म्हणाल्या,
“अहो, आज किती दिवसांनी तुम्ही असे टाय लावून तयार झालात!”
‘मीटिंगची वेळ झाली,’ असे म्हणत त्यांनी लॅपटॉप उघडला आणि व्हिडीओ कॉलवरील मीटिंगला ते मोठ्या उत्साहात बसले.
कॉलमध्ये तीन तरुण मुली होत्या.
“गुड मॉर्निंग सर!”
सदानंदांना खूप दिवसांनी कुणीतरी ‘सर’ म्हटलं होतं. ते मनापासून हसले.
“गुड मॉर्निंग! चला, आधी एकमेकांचा परिचय करून घेऊ आणि मग काम सुरू करूया.”
मुली त्यांना प्रश्न विचारत आणि सदानंद सोप्या भाषेत समजावून सांगत. कधी एखादी चूक दाखवत, तर कधी एखाद्या नव्या कल्पनेचं कौतुक करत. सदानंदांचे मॅनेजर राजसुद्धा अधूनमधून मीटिंगला उपस्थित राहत असत.
एका मीटिंगमध्ये राज म्हणाले,
“सदानंद सर, काल तुम्ही दिलेली सूचना खूप महत्त्वाची होती. आमचा बराच वेळ वाचला.”
“मला सर कशाला म्हणता?”
“नाही सर, तुमचा अनुभव आणि विद्वत्ता हे दुर्मीळ आहे. तुम्ही म्हणजे ज्ञानकोश आहात, गुरू आहात म्हणून तुम्हाला सर म्हटलंच पाहिजे.”
सदानंद खूश झाले. शेवटी प्रशंसा कोणाला आवडत नाही?
हळूहळू सदानंदांच्या वागण्यात बदल होऊ लागला. सकाळी उठून ते मोठ्या उत्साहात तयार होऊ लागले. कामाच्या वेळेची वाट पाहू लागले. घरात पुन्हा आनंदी वातावरण पसरले. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. खर्च मोठा आहे असं सांगणाऱ्या नेहाने अजून पैसे मात्र मागितले नव्हते… सदानंदांची नोकरी सुरू होऊन महिना पूर्ण होत आला होता. एक दिवस नेहाचा फोन आला.
“काकू, पुढच्या दोन दिवसांत 1 लाख पाठवाल का? मी अकाऊंट डिटेल्स पाठवते.”
सावित्रीबाई विचारात पडल्या, “नवऱ्याला पुन्हा उभं करण्याच्या नादात आपण कुणाच्या तरी जाळ्यात तर अडकत नाही ना?”
रक्कम मोठी होती; पण नाईलाज होता. त्यातल्या त्यात चांगलं म्हणजे पैसे रोख द्यायचे नव्हते. सावित्रीबाईंनी पैसे पाठवले; पण तरीही मनात शंकेची पाल चुकचुकली होती, हे नक्की.
महिना संपला आणि सदानंदांच्या खात्यात मानधन जमा झाले. सदानंद आता त्यांच्या कोशातून बाहेर पडले होते आणि कामात खूश होते.
पुढच्या महिन्यात नेहाची भूक वाढली आणि तिने अधिक रकमेची मागणी केली. नेहाने 1 लाख 10 हजार मागितले आणि नाईलाजाने सावित्रीबाईंनी दिलेसुद्धा.
हेही वाचा – वाणाचा ताण
सदानंदांचं काम सुरळीत चालू होतं आणि आता कामाचा शेवटचा महिना होता… नेहाने 6 लाख 30 हजारांची मागणी करताना सांगितलं की, हा शेवटचा हप्ता. सावित्रीबाईंनी रक्कम कमी करायचा प्रयत्न केला; पण नेहाने त्याला स्पष्ट नकार दिला. सावित्रीबाईंनी नाईलाजाने तिची मागणी पूर्ण केली. त्यानंतर सावित्रीबाईंनी दोनदा नेहाला फोन केला; पण “मी खूप कामात आहे,” असं सांगून तिने बोलणं टाळलं. त्यामुळे सावित्रीबाईंच्या मनात नेहाविषयी शंका उपस्थित होऊ लागली.
सदानंद आता अगदी पूर्वीसारखे कामात रमले होते. त्यांच्या कामाचा आता अवघा एक आठवडा बाकी होता. रोजचे कॉल्स चालू होते.
राज म्हणाला, “सर, उद्या तुमच्या अमूल्य मार्गदर्शनाचा शेवटचा दिवस. पहिल्या 10 मिनिटांत काही शंका असल्यास विचारू आणि नंतर समारोपाचे दोन शब्द. उद्याच्या कॉलमध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तींनाही मी आमंत्रित करतो.”
सदानंद खूश झाले… “माझी सौभाग्यवती उद्याच्या कॉलमध्ये असेल,” असं त्यांनी सांगितलं.
सावित्रीबाई नटूनथटून कॉलमध्ये सामील झाल्या. कॉलमध्ये राज आणि नेहाला पाहून त्यांना आश्चर्य वाटले… नेहा सदानंदांच्या टीममधील मेंबर होती, तर राज त्यांचे मॅनेजर होते. नेहा आणि इतरांनी सदानंदांच्या मदतीची प्रशंसा केली. राजने सदानंदांसह सावित्रीबाईंचेही आभार मानत सांगितले,
“सदानंद सर, तुम्ही आलात आणि आमचं कामच बदलून गेलं. तुमचा अनुभव, तुमची शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा आम्हाला खूप काही शिकवून गेली. खरं सांगायचं तर, तुम्ही आमचे मार्गदर्शकच नाही, तर आमचे गुरू आहात.”
सदानंदांचे डोळे पाणावले.
राज पुढे म्हणाला, “तुमच्यामुळे कंपनीचा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला म्हणून कंपनीतर्फे तुम्हाला पाच लाख एकावन्न हजार रुपयांचा विशेष बोनस देण्यात येत आहे. तुमच्या या महिन्याच्या मानधनाबरोबरच बोनसची रक्कमही तुमच्या बँक खात्यात पाठवली आहे.”
सदानंदांनी मोबाइलवर बँकेचा मेसेज पाहिला. पैसे जमा झाले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
“राज साहेब, तुम्ही मला फक्त काम दिलं नाही, तर माझा आत्मविश्वास परत दिलात. अनेक वर्षं नोकरी केली, पण इतका सन्मान कधीच मिळाला नव्हता. मनापासून धन्यवाद!”
“सदानंद सर, मला एक विनंती करायची आहे,” नेहा म्हणाली.
“काय?” सदानंदांनी विचारले.
“तुमचा समृद्ध अनुभव पुस्तकरूपात साऱ्या जगासमोर आणा. तो लक्षावधी तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शक ठरेल. माणसाची नोकरी एक दिवस संपते, पण त्याच्या अनुभवाची किंमत कधीच संपत नाही!”
“नक्की,” सद्गदित होत सदानंद म्हणाले.
त्या रात्री सदानंद खूप आनंदात होते. त्यांनी सावित्रीबाईंना सांगितलं…
“सावित्री, आज मला पुन्हा असं वाटतंय की, मी कोणीतरी आहे. माझी कोणाला तरी गरज आहे आणि विशेष म्हणजे नेहाने मला उर्वरित आयुष्यासाठी चांगला मार्ग दाखवला.”
त्यांचा हात हातात घेत सावित्रीबाई म्हणाल्या,
“तुम्ही नेहमीच कोणीतरी होता. फक्त तुम्हाला ते पुन्हा जाणवण्याची गरज होती. तुम्ही लिहा, तुमचं पुस्तक इतरांना मार्गदर्शन करेल, नवी पिढी घडविण्याचं सत्कार्य तुमच्याकडून होईल.”
दुसऱ्या दिवसापासून सदानंद पुस्तक लिहिण्याच्या कामात व्यस्त झाले.
सावित्रीबाईंनी बंगल्यासमोरच्या बागेतून नेहाला फोन करून कृतज्ञता व्यक्त करत विचारलं, “पोरी, काय बक्षीस देऊ मी तुला?”
“काकू, एक नव्हे दोन बक्षिसं हवीत मला.
पहिलं बक्षीस — या नाटकाबद्दल काकांना कधीही समजू देऊ नका.”
“नाटक?” सावित्रीबाईंनी आश्चर्याने विचारलं.
“हो काकू, माझ्या बाबांना आणि मैत्रिणींना बरोबर घेऊन मी नाटक रचले.”
“मानलं तुला! दुसरं बक्षीस माग,” सद्गदित होत सावित्रीबाई म्हणाल्या.
“दुसरं बक्षीस — तुमचा आशीर्वाद द्या मला.”
हेही वाचा – संशय
सावित्रीबाईंचे डोळे पाणावले. “नेहा, तू माझ्याकडे पैसे मागितलेस, तेव्हा मला तुझा संशय आला. मागच्या आठवड्यात 6 लाख 30 हजार देताना तर मला खूप भीती वाटली आणि निरोप समारंभाच्या कॉलमध्ये तुला आणि तुझ्या बाबांना बघितल्यावर मला तुझे शब्द आठवले, “काकू, मला काही करता येतं का ते पाहते, पण त्यासाठी खर्च मोठा येऊ शकतो.” तीन महिने चाललेल्या या नाटकासाठी तुला खूप खर्च आला असेल. निदान तो तरी घे. शिवाय, तू तर माझ्याकडून घेतलेल्या पैशांपेक्षा 11 हजार रुपये सदानंदांना जास्त दिलेस!”
“काकू, मी मानसशास्त्रात संशोधन करतेय. मी जे केलं तो माझ्या संशोधनाचा भाग होता आणि त्याचा सर्व खर्च मला विद्यापीठाने दिला आहे. मला खात्री आहे की लवकरच मला पीएच.डी. मिळेल. पदवीदान समारंभाला मी तुम्हाला नक्की बोलावीन फक्त तुम्हालाच! कारण या नाटकाचा नायक असलेल्या सदानंद काकांना या नाटकाबद्दल कधीच कळता कामा नये!”
एक मात्र खरं—
लॉगआऊटने हरवलेलं मन
पुन्हा नव्याने फुललं
नाटकातील री-लॉगइनने
आयुष्यात सुख बहरलं


