आम्ही भावंडं लहान असताना दरवर्षी उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीत आजोळी धामापुरला जायचो. इतर मावश्या आणि मावस भावंडं पण यायची. खूप धम्माल असायची. रात्री जेवणं आटोपली की सर्व आया आणि आम्ही भावंडं आत्या आजीच्या वाणशीत गजाली करीत बसायचो. या कथा, कीर्तनातून बऱ्याच अस्सल मालवणी म्हणी आणि वाक्प्रचार आम्हा मुलांना समजायचे.
सीता मंदोदरी तारा
त्यात माझे गोदले सारा
त्या संभाषणातील हे मला हल्ली वारंवार आठवतं. कोकणात नावाचे अपभ्रंश केले जातात. म्हणजे.. अनंतला ‘अंतू’, मकरंदला ‘मक्या’… माझी आत्या आजी ज्याला “रे रवळनाथा!” असं प्रेमाने भारदस्त नावाने हाक मारायची त्याचं तर खरं नाव रवींद्र होतं, कशाला कसं रूप देतील ते सांगताच येणार नाही. गोदावरीचं पिटकू रूप होतं ‘गोदा’ आणि काव्यात सुकर होण्यासाठी झालं गोदला!
सीता, मंदोदरी अशा पाच पवित्र कन्या मानल्या जातात. त्यांच्याच पंक्तीला माझ्या गोदलाला पण बसवा. ती पण त्याच योग्यतेची आहे, तिला पण तेवढाच सन्मान द्या… असा त्याचा अर्थ.
हेही वाचा – लग्नाळू लेक, पालक आणि सुजाण संवाद
सहज महाजालात घुसले तेव्हा कळलं की या काव्यात पाठभेद आहेत
1) अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकन्या: स्मरेनित्यं महापातकनाशनम्
अर्थ स्पष्ट आहे : या पवित्र कन्यांचं सदैव स्मरण केल्यास सर्व पापांचा नाश होतो.
इथे विवाहित स्त्रियांचा ‘कन्या’ असा उल्लेख केलेला असल्याने थोडा संभ्रम वाटतो. दुसरा पाठभेद आहे –
2) अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा
पंचकं ना स्मरेनित्यं महापातकनाशनम्
इथे कन्या ह्या शब्दाचा उल्लेख नाही. पंचक = पाचांचा समुदाय आणि ना = मनुष्य
त्यामुळे अर्थ होतो : मनुष्याने या पाचांच्या समुदायाचं नित्य स्मरण करावं, कारण हे मोठ्या पापांचाही नाश करणारं आहे.
3) यात सीताच्या जागी कुंती आहे .
अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा, मंदोदरी तथा
पंचकं ना स्मरेनित्यं महापातकनाशनम्
इथे कवीच्या किंवा त्या काळाच्या उदार मनाचा प्रत्यय येतो. यात उल्लेख केलेल्या सर्व स्त्रिया विवाहित आहेत. प्रत्येकीचा एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध आलेला असूनही त्यांना पवित्र आणि संस्मरणीय असं स्थान दिलं आहे. हे संबंध छल, कपट, लग्न किंवा स्वसंमतीने घडलेले असावेत, त्यांचा निष्पापपणा सौहार्दाने जाणला आहे.
हेही वाचा – कावळेदादा चिऊताईची कथा… पण आधुनिक!
यातील अहिल्या, तारा, मंदोदरी या रामायण काळ म्हणजे त्रेतायुगाशी संबंधित आहेत. कुंती, द्रौपदी या सासू-सून महाभारत काळातील म्हणजेच द्वापरयुगातील. या पाची स्त्रियांना अक्षत कुमारी मानतात.
काही परंपरांनुसार या पंचकन्या म्हणजे पंच महाभूते आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश… कलियुगाच्या आधी माणूस कसा होता, त्याची विचार करण्याची पद्धत कशी होती, त्याची समजशक्ती, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, या सगळ्यांवर या काव्यपंक्तींमुळे प्रकाश पडतो.
हे सर्व माझ्यापर्यंत पोहोचलं ते माझ्या चौकसपणामुळे. धामापूरच्या गजाली मधील ‘त्यात_माझे_गोदले_सारा” यामुळे!


