गणपतराव आणि रमाबाई काळे यांचं छोटंसं पण प्रेमळ जग होतं. गावाच्या शाळेत दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं घर म्हणजे ज्ञान, साधेपणा आणि मायेचा संगम. आर्थिकदृष्ट्या फारशी सुस्थिती नव्हती, पण नात्यातली श्रीमंती त्यांच्याकडे मनसोक्त होती. एक साधा आयुष्य पण आनंदाने जगत होते. आनंदाचा कारण म्हणजे, त्यांच्या संसारातील. दोन गोंडस मुली – संध्या आणि नीला. पण गणपतरावांच्या मनात मात्र एक सल होती – “मुलगाच नाही आपल्याला… म्हातारपणाचं काय?” पण रमाबाई त्यांना सावरत म्हणायच्या, “आपल्या मुलीच आपला आधार बनतील. आपण त्यांना घडवूया असं की, जग आपल्याला म्हणेल – धन्य आहेत ही पोरं आणि त्यांचे आईवडील!”
संध्या आणि नीला यांच्या लहानपणी घर किलबिलाटानं गजबजलेलं असायचं. दिवाळीला दोघी रांगोळी काढायच्या, उन्हाळ्यात बर्फाच्या गोळ्यांचा हट्ट करायच्या. रमाबाई दिवसभर शाळा, घर आणि पोरींची काळजी यात रमलेल्या असायच्या. ते बालपणाचं विश्व वेगळंच होतं.
गणपतराव प्रत्येक रात्री झोपताना पोरींना गोष्टी सांगायचे. एकदा संध्या म्हणाली, “बाबा, भाऊ असता तर खेळायला मजा आली असती ना?” त्यावर गणपतराव गप्प झाले. रमाबाईनं मुलींच्या डोक्यावर हात ठेवला आणि कुशीत घेतलं… गणपतरावांना ते वाक्य कायमचं आठवत राहिलं – “आपल्या मुली आपली मुलं ठरतील बघा.”
हेही वाचा – बनाना डिलाइटची गोष्ट…
संध्या अभ्यासात चुणचुणीत होती. कविता करायची, निबंध स्पर्धा जिंकायची. तिचं स्वप्न होतं – शिक्षिका व्हायचं. नीला मात्र विज्ञानाच्या दुनियेत रमली होती – इंजिनीअर व्हायचं तिचं ध्येय होतं. घरचं आर्थिक गणित कोलमडत होतं, पण रमाबाई म्हणायच्या, “कर्ज घेईन, पण पोरींचं शिक्षण थांबवणार नाही.” दोघींच्या शिक्षणाचा स्वप्न मी पूर्ण करेन.
गणपतरावांनी कधी कधी रात्री शिकवण्या घेतल्या, पण पोरींच्या शिक्षणाबाबत चालढकल केली नाही. मुलीच आहेत, असे गृहित न धरता, त्यांच्या शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, याच ध्येयाने त्यांचं शिक्षण पूर्ण केलं… संध्या शहरात शिक्षिका झाली आणि तिचं लग्न शरद नावाच्या समंजस शिक्षकाशी झालं. नीला इंजिनीअर झाली आणि तिचं लग्न सागरशी – एका आयटी इंजिनीअरशी झालं. दोघंही जावई एकमेकांहून सरस – समंजस, नम्र आणि घरात माणूसपण जपणारे.
लग्नाच्या दिवशी रमाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेव्हा गणपतराव म्हणाले, “रमा, बघ, आपण दोन कन्यादान केलं. माणसं ओळखून देव देत असतो. आपली परीक्षा घेतो, पण मग अशी फळं देतो की, हृदय भरून येतं.”
वर्षं सरत गेली. घर आता शांत झालं होतं. गणपतराव थोडं थकले होते. रमाबाईंच्या गुडघ्यांचा त्रास सुरू झाला. एक दिवस गणपतरावांना अचानक चक्कर आली… रमाबाई घाबरल्या. संध्या आणि शरद काही तासांत पोहोचले. मात्र, कामानिमित्त नीला आणि सागर लगेच आले नाहीत. त्यामुळे शरदने हॉस्पिटलची सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली.
“आई, तुम्ही फक्त बाबांची काळजी घ्या. बाकी मी बघतो,” शरद शांतपणे म्हणाला.
सागर आणि नीला आले, पण लगेच परतले. यादरम्यान, व्हीलचेअर, फिजिओथेरपी, औषधांची यादी या सगळ्यांची माहिती सागरने घेतली. दररोज संध्याकाळी सागर व्हिडीओ कॉल करून बाबा-माईंची विचारपूस करत राहिला.
गणपतराव एका संध्याकाळी म्हणाले, “हे जावई नाहीत ग रमा! हे तर आपली मुलंच आहेत. आपण देवाला म्हणायचं नाही की, आपल्याला मुलगा नाही म्हणून. पण आपल्याला एकऐवजी दोन मुलं दिली देवाने… खरेखुरे. ज्या विश्वासानं आपण कन्यादान केलं, त्याच विश्वासानं त्यांनी आपल्या दोघांना आपलं मानलं.”
एक दिवस सणाच्या दिवशी गणपतराव आणि रमाबाई संध्याच्या घरी होते. नात परी रमाबाईंच्या कुशीत खेळत होती. शरद त्यांच्या पायांजवळ बसून म्हणाला, “आई, आज तुमचं औषध वेळेवर घेतलं ना?” रमाबाई हसून मान डोलावतात.
त्या क्षणी त्यांचं मन भरून आलं. डोळ्यांतून हळूवार पाणी ओघळलं…
“दोन कन्यादान केलं… पण आज वाटतं की दोन पुत्र लाभले आहेत. हे नातं रक्ताचं नाही, पण प्रेमाचं आहे. कुठेही आणि कधीही सागर आणि शरद माझा हात धरायला आधीच उभे असते.”
आता दोघेही वृद्ध दाम्पत्य रोज संध्याकाळी अंगणात बसतात. परी आजीच्या केसात फुलं माळते, शरद आणि सागर रोज व्हिडीओ कॉल करतात, सणासुदीला हजेरी लावतात. कोण म्हणेल की “मुलगाच नाही?”
हेही वाचा – थकलेल्या जीवाला नवा श्वास देणारे शब्द…
गणपतराव आज एका कार्यशाळेत बोलताना म्हणाले, “लोक विचारतात – ‘तुमचं वय झालं, आधाराचं काय?’ माझ्या घरी मुलगा नाही, म्हणून लोकांना वाटायचं – म्हातारे झाल्यावर कोण पाणी देणार यांना? पण मी सांगतो – दोन कन्यादान केलंय मी! आणि त्या कन्यादानातून आम्हाला दोन पुत्र लाभलेत! हो, जावई म्हणतं त्यांना जग… पण ते आमची मुले म्हणून उभी राहिलीत. एका वेळेस माझी जुनी गाडी विकली… पोरींचं शिक्षण थांबू नये म्हणून. आज त्याच पोरी आणि त्यांचे नवरे, आमचं म्हातारपण सांभाळतायत. दोन पायांनी उभं राहायला एक मुलगा लागतो म्हणतात, मला चार खांद्यांची साथ मिळाली!
म्हणूनच सांगतो –
‘कन्यादान’ हे देणं नाही, ते ‘पुन्हा लाभलेलं माता आणि पित्याचं भाग्य’ असतं…!”
गणपतरावांचं हे वाक्य संपेपर्यंत सभागृहात एकदम शांतता पसरली आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला… पण त्या टाळ्यांमध्ये एक गलबललेला आदर, एक नम्र नतमस्तक होणं दडलेलं होतं.
“खरे आहे ना! दोन कन्यादानातून आम्हाला दोन पुत्र मिळालेत!’”
कधी कधी, कन्यादान ही केवळ परंपरा नसतं… ते भविष्यात मिळणाऱ्या आधाराचं बीज असतं. आज समाजात असे जावई फार कमी असतील, पण जे आहेत — ते म्हणजे त्या घरासाठी देवाचं वरदानच!
म्हणूनच, ज्या घरात जावई ‘मुला’च्या जागी उभे राहतात, तिथं नात्यांची मुळे खोल जातात,
आणि प्रेमाचं वटवृक्ष उभा राहतो —
हात धरायला… सावलीसारखा… आणि ओलावा द्यायला मायेच्या पावसासारखा!”


