अध्याय तेरावा
सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13॥
आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥873॥ तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥874॥ आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणोनि जया । विश्वांघ्री नांव ॥875॥ पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगवेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥876॥ म्हणोनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूचां ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥877॥ जें सर्वांचिया शिरावरी । जे नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥878॥ पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशनी जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥879॥ यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥880॥ आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न । तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥881॥ म्हणोनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥882॥ एऱ्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिये व्याप्ती । रूप केलें ॥883॥ वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे । सर्व शून्यत्वाचा न साहे । निष्कर्षु जें ॥884॥ पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे । परि ग्रसितें ग्रासावेगळें । आहे काई ॥885॥ तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक । परि बोलावया नावेक । करावें लागे ॥886॥ पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥887॥ एऱ्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥888॥ म्हणोनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥889॥ तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं । तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥890॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त
अर्थ
त्याला हातपाय सर्वत्र आहेत, त्याला डोळे-मस्तक-मुख सर्वत्र आहेत, त्याला कान सर्वत्र आहेत, (याप्रमाणे) ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे. ॥13॥
सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते, तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत. ॥873॥ या कारणास्तव या वस्तूला ‘विश्वबाहु’ असे म्हटलेले आहे. कारण की, ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते. ॥874॥ आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते (ब्रह्म) आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रि (ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा) हे नाव आहे. ॥875॥ जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु, ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पाहणारी आहे. ॥876॥ म्हणून ‘विश्वतचक्षु’ (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी, बोलण्य़ास वेद तयार झाला. ॥877॥ जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा’ (सर्वत्र मस्तके असलेला) असे म्हटले जाते ॥878॥ अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे (ब्रह्म) सर्व अंगाने सर्व भोगीत आहे, ॥879॥ या कारणाने अर्जुना, त्याला विश्वतोमुख’ (म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा) हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. ॥880॥ आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून आहे, त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत ॥881॥ म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारा, असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे ॥882॥ हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु’ या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. ॥883॥ एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे? ॥884॥ एका लाटेने दुसर्या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे, ग्रासले जाणार्याहून वेगळे आहे काय ? ॥885॥ त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे? परंतु बोलण्याकरिता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. ॥886॥ शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवावयाचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृति) काढावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. ॥887॥ अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत अंगीकारले नाही तर गुरुशिष्यांच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. ॥888॥ अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ॥889॥ ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामात्रामध्ये व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक. ॥890॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती


