वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥ कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥73॥ म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥74॥ मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥75॥ तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥76॥ म्हणोनि सहजे सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥77॥ तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥78॥ आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥79॥ ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥80॥
हेही वाचा – Dnyaneshwari : परी शस्त्र आतां न धरिजे…
अर्थ
जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली, तेव्हा अर्जुन असे बोलला. (पण) मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले. ॥69॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणातात) किंवा विचार केला असता मला असे वाटते की, ही मोहाची लहर नाही, तर दुसरेच काही असावे. (ते दुसरे हे की) महामोहरूपी काळसर्पाने त्याला ग्रासले असावे. ॥70॥ मर्माचे स्थान जे हृद्यकमल, त्या ठिकाणी करुणारूपी भर सांजवेळेला, (ऐन दुपारी) त्या महामोहरूपी काळसर्पाने त्याला दंश केला म्हणून या लहरी उतरतच नाहीत. ॥71॥ त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपाकटाक्षानेच विषाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीहरी, अर्जुनाच्या हाकेला धावून आला. ॥72॥ तशा त्या व्याकूळ झालेल्या अर्जुनाशेजारी गारुड्यासारखा श्रीकृष्ण शोभत होता; तो आपल्या कृपेच्या बळाने (त्याचे) आता लीलेने रक्षण करील. ॥73॥ हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे, असे मी म्हटले. ॥74॥ ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा, त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता, असे समजा ॥75॥ ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे अर्जुन दु:खाने जर्जर झाला होता ॥76॥ म्हणून जात्याच अत्यंत सावळा आणि कृपामृतरूप जीवनाने युक्त असा तो श्रीगोपाळरुपी महामेघ (अर्जुनाकडे) वळला. ॥77॥ (श्रीकृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी) सुदर्शनाचे तेज हीच जणू काय चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय. ॥78॥ आता तो उदार (श्रीकृष्ण मेघ) कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल, आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ॥79॥ हे पाहा. ती कथा समाधानवृत्तीने ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥80॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता…
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://chat.whatsapp.com/IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.