बल्लाळच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात बोलायला म्हणून मी उभा राहिलो खरा, पण काय बोलायचं ते काही सुचेचना. काही क्षण असेच गेले नि:शब्द आणि मी बोलता झालो…
मित्रांनो,
तुम्हाला सर्वांना माहीत आहे की, तो कायम घाईत असायचा. घड्याळात सव्वापाच वाजले की, दहा मिनिटांत सगळं आवरून तो ऑफिसबाहेर पडायचा 5:59ची बदलापूर लोकल पकडायला. सकाळी 8:30-8:35 दरम्यान आपल्या टेबलावर हजर असायचा तो. बाजूलाच ठेवलेल्या गणपतीच्या फोटोजवळ जास्वंदीचे फूल ठेऊन नमस्कार करायचा आणि लगेच कामाला सुरुवात! गेली कित्येक वर्षे हा नित्यक्रम त्याचा वरिष्ठ म्हणून मी बघत आलो होतो.
शिस्तबद्ध आणि नाकासमोर चालणारा माणूस. ऑफिसमध्ये काम करता करता अधूनमधून होणाऱ्या गप्पा, लंच टाइममधली मस्ती, मजा आणि गॉसिपिंग कशाकशात त्याचा सहभाग नसायचा. डबा खाऊन झाल्यावर हात धुऊन तो परत आपल्या जागेवर जायचा.
पण कामात अतिशय हुशार आणि वाकबगार. तक्रार करायला सुईएवढी देखील जागा ठेवायचा नाही. प्रचंड घाईत तो त्याची कामं चोखपणे पूर्ण करायचा. साहेब लोकांचा लाडका. कमीतकमी वेळेत काम कसं करावं, याबद्दल त्याचे विचार तो ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्त करत असल्याने कारकून असून देखील त्याला खूप मान होता, हे तुम्ही सगळे जाणता. कामात काही अडलं, प्रश्न उभा राहिला की, आपसूकच प्रत्येकाच्या तोंडून त्याचं नाव बाहेर यायचं, संकटमोचक म्हणून.
हेही वाचा – दु:ख विसरायला लावणारे कॅडबरी चॉकलेट
त्याचं हे घाईघाईने जगणं इतक्या लवकर संपेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मी त्याला खूपदा याबाबत विचारायचो… तो नेहमी हसून म्हणायचा, एवढी काय घाई आहे? मग सांगेन कधीतरी… पण ती वेळ दुर्दैवाने आलीच नाही.
गेल्या आठवड्यात सांत्वनासाठी म्हणून बदलापूरला त्याच्या घरी गेलो असता, या घाई मागचं खरं कारण कळलं आणि पायाखालची जमीन सरकली. बल्लाळला एक धाकटा भाऊ आहे, जो जन्मतः मतीमंद आहे. सुरुवातीला त्याला घरीच सांभाळलं. पण जसजसं त्याचं वय वाढत गेलं, तसतसं त्याचं सगळं घरी करणं कठीण होत गेले. शेवटी नाईलाजाने त्याला विशेष मुलांच्या आश्रमात ठेवले. बल्लाळचा त्याच्या भावावर खूप जीव होता. 5:59ची गाडी पकडून बदलापूर स्टेशनवर उतरून तो रोज एका हॉटेलात हिशोबाचे काम करायचा आश्रमाचा खर्च थोडाफार भरून काढण्यासाठी!
आपला भाऊ सर्वसाधारण आयुष्य जगू शकत नाही म्हणून बल्लाळने देखील मौज, मजा, मस्तीपासून अलिप्त रहायचा निर्णय घेतला होता. तो कधी याबाबत मनमोकळेपणाने बोलला असता तर, त्याच्या भावावर होणाऱ्या खर्चाबाबत मॅनेजमेंटतर्फे किंवा इतर कुठल्याही ट्रस्टच्या माध्यमातून त्याला आर्थिक मदत करता आली असती. ‘एवढी काय घाई आहे, सांगेन कधीतरी,’ असं म्हणून त्याने कायम वेळ मारून नेली.
हेही वाचा – बेसनाचे लाडू… माँची आठवण
गेल्याच महिन्यात आश्रमात भावाचा त्रास प्रमाणाबाहेर वाढला म्हणून आश्रमातील मर्यादित जागेमुळे व्यवस्थापनाने बल्लाळच्या मागे त्याच्या भावाची दुसरीकडे सोय करण्यासाठी तगादा लावला होता. तोच मानसिक त्रास त्याला बहुतेक झेपला नाही आणि झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.
मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे चढउतार असतात. पण कधीच या गोष्टी आपल्यापाशी ठेवू नका. तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना त्या हक्काने सांगा. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार करता येतो. उपलब्ध पर्यांयांवर चर्चा करता येते. आर्थिक मदतीच्या दृष्टीने चाचपणी करता येते. पण यासाठी महत्त्वाचे आहे, ते तुम्ही आपलं मन कोणाजवळ तरी मोकळे करणे! अशा गोष्टीमध्ये वेळ फार महत्त्वाची असते, हे कधीच विसरू नका.
एवढी काय घाई आहे, मग सांगेन… असं म्हणत आजचं सांगणं उद्यावर ढकलू नका. काय माहीत हा उद्या कधी येतच नाही आणि मग एक दिवस…


