समोर वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या सुवासिनींकडे ती खिडकीतून लक्ष देऊन पाहात होती. या दिवशी ती घराबाहेर पडत नसे. आजूबाजूच्या स्त्रियांच्या नजरा ती टाळू शकत नव्हती… तसा तिचा आणि त्याचा फारसा संबंध कधीच आला नव्हता. ते लग्न म्हणजे दोघांसाठीही एक तडजोड होती!
तेव्हा ती तारुण्याच्या मस्तीत होती. “प्रेम करावे तर असे!” असे म्हणत ती एका तरुणाच्या प्रेमात पडली. मग ती इतकी वाहवत गेली की, पाळी चुकल्यानंतरच तिला वास्तवाचे भान आले. अगदी एखाद्या हिंदी चित्रपटासारखेच! अर्थात, हे समजताच तो तरुण पळून गेला आणि तिच्या वाट्याला आल्या शिव्या, मारहाण आणि अपमान…
अबॉर्शनसाठी ती एका डॉक्टरकडे गेली; पण तिथूनही तिला नकार मिळाला. हताश होऊन ती खाली असलेल्या हॉटेलमध्ये कॉफी प्यायला शिरली. तेव्हाच समोर हा येऊन बसला. त्याच्याकडे पाहून ती तिरस्काराने नजर वळवणार, इतक्यात तो हसला… तिने त्याच्याकडे रागाने पाहिले.
“स्वतःला सती-सावित्री समजू नका हो… कुठून आलात, ते मला माहीत आहे,” तो छद्मीपणे म्हणाला.
ती संतापून काही बोलणार, तेवढ्यात त्याने हात वर करून तिला थांबवले.
“मला शिव्या देऊन तुमचा प्रश्न सुटणार असेल, तर दिवसभर शिव्या घाला.”
ती शांत बसली. खरंच, पुढे खूप त्रास होणार होता. मग याच्यावर राग काढून काय उपयोग?
हेही वाचा – पुण्यकर्म
“माफ करा. पण तुमची अवस्था मला माहीत आहे. तो डॉक्टर माझा मित्र आहे. माझी एक ट्रीटमेंट सुरू आहे. त्यानिमित्ताने या परिसरात आलो की, मी त्याला भेटायला येतो. आज तुम्हाला पाहिलं… तुम्ही मला आवडलात. तुमची केस फार पुढे गेली आहे, हेही कळलं. पण यावर उपाय काय? आत्महत्या की कुमारी माता? आणि माता झाल्यावर पुढे काय? नोकरी आहे का? घर आहे का? की ‘आजचा दिवस माझा’ या तत्वावर जगणार?”
आता तिलाही त्याचे बोलणे विचार करण्यास भाग पाडत होते. खरंच, पुढे काय, हे तिलाच माहीत नव्हते. आत्महत्या करण्याची हिंमत तिच्यात नव्हती आणि घरच्यांकडून माफी मिळण्याची शक्यताही नव्हती.
“मग तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?” तिने तिरकसपणे विचारले.
“का नाही? तुमची इच्छा असेल तर नक्की,” तोही त्याच टोनमध्ये म्हणाला.
तिचा रागाने फुललेला चेहरा पाहून तो पुन्हा म्हणाला,
“एक डील करू या… विचार करा… मला कॅन्सर आहे. मी फार तर काही वर्षांचा सोबती आहे. चांगली नोकरी आहे; पण या आजारामुळे कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नाही. कोण करेल माझ्याशी लग्न?”
त्याचा प्रश्न ऐकून ती हादरली.
“काहीतरीच काय?” ती म्हणाली.
“का? मी चांगला शिकलेला आहे, चांगली नोकरी आहे आणि मुख्य म्हणजे माझ्याशी लग्न केलंत, तर तुम्हाला घर मिळेल, होणाऱ्या बाळाला नाव मिळेल आणि माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला नोकरीही मिळेल.”
“हा सगळा माझा फायदा झाला, पण त्यातून तुला काय मिळेल? माझ्यावर हे उपकार का?” तिने रोखून विचारले.
तो हसला.
“वाटलंच होतं, हा प्रश्न येणार! हे बघ, मी मरणारच आहे, हे नक्की. मग मरण्यापूर्वी संसाराचं सुख का उपभोगू नये? माझाही संसार असावा, तडजोड करून का होईना, पण एक बायको असावी, असं मला वाटू नये का? पण एखादी अडचणीत असलेली मुलगीच माझ्याशी लग्न करेल. मी अशाच मुलीच्या शोधात होतो. तुझा फॉर्म चोरून वाचला…. मुलाला जन्म देण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही… म्हणूनच मी तुला विचारलं. नवरा-बायको म्हणून नाही, तर मित्र म्हणून राहू. तुझ्या बाळाला नाव, तुला स्थैर्य आणि मला संसार मिळेल. बघू या, किती वर्षे टिकतो ते!”
असं म्हणत त्याने हात पुढे केला. क्षणभर विचार करून तिने त्याच्या हातात आपला हात दिला…
त्यांचे लग्न दोन्ही घरच्यांच्या पचनी पडले नाही. पण त्याची कल्पना असल्यामुळे त्याने आधीच दुसरी खोली घेऊन ठेवली होती. त्यामुळे फारसा त्रास झाला नाही.
काही महिन्यांनी सोनुलीचा जन्म झाला. आपलीच मुलगी असल्याप्रमाणे त्याने सर्वांना बर्फी वाटून आनंद साजरा केला… त्यानंतर ती त्याच्या जवळ कधी आली, हे तिलाच कळले नाही!
हेही वाचा – गोष्ट दोन प्रवाशांची…
दोन वर्षांनी त्याच्या आजाराच्या खुणा शरीरावर दिसू लागल्या, तेव्हा ती हादरली. सत्य माहीत असूनही ते स्वीकारणे तिला जड गेले. पण आता तिची पाळी होती. कंबर कसून तिने त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली.
सहा महिन्यांतच तो तिला सोडून गेला… पण दिलेल्या शब्दाप्रमाणे आपली नोकरी आणि घर तिच्या नावावर करून गेला!
तो जिवंत असेपर्यंत तिला कधी वटपौर्णिमेचे व्रत करण्याची गरज वाटली नव्हती. पण आज तिला वाटत होते —
“हाच पती मला पुढच्या सात जन्मी का लाभू नये?”
ती उठली. मनाशी काहीतरी ठाम निर्णय घेऊन ती समोरील वडाच्या दिशेने निघाली…


