अध्याय तेरावा
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् । भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥16॥
तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥919॥ म्हणोनि हा भूताकारु । जेथौनि तेंचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥920॥ बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥921॥ सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥922॥ अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥923॥ मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥924॥ नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥925॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी
अर्थ
ते तत्वत: अविभक्त आहे, तरी भूतांच्या ठिकाणी (नाना प्रकारच्या रूपांनी) विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे. (संहारकाली भूतांचा) ग्रास करणारे व (उत्पत्तिकाली) उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे. ॥16॥
त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमधे जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे (ब्रह्म) विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे. ॥919॥ म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म, त्या भूताकाराला आधार आहे. ॥920॥ बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ति, स्थिति व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड (एकसारखे) असते. ॥921॥ सायंकाल, प्रात:काल व मध्यान्हकाल, या क्रमाने सबंध दिवसही होत जात असतांना, जसे आकाश बदलत नाही. ॥922॥ हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीच्या काली, ज्यास ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली (पालनकाली) जे विष्णु या नामाला प्राप्त झाले, ॥923॥ मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो, त्या वेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्त्वतमादि तीन गुण (उत्पत्ति, स्थिति व लय) तेदेखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य (निर्धर्म) होऊन राहाते ॥924॥ आकाशाचे शून्यत्व गिळून, सत्त्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते, तेच महाशून्य होय, अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे. ॥925॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : क्षीरसागरींची गोडी, माजीं बहु थडिये थोडी


