सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥17॥
जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणोनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥190॥ आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणोनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥191॥ पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे । हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥192॥ आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुला ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥193॥ वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥194॥ ऐसा बोधुचि केवळु । जो होऊनि निष्कळु । त्याहीवरी भजनशीळु । माझां ठायीं ॥195॥ तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥196॥
हेही वाचा – Dnyaneshwari : गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं
अर्थ
जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा करत नाही, चांगले व वाईट या दोन्हींचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे ॥17॥
जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एकाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही ॥190॥ आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते ॥191॥ आपले जे खरे (त्रिकालाबाधित आत्मस्वरूप) आहे, ते कल्पाच्या अंताच्या वेळीदेखील (आपल्यापासून) जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही ॥192॥ आणि ज्याच्या पलीकडे काही नाही, असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करत नाही ॥193॥ सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस, हे दोन्ही जसे घडत नाही, त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही. ॥194॥ असा जो केवल अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो ॥195॥ तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो. ॥196॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे


