सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥18॥
पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥197॥ कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥198॥ जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥199॥ नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥200॥ अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाय ॥201॥ तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥202॥ दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पांडुसुता । तैसा सुखदुःखप्राप्ता । मध्यस्थु जो ॥203॥ माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥204॥ आघविया जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें तयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥205॥ जो सबाह्यसंगु । सांडोनिया लागु । एकाकी असे आंगु । आंगीं सूनी ॥206॥
तुल्यनिन्दास्तुतिमौंनी संतुष्टो येन केनचित् ।अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥19॥
जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥207॥ तैसें निंदे आणि स्तुती । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥208॥ साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी । जो भोगितां उन्मनी । आरायेना ॥209॥ जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥210॥ आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं । तैसा न धरीच केंही । आश्रयो जो ॥211॥ आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती । तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया ॥212॥ हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥213॥ मग याहीवरी पार्था । माझां भजनीं आस्था । तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥214॥ उत्तमासी मस्तक । खालविजे हें काय कौतुक । परि मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ॥215॥ तरी श्रद्धावस्तूसि आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥216॥
हेही वाचा – Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे
अर्थ
शत्रू व मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा, शीत व उष्ण, सुख व दु:ख यांच्या ठिकाणी समान असणारा (अंतर्बाह्य) संगरहित, ॥18॥
अर्जुना ज्याच्या ठिकाणी भेदभावाची गोष्टही नाही, शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे ॥197॥ अथवा घरच्या माणसांना (तेवढा) उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नसते, ॥198॥ जो तोडण्य़ाकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, ॥199॥ अथवा ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढविणाराला गोड व चरकात घालून त्याला गाळणाराला कडू असा असत नाही, ॥200॥ अर्जुना, त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच राहते ॥201॥ तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादि द्वंद्वांची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असते ॥202॥ अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वार्यांमध्ये जसा मेरु पर्वत (अचल असतो) तसा प्राप्त होणारी जी सुखदु:खें, त्यामधे तो अचल असतो. ॥203॥ ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा आणि रंक यांस सारखीच अनुभविण्यास देते, तसा जो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो ॥204॥ ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात ॥205॥ जो अंतर्बाह्य संगाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो ॥206॥
निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही मिळेल त्यामधे संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिरबुद्धि असलेला जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय आहे. ॥19॥
जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही, ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही ॥207॥ त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्याच्या मनावर काही एक परिणाम होत नसल्यामुळे तो निंदा आणि स्तुती यांस सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमधे व रानामधे संचार करतो. ॥208॥ खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे. कारण की तो उन्मनी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही ॥209॥ जो ज्यावेळेला जे मिळेल त्य़ाने हृष्ट होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसावाचून सुकत नाही त्याप्रमाणे काही न मिळाले तरी जो खिन्न होत नाही ॥210॥ आणि ज्याप्रमाणे वायु हा कोठेही एकच जागा धरून रहात नाही त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही ॥211॥ ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांतिस्थान आहे ॥212॥ हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो, फार काय सांगावे ! सर्व स्थावरजंगमात्मक जग जो (अनुभवाच्या अंगाने) आपणच बनला आहे ॥213॥ अर्जुना, इतके असूनही आणखीही ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो ॥214॥ उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे ? पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते ॥215॥ जर शंकर श्रीगुरु होतील तरच भक्तितत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल ॥216॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे


