सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पांडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥238॥ ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥239॥ राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥240॥ जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु । अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु ॥241॥ जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥242॥ जो भक्तजनवत्सलु । प्रेमजनप्रांजलु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥243॥ तो कृष्णजी वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ॥244॥ आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥245॥ तेचि रसाळ कथा । मऱ्हाठिया प्रतिपथा । आणिजेल आतां । आवधारिजो ॥246॥ ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥247॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः ॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी
अर्थ
परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो ॥238॥ आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद याप्रमाणे बोलला, असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला ॥239॥ हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्णपरमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे ॥240॥ ज्याची (धर्मरक्षक म्हणून) कीर्ति उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्यभावरहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला ॥241॥ देवांना साह्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे ॥242॥ तो भक्तांविषयी मायाळू आहे व प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे ॥243॥ तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्णपरमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे ॥244॥ आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला ॥245॥ तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांततरात आणली जाईल ती आपण ऐकावी ॥246॥ ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, महाराज, प्रभु निवृत्तिदेवांनी आम्हाला हे शिकवले आहे की आम्ही तुम्हां संतांची सेवा करावी ॥247॥
॥बारावा अध्याय समाप्त॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन


