सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
परी हें असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥217॥ ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयाते ॥218॥ जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलां हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥219॥ कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥220॥ म्हणोनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥221॥ तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेऊं ॥222॥ तो पहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥223॥ दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥224॥ तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥225॥ तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ? । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥226॥ तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥227॥ जो हें अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोगु समस्त । योगरूप ॥228॥ जे मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी । जया स्थितीये ॥229॥
हेही वाचा – Dnyaneshwari : वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे
अर्थ
पण आता हे शंकराचे वर्णन पुरे. कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखी होते. [भक्तितत्वाचा आदर कसा करावा, हे शंकरच जाणतात. हे कशावरून? तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ति ही त्यांनी माझे चरणोदक (गंगा) मस्तकावर धारण करून व्यक्त केली. असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत. असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वत:ची स्तुती केल्यासारखे होते, म्हणून शंकराचे वर्णन पुरे असे भगवान् या ओवीत सांगतात] ॥217॥ एवढ्याकरता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो ॥218॥ कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थसिद्धी जो मोक्ष, तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघाला ॥219॥ तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ (असा) असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो. (म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तो ठरवतो) व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो ॥220॥ म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू. त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्य़ाची टाच आम्ही हृदयावर धरू ॥221॥ त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. (आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ) आणि त्याची कीर्ति हाच कोणी दागिना, तो आम्ही आपल्या कानात घालू. (कानांनी आम्ही त्याची कीर्ती ऐकू) ॥222॥ तो पहावा, ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळेरहित आहोत तरी डोळे धारण करतो, आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो ॥223॥ त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरिता दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलो. (म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले) ॥224॥ त्यांच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देहरहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे ? तो मला किती आवडतो याला उपमाच नाही ॥225॥ त्याच्याशी आमची मैत्री असते. यात काय आश्चर्य आहे ? परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात ॥226॥ जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे ॥227॥ अर्जुना जे हे खरे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला (आता) आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला. ॥228॥ ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वत: प्रीति करतो, मी त्याचे ध्यान करतो, अथवा त्याला मस्तकावर धारण करतो ॥229॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु


