अध्याय तेरावा
पैं जीविताचेनि सुखें । जैसा कां मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्यतोपे । जरा न गणी ॥753॥ कडाडीं लोटला गाडा । शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढां । वृध्दाप्य आहे ॥754॥ कां आडवोहळा पाणी आलें । म्हैसयाचें झुंज मातलें । तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥755॥ पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । मस्तक आदरीं शिरों । बागीबळ ॥756॥ दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । प्रियेचा पैसु ॥757॥ पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें । कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें ॥758॥ तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें । न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥759॥ देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें । परि न म्हणे पाहे माझें । हेचि भवे ॥760॥ आणि आंगीं वृद्धतेची । संज्ञा ये मरणाची । परि जया तारुण्याची । भुली न फिटे ॥761॥ तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर । तेवींचि परियेसीं थोर । चिन्हें आणिक ॥762॥ तरी वाघाचिये अडवे । चरोनि एक वेळ आला दैवें । तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा ॥763॥ कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय ॥764॥ तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे । एथ रोग एक आहे । हें मानीना जो ॥765॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं
अर्थ
जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो ॥753॥ डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा (जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील, हे पाहात नाही) तसा जो पुढे म्हातारपण (येणार) आहे, हे पाहात नाही ॥754॥ अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा, किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते ॥755॥ शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होऊ लागतो व शरीरातील तेज कमी होऊ लागते व मस्तकाला कापरे सुटते ॥756॥ दाढी पांढरी होते, मान हालून ‘नाही नाही’ अशी निवारण्याची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूंचा पसारा वाढवीत राहातो, ॥757॥ पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत, आंधळा जसा पुढे काय आहे, हे पाहात नाही, अथवा डोळ्यांवर आलेल्या चिपाडांच्या योगाने आळशी मनुष्य संतुष्ट होतो ॥758॥ अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पाहात नाही, तोच खरोखर अज्ञान आहे ॥759॥ आंधळ्या माणसाकडे किंवा कुबड्या माणसाकडे पाहून तो त्यास गर्वाने वेडावू लागतो, पण असे म्हणत नाही की, माझीही उद्या हीच अवस्था होईल. ॥760॥ आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले, तरी ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, ॥761॥ तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक. ॥762॥ तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळ (सुरक्षितपणे) पोळ (बैल) चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्यात धावतो ॥763॥ (ज्या जागेत) पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो (म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो). ॥764॥ त्याप्रमाणे आरोग्य, हे एखाददुसऱ्या वेळी चुकून मिळालेले असते, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानीतच नाही. ॥765॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : गव्हारु निद्रासुखें, घर जळत असे तें न देखे


