अन्नाची नासाडी आणि वाया गेलेले अन्न यातसंदर्भात हल्ली बऱ्याच पोस्टस् समाजमाध्यमांवर फिरत असतात. खरोखरच ही अक्षम्य नासाडी बघून, मन विषण्ण होतं होतं. भारतातील कित्येक लोकांच्या नशिबात एक वेळचंही जेवण नसताना, असं काहीतरी होणं अत्यंत लाजिरवाणं आहे,
या पोस्टस् बघत असताना नेहमीच मला माझ्या आजीचा ‘निपटून घ्या‘ हा कोकणस्थी मंत्र आठवतो. हा मंत्र खरंतर सगळ्यांनी आठवावा आणि आळवावा, अशी या मंत्राची महती आहे. एकत्र जेवायला बसलेलं असताना पातेल्यातला किंवा कुंड्यातला पदार्थ संपला, की जे काही त्यात उरलं सुरलं असेल ते ‘निपटून घ्या’ असं पालुपद आजी सारखं लावायची.
म्हणजे काय तर पातेल्यात आमटी उरली असेल, तर त्यातच भात कालवायचा, म्हणजे आमटीचा कण न कण शोषला जायचा भातात आणि मग तो भात निपटून घ्यायचा, अगदी प्रत्येक शित.
हेही वाचा – पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी
लोणी कढवल्यानंतर तूप बरणीत ओतून ठेवायचं आणि त्याच बेरीच्या पातेल्यात भात शिजवायचा, किंवा तुपाच्या लोटीतलं तूप संपलं की त्यात गरम वरण ओतायचं, म्हणजे तुपाचा छोटा अंशही उपयोगात यायचा आणि पदार्थाला काहीतरी एक वेगळीच खुमारी यायची. भाजी संपल्यावर कढल्यात पोळी फिरवून ती पुसून घ्यायची, म्हणजे एक कणही वाया जायचा नाही भाजीचा, अशी तिची ‘निपटून घ्या‘ संस्कृती.
टूथपेस्ट संपत आली की, त्यावर लाटणं फिरवून जेवढी पेस्ट काढून घेता येईल तेवढी काढून घेणं, किंवा साबणाची वडी संपत आली, की ती नव्या वडीला अगदी बेमालूमपणे चिकटवणं, हे अगदी अंगवळणी पडलं होतं तिच्या. पाहुणे येऊन गेले, की त्यांना प्यायला दिलेलं पाणी उरायचं भांड्यात. ते उष्टं पाणी आवर्जून झाडात ओतलं जायचं. हल्ली या वृत्तीला लोकं हसतात, किंवा कवडीचुंबक म्हणून हिणवतात, पण यातून तिची आस्था दिसायची, चराचरावर असलेली!
कुणी निंदा, कुणी वंदा, तिची अढळ श्रद्धा होती तिच्या विचारांवर आणि तत्त्वांवर. ठाम असायची तिची मतं!
दूध संपल्यावर दुधाच्या पातेल्यात कोरडी कणिक घालून ते पातेलं पुसून घ्यायचं आणि मग ती कणिक पोळ्यांसाठी वापरायची! अगदी, चहाचा चोथासुद्धा धुवून, त्यातला साखरेचा अंश काढून, वाळवून, तिने आस्थेने लावलेल्या झाडांना खत म्हणून वापरायची ती.
फाटलेल्या, जीर्ण झालेल्या तिच्या सुती लुगड्यांच्या चौघड्या तर अशा सुंदर आणि मायेने ओथंबलेल्या असायच्या, की त्या पांघरता क्षणी तिचा सुरकुतलेला हातच अंगावर फिरतोय असा भास व्हायचा आणि मग त्या मायेच्या जाणिवेनेच गाढ झोप लागायची.
हलाखीत काढलेल्या बालपणामुळे असेल कदाचित, पण वाया जाणारा प्रत्येक कण आणि क्षण व्यथित करून जायचा तिला आणि तो वाचवण्यासाठी आटापिटा करायची ती. Resource Conservation किंवा Resource optimization, हे आजचे परवलीचे शब्द नव्हते तिच्या शब्दकोषात, पण ते शब्दश: जगायची ती तिच्या रोजच्या जगण्यातून!
तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेल्यानंतर तर गंमत असायची. भाजी किंवा इतर पदार्थ हॉटेलचा माणूस वाढायचा ताटात आणि मग ते वाढून संपल्यावर, तिचं लक्ष त्या माणसाच्या हातात असलेल्या भांड्याकडे जायचं. बराच ऐवज त्या भांड्याला चिकटलेला असायचा आणि तिची घालमेल होत राहायची नुसती. आम्ही दटावायचो तिला डोळ्यांनीच, पण काहीतरी वाया जातंय आणि आपण ते निपटू शकत नाही, वापरू शकत नाही, याची तिला कोण खंत असायची.
हेही वाचा – तूप मेतकूट भात
विनोदाचा भाग सोडला, तरी तिची त्या अन्नावरची श्रद्धाच दिसून यायची, विचारातून आणि कृतीतून. आज तोच जुना विचार आणि तोच जुना आचार सर्वांनीच अंगीकारावा, असं मनोमन वाटत राहतं, सगळ्याचीच नासाडी टाळण्यासाठी.
आज आपण समृद्ध झालो, अपार मुबलकता आली, कशाचीही ददात म्हणून नाही उरली, तरीही आपण सगळ्यांनीच जपायला हवा तो मंत्र, ‘ निपटून घ्या’.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना पाठवलेल्या उपदेशपत्रात समर्थ रामदास स्वामींनी देखील “समय प्रसंग ओळखावा। राग ‘निपटून ‘काढावा। आला तरी कळों न द्यावा। जनांमध्यें।” या ओळीत ‘निपटून घेणे‘ हा शब्द, अगदी लीलया वापरला आहे. अर्थात, त्याचा संदर्भ वेगळा आहे, पण कृती आणि आशय तोच आहे – ‘निपटून घ्या‘!


