Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, April 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्यातील अकस्मात वळणांनी केले मला नास्तिकचा आस्तिक
    ललित

    आयुष्यातील अकस्मात वळणांनी केले मला नास्तिकचा आस्तिक

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 5, 2026No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी कथा, मराठी लघुकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कहाणी, हृदयस्पर्शी कहाणी, देवपूजेचे महत्त्व, आस्तिक नास्तिक, आस्तिकचे अर्पण भाव, नास्तिकचे मनपरिवर्तन, नास्तिकचे देवदर्शन, नास्तिकच्या आयुष्यातील वळणे,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    फाटकाचा आवाज आला, तसं मी दार उघडून बाहेर पाहिलं तर, एक म्हातारा माणूस बाहेर उभा होता… “फुलं घेऊ का?”  मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं.

    “हो घ्या ना…”

    तो फुलं तोडू लागला. तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो. मला नुकतीच नाशिकमध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रूमही चांगली आणि पटकन मिळाली. रूमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं… मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता, कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येताना आईने मला श्रीगुरुदत्तांचा फोटो घेऊन जायचा खूप आग्रह केला. सकाळी कामावर निघताना देवाला नमस्कार करून निघालं की, दिवस चांगला जातो, असं तिचं म्हणणं. पण मी पडलो एक नंबरचा नास्तिक. “आपलं भविष्य आपणच घडवतो,” असं मानणारा!

    “माणसाच्या आयुष्यात संघर्ष नसला, सगळ्या गोष्टी सहजगत्या घडत गेल्या की, त्याला देवबीव या कल्पना खोट्या वाटायला लागतात, तो स्वतःलाच भाग्यविधाता समजू लागतो. पण ते खरं नसतं…” असं तिने मला समजावून सांगितलं. पण मला ते पटलं नाही. अर्थातच, मी तो फोटो आणायचं टाळलं.

    म्हातारा रोज फूलं घ्यायला यायचा. आता तो परवानगी विचारायचा नाही. माझी किंवा घरमालकांचीही त्याला हरकत नव्हती. कारण फुलंच इतकी असायची की, कितीही तोडली तरी ते झाड फुलांनी भरलेलंच दिसायचं.

    एक दिवस घरमालकांना त्याच्याबद्दल विचारलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून खूप दुःख झालं…

    म्हाताऱ्याचं नांव एकनाथ होतं. त्याच्या बायकोचा आणि मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता. मुलीचं लग्न होऊन ती आफ्रिकेत स्थायिक झाली होती. आई आणि भावाच्या मृत्यूनंतर वडिलांना घेऊन ती आफ्रिकेत गेली होती, पण जावयाच्या घरी राहणं एकनाथ काकांना पटलं नाही. थोड्याच दिवसात ते भारतात परतले आणि आता एकटेच रहात होते.

    एक दिवस ते आले तेव्हा मी बाहेरच उभा होतो. त्यांच्या हातातल्या परडीत खूप वेगवेगळी फुलं होती. मी त्यांना विचारलं, “काका तुमच्याकडे खूप देव आहेत का?”

    “नाही तर, मोजकेच आहेत. का?”

    “मग इतकी फुलं का?”

    “अरे, भरपूर फुलं असली की, देव कसे प्रसन्न दिसतात आणि ते प्रसन्न दिसले की, आपला दिवसही उत्साहात जातो…”

    “काका तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकलंय. एवढं सगळं होऊन सुद्धा तुमचा देवावर विश्वास आहे…?”

    “बेटा, जे प्रारब्धात आहे, ते देवांनासुद्धा चुकलं नाही. श्रीराम, कृष्ण यांनाही आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला आणि शेवटी त्यांनाही मृत्यू आलाच की! अशी कितीतरी उदाहरणं आहेत. माझ्या मुलाचं आणि बायकोचं आयुष्य तेवढंच होतं, त्याला देव तरी काय करणार? शेवटी नियती जे ठरवते ते घडल्याशिवाय रहात नाही.”

    हेही वाचा – शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…

    “पण आता या वयात देव देव करुन काय मिळणार?”

    “काहीतरी मिळवण्यासाठी किंवा स्वार्थासाठीच देवाची पूजा करायची नसते बेटा. देवावरच्या प्रेमासाठी देखील पूजा केली पाहिजे…”

    मी हसलो. मला ते पटलं नाही. म्हणाल़ो, “आपल्या देशात मला नाही वाटत कोणी स्वार्थाशिवाय देवाला नमस्कार सुद्धा करत असेल!”

    “का नाही? ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, रामदास अशी कितीतरी उदाहरणं आहेत की! ज्यांनी नेहमी मानव कल्याणासाठी देवावर प्रेम केलं. स्वार्थ कधी बघितला नाही आणि आता आमच्यासारखी निवृत्त झालेली, आयुष्यात काहीही घडायचं बाकी न राहिलेली माणसं देवदेव करतात, ती काही स्वार्थासाठी किंवा काही मिळवण्यासाठी नाही तर, फक्त आनंद आणि समाधानासाठी!”

    मी चूप बसलो. त्यांना काय उत्तर द्यावं, मला कळेना. माझी संभ्रमावस्था बघून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले,

    “एकदा पूजा करून बघ बेटा. बघ, दिवसभर कसं प्रसन्न वाटतं ते! माझ्या एकाकी, नीरस आयुष्यात या भगवंतामुळेच रंगत आहे. तूही तो अनुभव घे…”

    ते निघून गेले आणि मी विचारात पडलो. मंदिराबाहेर तासनतास रांगेत उभे रहाणारे भक्त, पंढरपुरच्या वारीत हालअपेष्टा सहन करून शेकडो मैल चालणारे वारकरी माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. वाटलं, एकदा देवाची पूजा करून बघायला काय हरकत आहे? नाही काही वाटलं तर सोडून देऊ.

    त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून येताना मी दत्तगुरूंची फोटोफ्रेम आणि पूजेचं साहित्य घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मी सकाळीच लवकर उठलो. आंघोळ करून दत्तात्रेयांची फोटोफ्रेम टेबलवर ठेवली. गंध लावून हार घातला… फुलं वाहिली… निरांजन लावलं. अगरबत्ती लावताच रूममध्ये प्रसन्न वातावरण तयार झालं. रोज मनाला येणारी मरगळ नाहीशी झाली. इच्छा नसतानाही मी दत्तगुरुंना नमस्कार केला. अंगावर शहारे आले.

    त्या पूर्ण दिवसात एकनाथ काका म्हणत होते, तसं खरोखरच मला प्रसन्न वाटत होतं. मग मी रोजच दत्ताची पूजा करू लागलो. पूजा केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं मानसिक बळ मिळतंय याचा अनुभव मला येऊ लागला. पण अजूनही ‘देव आपलं भाग्य बदलू शकत नाही’ या माझ्या मतावर मी ठाम होतो. माझ्या मनातला नास्तिकपणा अजूनही तितकासा कमी झाला नव्हता.

    मध्यंतरी मी गावी गेलो. मी रोज दत्तात्रेयांची पूजा करून ऑफिसला जातो, असं आईला सांगितलं. तिला खूप आनंद झाला.

    “तू म्हणालीस म्हणून करतोय. पण अजूनही माझा देवावर विश्वास नाही!” मी तिला  म्हणालो.

    ” तो बसणार नाहीच. याचं कारण तुझं आतापर्यंतचं आयुष्य खूप सुखात गेलंय. मी आणि तुझ्या वडिलांनी स्वतः काटकसरीत दिवस काढून तुम्हा भावंडांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. तुम्हांला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे तुम्हाला संकटं, हालअपेष्टा, दुःखं काय असतात, याची कल्पना नाही. अर्थातच देवाला साकडं घालण्याची, त्याची मनोभावे प्रार्थना करण्याची तुम्हाला कधी गरजच भासली नाही…”

    “पण आई, जगात इतकी गरीबी आहे. देव त्यांना मदत करून श्रीमंत का नाही करत? ते जाऊ दे. भूकंप येतो, एखादं विमान कोसळतं तेव्हा हजारो लोक मरतात. तेव्हा हा देव कुठं असतो?”

    ” देव आणि नियती याची गल्लत करू नकोस. नियती ही अशी गोष्ट आहे की, जी देवांनाही चुकलेली नाही आणि अशा भूकंपात ढिगाऱ्याखाली सात-सात दिवस दबलेले राहूनसुद्धा बरेच जण जिवंत रहातात, विमान दुर्घटनेत इतक्या उंचीवरुन पडूनही काहीजण जिवंत रहातात, तेव्हा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, असं आपण म्हणतोच ना? अशा दुर्घटनांमध्ये कोणताही स्वार्थ मनात न ठेवता मदतीला धावून जाणाऱ्यांमागे ईश्वरी प्रेरणाच असते, हे तुम्ही का नाही समजून घेत? माणसातल्या देवत्वाला जागवणाराही देवच असतो, हे तुम्ही लक्षात घेत नाही. मी मगाशीच म्हटलं की, तुमच्यावर कधी संकटं नाही आली, कारण ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याअगोदरच आम्ही ती आमच्या अंगावर घेत होतो. आमच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग आले की, वाटायचं की, संपलं सगळं. पण अचानक एखादा हात पुढे यायचा आणि आम्हाला सांभाळून घ्यायचा. तो हात माणसाचाच असायचा, पण तो पुढे येण्यामागे प्रेरणा देवाचीच असायची, हे नक्की!”

    बराच वेळ मला काहीच बोलता आलं नाही. मग मी धीर धरुन म्हणालो, “ठीक आहे देव आहे, असं तत्वतः मान्य करतो. पण आई देवपूजा करणं म्हणजे वेळेचा अपव्ययच नाही का?”

    “तासनतास तुम्ही मोबाईलवर चॅटिंग करत असता, दिवसदिवस क्रिकेटची मॅच बघण्यात किंवा सीरियल्स बघण्यात तुम्ही घालवता, तो तुम्हाला वेळेचा अपव्यय नाही वाटत?” आई पोटतिडकीने बोलतेय आणि ते खरंही आहे हे मला कळत होतं, पण वळत नव्हतं.

    आता माझी आणि एकनाथ काकांची नेहमी गाठभेट व्हायची. कधीकधी ते मला मंदिरात चलायचा आग्रह करायचे. मीही मग त्यांना बाईकवर बसवून मंदिरात घेऊन जायचो.

    एक दिवस मी त्यांना म्हणालो, “काका, देव तर आपल्या घरीही असतात, मग या मंदिरांचा काय उपयोग?”

    “तुझं म्हणणं एका दृष्टीने बरोबर आहे. देव तर सगळीकडेच आहे मग देवळं बांधून त्यात देवाच्या मूर्ती ठेवण्याची गरजच काय? असंच तुला म्हणायचंय ना? असं बघ. श्रद्धेची निर्मितीस्थळं म्हणजेच ही प्रार्थनास्थळं होत. मग ती हिंदूंची मंदिरं असोत, मुसलमानांच्या मशिदी असोत, शिखांचे गुरुद्वारा असोत की, बुद्धांचे विहार. आपली मंदिरं तर फक्त धार्मिक सेवेचीच नव्हे तर, सामाजिक सेवेचेही स्थळं आहेत. प्राचीनकाळी या मंदिरांचा उपयोग प्रवाशांच्या निवासासाठी, लग्न वगैरे कार्यासाठी व्हायचा. आजही तो होतोच आहे. पुढेमागे जेव्हा तू भारतात फिरशील आणि या मंदिरावरची अप्रतिम शिल्पकला बघशील, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की, ही मंदिरं आपल्या संस्कृतीची उत्तम निदर्शक आहेत.”

    हेही वाचा – आभासीपेक्षा वास्तवातलं जग खूप सुंदर…

    “आता तुझा आणखी एक प्रश्न म्हणजे घरातल्या देवघरात दत्ताचा फोटो किंवा मूर्ती आहे, मग दत्त मंदिरात जाण्याची गरजच काय? आता मला सांग, मुसलमान घरीही नमाज पढू शकतात त्यांना त्यासाठी मशिदीत जायची गरजच काय? ख्रिश्चनांच्या घरातही येशूच्या मूर्ती किंवा फोटो असतात, मग ते चर्चमध्ये का जातात? याचं कारण म्हणजे ही सामूहिक प्रार्थनेची श्रद्धास्थळं आहेत. त्या निमित्ताने माणसं एकमेकांना भेटतात. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. अर्थातच, समाजाला एकत्र आणण्यासाठी ही धार्मिक स्थळं आवश्यकच असतात.”

    मी नि:शब्द झालो. काकांच्या सहवासात माझ्या अनेक शंकांचं निरसन होत होतं. माझ्या ज्ञानातही भर पडत होती. काकांबद्दल आता मला आत्मीयता वाटू लागली. त्यांना भारतातली धार्मिक स्थळं बघण्याची खूप इच्छा होती. कुणीतरी आपल्याला तिथे घेऊन जावं, असं त्यांना वाटत होतं. पण मुलाच्या अकाली जाण्याने आपली ती इच्छा अपूर्ण राहणार, अशी त्यांना भीती वाटत होती. मी ठरवलं की, माझ्या आईवडिलांसोबत काकांनाही फिरवून आणायचं.

    मग मी माझ्या आई-वडिलांसोबत एकनाथ काकांनाही चारधाम यात्रा, बारा ज्योतीर्लिंग, नर्मदा परिक्रमा घडवून आणली. महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रीही त्यांना घेऊन गेलो. काका कधी बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि माझ्याबद्दलची कृतज्ञता दिसून यायची. काकांच्या इच्छा पूर्ण करून मी एक सत्कर्म केल्याचं माझ्या आईवडिलांनाही समाधान वाटत होतं.

    एकनाथ काका आता मला आपला मुलगाच मानू लागले होते. समवयस्क मित्रांमध्ये ते माझं खूप कौतुक करायचे. माझ्या वाढदिवसाला ते आवर्जून फोन करून मला शुभेच्छा द्यायचे. ते स्वतः फारसं काही खायचे नाहीत, पण मला संध्याकाळी हाँटेलमध्ये स्वखर्चाने जेवू घालायचे. मीही त्यांना बरं वाटलं नाही की, दवाखान्यात घेऊन जायचो. गरज पडेल तेव्हा त्यांना औषधं आणून द्यायचो. त्यांची आस्थेने विचारपूस करायचो.

    एक दिवस ते म्हणाले, “आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि त्या पूर्ण व्हाव्यात  म्हणून देवानेच तुझी, माझी भेट घालून दिली बघ. एक मुलगा नियतीने हिसकावून नेला, पण देवाने तुझ्या रूपाने मला दुसरा मुलगा दिला. आता मला देवाने केव्हाही उचलावं, मी तयार आहे. तुला मी माझ्या मुलीचा आणि इतर नातेवाईकांचे फोन नंबर देऊन ठेवतो. माझं काही बरं-वाईट झालं तर त्यांना कळव आणि हो, माझा मुलगा तर गेला, पण माझा दुसरा मुलगा म्हणून माझे अंत्यसंस्कार तूच करावेस, अशी माझी तुला विनंती आहे.”

    माझे डोळे भरून आले. मी त्यांना म्हणालो, “काका तुम्ही काही इतक्यात जात नाही आणि काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करेन.”

    शेवटी काकांची इच्छा देवाने पूर्ण केली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यांच्या मुलीला आणि नातेवाईकांना फोन करून याची माहिती दिली. पण ते येण्यापूर्वीच काकांनी माझ्या हातून शेवटचं पाणी घेत प्राण सोडले.

     काकांच्या अंत्यविधीला त्यांची आफ्रिकेतली मुलगी कविता, जावई आणि गोड चेहऱ्याची नणंद सोनाली आले होते. काकांचं क्रिया-कर्म त्यांच्या इच्छेनुसार मीच केलं. त्यांच्या मुलीने आणि इतर नातेवाईकांनीही त्याला हरकत घेतली नाही. काकांनी माझ्याबद्दल त्यांच्या मुलीला आणि जावयाला काय सांगितलं होतं, माहीत नाही, पण दोघंही माझ्याशी खूप आदराने वागत होते. या तेरा-चौदा दिवसांत माझे आणि सोनालीचे सूर कसे जुळले, कुणास ठावूक, पण आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव आम्हाला झाली.

    सहा महिन्यांनी कवितेच्या नवऱ्याने मला आफ्रिकेत नोकरीची आँफर दिली. पगार गलेलठ्ठ असल्याने मी ती ऑफर नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी तिथल्या कंपनीत जॉइन झालो. त्यानंतरच्या सहा महिन्यांत मी आणि सोनाली एकमेकांच्या खुप जवळ आलो… आणि शेवटी माझं आणि सोनालीचं, आमची जात वेगवेगळी असूनही, बिनविरोध लग्न झालं. एका छोट्या गावात रहाणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला परदेशातली सून मिळावी, याचा माझ्या आईवडिलांना खूप अभिमान वाटला.

    आयुष्याला मिळालेली ही अकस्मात वळणं पाहून माझा देवावरचा विश्वास अधिकच दृढ झाला. आज आफ्रिकेतल्या माझ्या बंगल्यात मी मोठं देवघर बनवून घेतलंय. खूप फुलं वाहून देवपूजा केल्याशिवाय मी आता घराच्या बाहेर पडत नाही.

    कधीकाळी मी नास्तिक होतो, यावर माझा स्वतःचाच आजकाल विश्वास बसत नाही…!


    मोबाइल – 9209763049

    (ही कथा माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे.)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026 ललित

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026 ललित

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    By मधुर सुनील कुलकर्णीApril 19, 2026

    पुण्याहून आलेलं, साठेकाकांचं पत्र मी वाचलं. अश्रूंनी पत्रातील अक्षरं धूसर व्हायला लागली. माझ्या हातातले पत्र…

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    तन्वी आणि शेखरच्या जाळ्यात आराध्या सापडली, पण…

    April 17, 2026

    हे बंध रेशमाचे ठेवू जपून जीवा…

    April 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026

    स्वरचैतन्याचा अस्त…

    April 18, 2026

    पाऊस असा रुणझुणता…

    April 18, 2026

    Dnyaneshwari : तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें…

    April 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 271
    • अवांतर 182
    • आरोग्य 103
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 389
    • फिल्मी 45
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 562
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    कसबा पेठेतील वाडा अन् पगडी…

    April 19, 2026

    आरोग्यदायी हस्त मुद्रा अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 18, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 एप्रिल 2026

    April 19, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.