अधिक मासानिमित्त घसघशीत वाण मिळण्याची शक्यता असलेल्या असंख्य भाग्यवान जावईबापूंची मनस्वी क्षमा मागून…
पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात सदानंद आणि सावित्रीबाई राहत होते. दोन एकर शेती होती. वेळेत पाऊस पडला तर पीक, नाहीतर कर्ज. आयुष्यभर कष्ट करून आणि तणावात राहून त्यांनी संसार उभा केला होता. तीन मुलींपैकी दोन मुलींची लग्नं झाली होती. धाकटी नेहा अजून कॉलेजला शिकत होती. मोठ्या मुलींचे सणवार, नेहाचं शिक्षण, शेतीचा खर्च… सगळ्याचा ताळमेळ घालताना सदानंदांना नाकीनऊ येत होतं.
तीन वर्षांनी येणारा अधिकमास आला. महिलावर्गात चर्चा सुरू होती — “मुलींच्या लग्नानंतरच्या पहिल्या अधिक मासाला हात आखडता न घेता लावलेलं वाण फार पुण्याचं असतं.”
सावित्रीबाईंनी ठरवलं — दोन्ही मुली आणि जावयांना यथोचित वाण द्यायचं.
“सावित्री, वाण दे पण आपल्या परिस्थितीचा विचार करून! उगीच मोठेपणा करू नकोस,” सदानंद म्हणाले.
“मोठेपणा नाही… अहो, मान आहे जावयांचा आणि मुलींचा.”
शेवटी सदानंदांनी पंचवीस हजारांचं कर्ज काढलं. दोन्ही मुली-जावई आले. घरात गडबड, हशा, गप्पा सुरू झाल्या. सावित्रीबाईंनी जावयांसाठी शर्ट-पॅंट घेतले. मुलींसाठी साड्या घेतल्या. भरमसाठ बिल भरताना सदानंदांच्या हाताला अक्षरशः कंप सुटत होता.
हेही वाचा – दिसलीस तू फुलले ऋतू…
आता पंचवीसातले फक्त दोन हजार रुपये उरले होते. पण सावित्रीबाई अजून शांत नव्हत्या.
“सोनं दिलंच पाहिजे.”
“अगं, पुरे आता,” सदानंद जवळजवळ विनवणी करत म्हणाले, “आपण कुठून उभे करणार पैसे?”
“पहिला अधिक आहे.”
त्या एका वाक्यापुढे सदानंद गप्प झाले. त्यांनी पुण्यातील ओळखीच्या सराफाला फोन केला. सराफ म्हणाला, “तुम्ही घ्या काय हवे ते, पैसे दोन-तीन महिन्यांनी द्या.”
सावित्रीबाई दुकानात गेल्या आणि काय योगायोग, तिथे त्यांना शाळेतील मैत्रीण रीना भेटली. रीना पुण्यात सुखात होती. तिचा नवरा इंजिनीअर… गाडी, फ्लॅट, नोकरचाकर सगळं होतं. लहानपणी गावात सगळे म्हणायचे, “रीना भारी आहे… पण सावित्री लई भारी आहे.”
मात्र, आता परिस्थिती उलटी होती.
रीनाने हसत विचारलं, “काय, इकडे कशी?”
“अगं, अधिक महिना ना… दोन्ही लेकी आणि जावयांना वाण द्यायचं आहे म्हणून आले इथे.”
“अय्या, खरंच! मलाही माझ्या दोन राजकन्या आणि जावयांना वाण द्यायचं आहे. मी दोघींना एकेक तोळ्याच्या बांगड्या आणि जावयांना एकेक तोळ्याच्या अंगठ्या घेणार आहे. तू काय घेणार?”
“प्रतिष्ठा… प्रतिष्ठेचा प्रश्न… मीही सेम टू सेम घेणार,” सावित्रीबाई ठसक्यात म्हणाल्या.
“मी आलेच,” म्हणत सावित्रीबाई दुकानाच्या मालकाला भेटल्या…
“भाऊजी, एक विनंती आहे.”
“बोला वहिनी.”
“गुप्त दानाचं पुण्य जास्त असतं असं म्हणतात. त्यामुळे मला वस्तू कुणालाही दाखवायच्या नाहीत. मी सांगते ते सगळं बॉक्समध्ये पॅक करा.”
सराफ गालातल्या गालात हसला, म्हणाला…
“जसं सांगाल तसं.”
रीनाचा निरोप घेत सावित्रीबाई समाधानाने घरी परतल्या. आज त्यांनी तिची बरोबरी केली होती.
वाण देण्याचा कार्यक्रम झाला. मुलींनी आणि जावयांनी आदराने बॉक्स स्वीकारत सदानंद आणि सावित्रीबाईंना वाकून नमस्कार केला.
“बॉक्स घरी गेल्यावर उघडा,” सावित्रीबाईंनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुली आणि जावई आपापल्या घरी निघून गेल्यावर घर सुनंसुनं वाटत होतं.
सायंकाळी फोन वाजला. मोठ्या मुलीच्या सासूबाई फोनवर होत्या,
“कौतुक फक्त तुमच्या मुली-जावयाचंच का? आम्ही कोणीच नाही का तुमचे? पण एक मात्र खरं, वाण छान दिलंत. हॅट्स ऑफ टू यू.”
थोड्याच वेळात धाकट्या मुलीच्या सासूबाईंचा फोन…
“अहो, इतकं सुंदर आणि कल्पक वाण! मनापासून धन्यवाद.”
सदानंद आणि सावित्रीबाई खूश झाले. शेवटी प्रशंसा कोणाला आवडत नाही?
तेवढ्यात सदानंदांच्या मोबाईलवर मेसेज आला. सराफ मित्राचा…
“सदा, बिल — 7,05,200 रुपये. आरामात दे.”
सदानंदांच्या हातातून मोबाईल खाली पडला.
“सावित्रीऽऽ… सात लाख?”
सावित्रीबाई मात्र शांतपणे म्हणाल्या,
“आपल्याच मुली-जावई आहेत…”
“पण एवढे पैसे कुठून आणायचे?”
क्षणभर शांतता पसरली.
“होईल हो व्यवस्था. का काळजी करता?”
सदानंद पुटपुटले, “सावित्री, माझ्यासमोर दोनच मार्ग आहेत… शेती विकायची किंवा अवयव विकायचे!”
“कोणाचे?” सावित्रीबाईंनी विचारले.
“माझे,” सदानंद म्हणाले.
“ठीक आहे, मग हरकत नाही,” सावित्रीबाई म्हणाल्या.
सावित्रीबाई पुढे म्हणाल्या,
“शेती विकू नका, राहू द्या. आपल्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. जास्त कष्ट करून पैसे साठवू. पुढच्या अधिकाला अजून मोठं दान करता येईल. तोपर्यंत नेहाचंही लग्न झालेलं असेल त्यामुळे खर्च वाढेल.”
सदानंदांना गरगरायला लागलं…
“सावित्री, बीपीची गोळी दे… एक नाही, दोन दे.”
हेही वाचा – आभास… की वास्तव?
सावित्रीबाई म्हणाल्या, “मी माझ्या एका ओळखीच्या माणसाला फोन करते. ते लगेच मेसेज करतील.”
“अगं, पण औषध कोण आणेल?”
“त्यांचा मेसेज दोन-तीन वेळा वाचल्यावर बीपी आपोआप नॉर्मल होईल, औषध घ्यायला लागणार नाही,” सावित्रीबाई म्हणाल्या.
सावित्रीबाईंनी फोन केला.
पुढच्याच क्षणी मेसेज आला. सदानंदांनी मेसेज दोन-तीनदा वाचला आणि काय आश्चर्य! सदानंदाचं टेंशन कमी झालं, चेहरा हसरा झाला, बीपी नक्कीच कमी झालं असावं!
का? कसं? असा काय मेसेज होता तो?
मेसेज होता —
“क्षमस्व. लिहिताना चूक झाली. बिल 7,05,200 रुपये नाही. फक्त 5,200 रुपये.”
सदानंदांनी मोठा श्वास घेतला.
“सावित्री… आता खरं सांग. हे काय आणि कसे?”
सावित्रीबाई मंद हसल्या,
“प्रतिष्ठा जपायची होती. म्हणून रीनाला सांगितलं — ‘तू तुझ्या मुलींना जे देतेस, तेच मीही देते.’”
“मग?”
“तुमच्या मित्राला सांगितलं, प्रत्येक बॉक्समध्ये चांदीची लक्ष्मी टाका आणि मी लिहिलेल्या चार ओळी.”
“म्हणजे, त्यात सोनं नव्हतंच?”
“नव्हतं.”
सदानंद अवाक् झाले.
“सावित्री, आज मला तुझा अभिमान वाटतो. पण त्या चार ओळी काय होत्या गं?”
सावित्रीबाईंनी मोबाइलमधील त्या स्वरचित ओळी ऐकवल्या —
‘सोनं अंगावर घातलं तर शोभतं, पण ते जपत जगावं लागतं…
म्हणून आम्ही सोन्याऐवजी संस्कार दिले, कारण संस्कार लपवावे लागत नाहीत…
ते आचरणातून आपोआप दिसतात!
आमच्या अल्पमूल्याच्या अधिकमासाच्या वाणामागील प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद मात्र अमूल्य आहेत. आपण या वाणाचा मोठ्या मनाने स्वीकार करून आम्हाला उपकृत करावे, ही नम्र विनंती…’
(कथेचा विषय सूचविल्याबद्दल गणेश भदाणे, चांदवड, जिल्हा नासिक यांचे विशेष आभार.)


