अध्याय तेरावा
आणिक पाहीं धनंजया । जो गृहदेह सामग्रिया । न देखे कालचेया । जन्मातें गा ॥727॥ कृतघ्ना उपेगा केला । का चोरा व्यवहारु दिधला । निसुगु स्तविला । विसरे जैसा ॥728॥ वोढाळितां लाविलें । तें तैसेंच कान पूंस वोलें । कीं पुढती वोढाळूं आलें । सुणें जैसें ॥729॥ बेडूक सापाचां तोंडीं । जातसे सबुडबुडीं । तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ? ॥730॥ तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती । जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया ॥731॥ मातृकोदरकुहरीं । सूनि विष्ठेचां दाथरीं । जठरीं नवमासवरी । उकडला जैं ॥732॥ तें गर्भींची व्यथा । कां जें जालें उपजतां । तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो ॥733॥ मलमूत्रपंकीं । लोळतें बाळ अंकीं । तें देखोनि जो न थुंकीं । त्रासु नेघे ॥734॥ कालचि ना जन्म गेलें । पाहेचि पुढती आलें । हे ऐसें कांहीं वाटलें । नाहीं जया ॥735॥ आणि पैं तयाची परी । जीविताची फरारी । देखोनि जो न करी । मृत्युचिंता ॥736॥ जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे । हें जयाचेनि मानसें । मानिजेना ॥737॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जो अखंड भोग जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें
अर्थ
अर्जुना, आणखी असे पाहा की, जो घर, शरीर वगैरे सामुग्रीच्या योगाने मागील जन्माची आठवण ठेवीत नाही ॥727॥ कृतघ्न मनुष्याच्या उपयोगी पडलेले (जसे तो विसरतो) अथवा चोराला भांडवल दिले असता (तो जसा ते विसरतो) अथवा कोडग्या पुरुषांची स्तुती केली असता तो जशी ती विसरतो ॥728॥ कुत्रे ओढाळपणा करते म्हणून त्याचे कान व शेपूट कापून त्यास घराबाहेर हाकलून दिले तरी, ते ओढाळ कुत्रे कान व शेपूट रक्ताने ओले असतांनाच, ते सर्व विसरून, ज्याप्रमाणे पुन्हा घरात खोडी करण्याकरिता शिरते ॥729॥ बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळला जात असतांनाही माशांचे समुदाय तो गिळतो पण ‘आपण मरतो’ ही आठवण त्याला नसते ॥730॥ त्याप्रमाणे शरीराची नाकतोंड वगैरे ही नऊ द्वारे (मळाने) पाझरत असून व शरीराला झालेले कुष्ट अंगावर प्रत्यक्ष असूनही ही स्थिती ज्या (जन्माच्या) योगाने प्राप्त झाली, ती गोष्ट ज्याच्या अंत:करणात सलत नाही, ॥731॥ आईच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या थरांमध्ये घालून, त्या पोटात नऊ महिनेपर्यंत ज्यावेळी उकडला ॥732॥ ती गर्भात असता झालेली पीडा अथवा जन्माच्या काली झालेले कष्ट, ते काहीच जो मुळी सुद्धा आठवीत नाही ॥733॥ विष्ठा व मूत्र यांच्या चिखलात लोळणारी मुले मांडीवर पाहून जो किळस घेत नाही व कंटाळत नाही ॥734॥ (मागला) जन्म नुकताच संपला नाही काय? व लागलीच पुन: उद्या दुसरा जन्म मिळणार असे हे काही ज्याला वाटले नाही ॥735॥ आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, ॥736॥ जगण्याचा त्याला इतका विश्वास असतो की, येथे एक मृत्यु आहे, हे ज्याच्या मनाला पटत नाही ॥737॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नाहीं माझेनि पाडें वाडु, मी सर्वज्ञु एकुचि रूढु


