अध्याय तेरावा
तरि क्षेत्र येणें नावें । हें शरीर जेणें भावें । म्हणितलें तें आघवें । सांगों आतां ॥10॥ हें क्षेत्र कां म्हणिजे । कैसें कें हें उपजे । कवणकवणीं वाढविजे । विकारीं एथ ॥11॥ हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें । बरड कीं पिके । कोणाचें हें ॥12॥ इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते बोलिजती सावेव । अवधान देई ॥13॥ पैं याचि स्थळाकारणें । श्रुति सदा बोबाणे । तर्कु येणेंचि ठिकाणें । तोंडाळु केला ॥14॥ चाळितां हेचि बोली । दर्शनें शेवटा आलीं । तेवींचि नाहीं बुझाविली । अझुनि द्वंद्वें ॥15॥ शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें । याचेनि एकवंकें । जगासि वादु ॥16॥ तोंडेसीं तोंडा न पडे । बोलेंसीं बोला न घडे । इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥17॥ नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ । जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥18॥ नास्तिका द्यावया तोंड । वेदांचें गाढें बंड । दे देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥19॥ म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिकें हें वाग्जाळ । ना म्हणसी तरी पोफळ । घातलें आहे ॥20॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जो भक्तजनवत्सलु, प्रेमळजनप्रांजलु
अर्थ
तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला, तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो ॥10॥ याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते ॥11॥ हे मोजके साडेतीन हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे? हे क्षेत्र माळजमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे? व कोणाच्या मालकीचे आहे? ॥12॥ इत्यादि जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील, तिकडे लक्ष दे ॥13॥ याच ठिकाणाकरता (क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरिता) वेदांची नेहेमी बडबड सुरू आहे व याच क्षेत्राने तर्काला वाटाघाट करावयाला लावले ॥14॥ हीच (क्षेत्रनिर्णयाची) वाटाघाट करतांना सहा दर्शने हातटेकीस आली, तथापि अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत ॥15॥ शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या एकनिश्चया संबंधाने जगात वादविवाद चालू आहेत ॥16॥ एकाचा निर्णय दुसर्याच्या निर्णयाशी जुळविता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसर्या प्रतिपादनाशी मेळ घालता येत नाही. (उलट) त्या युक्तीने बडबडीला जोर आला आहे ॥17॥ हे क्षेत्र कोणाचे आहे, हे कळत नाही, परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे, त्यास आपल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे (माझाच निर्णय बरोबर आहे असा) त्याचे बल कसे आहे पहा की, तो घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतो ॥18॥ नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरिता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करावयास लागले ॥19॥ तो पाखंडी वेदांस असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ अहात व तुमचे शब्दपांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे खरे नाही, असे जर कोणी (वेदानुयायी) म्हणत असेल तर आम्ही पैजेची सुपारी (विडा) ठेवली आहे. (आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा) ॥20॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें


