अध्याय तेरावा
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्षमत्वात् तदविज्ञेयं दूरस्थ चान्तिके च तत् ॥15॥
जें चराचर भूतां- । माजीं असे पांडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥912॥ तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥913॥ जें एक आंतु बाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥914॥ क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥915॥ स्वेदजप्रभृती । वेगळालां भूतीं । जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥916॥ पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥917॥ नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । कां कोडी एकीं उसीं । एकचि गोडी ॥918॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे
अर्थ
ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे आणि चरही आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, तसेच ते दूर आहे व समीपही आहे. ॥15॥
अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते ॥912॥ त्या प्रकारच्या अविनाशरूपाने व सूक्ष्म स्थितीने जे ब्रह्म सर्व स्थावरजंगमाला व्यापून आहे, ते येथे ज्ञेय आहे, असे समजावे. ॥913॥ जे एक (चराचरांच्या) आत व बाहेर, जे एक जवळ व दूर (आहे), इतकेच नव्हे तर ज्या एकावाचून दुसरा प्रकार मुळीच नाही, ॥914॥ अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी, क्षीरसागराच्या मध्यभागी फार व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे जे सर्व बाजूंनी पूर्ण आहे ॥915॥ स्वेदजादिकरून वेगळाल्या प्राण्यात, ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही ॥916॥ हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमधे चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही, चंद्रबिंबास अनेकता येत नाही, ॥917॥ मिठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते ॥918॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी


