सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥20॥
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥230॥ तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥231॥ परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥232॥ परि मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥233॥ पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥234॥ तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र । भक्तिकथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥235॥ आम्हीं तयाचें करूं ध्यान । तो आमुचें देवतार्चन । तेवांचूनि आन । गोमटें नाहीं ॥236॥ तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळे तैं ॥237॥
हेही वाचा – Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु
अर्थ
आणि श्रद्धायुक्त व नी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, हे जे माझे धर्म्य व अमृतासारख् सांगणे आहे, त्याचे सेवन करतात, (त्याप्रमाणे आचरण करतात) ते मला अत्यंत प्रिय आहेत. ॥20॥
ती ही गोष्ट (वर सांगितलेले ते हे भक्तियोगाचे वर्णन) जी चित्ताला रंजवणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे, ती ऐकून जे पुरुष तिला (त्या गोष्टीला) स्वानुभवाने जाणतात ॥230॥ त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, एवढेच नव्हे तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात, ॥231॥ पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्ति योग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. ॥232॥ परंतु जे मला श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्तितत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात ॥233॥ अगा अर्जुना, या जगामधे तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. ॥234॥ तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामधे तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्तिकथेशी स्नेह असतो ॥235॥ आम्ही त्य़ाचे ध्य़ान करून, तो आमची पूजन करण्याची देवता आहेत, त्यांच्यावाचून आम्ही दुसरे काही चांगले मानीत नाही. ॥236॥ त्याचे आम्हास व्यसन (छंद) असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत. फार काय सांगावे ? तो आम्हांला भेटतात तेव्हाच आम्हास समाधान वाटते ॥237॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी


