अध्याय तेरावा
जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड । जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी ॥1140॥ आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जें ॥1141॥ तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ॥1142॥ ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥1143॥ येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी । आपणपें तया हरी । दिधलें तैसें ॥1144॥ आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनातें कृष्ण । हा मी म्हणे ॥1145॥ परि असो तें नाथिलें । न पुसतां कां मी बोलें । किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें ॥1146॥ कीं तो पार्थु जी मनीं । अझुनी तृप्ती न मनी । अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥1147॥ स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी ॥1148॥ तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥1149॥ तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥1150॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : दीपकाची अर्ची, राहाटी वाहे घरींची
अर्थ
जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे (ब्रह्म) प्रकृतिरूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे (ब्रह्म) प्राप्त झाले असता साम्यासाम्य उरू देत नाही ॥1140॥ ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे, ॥1141॥ अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष, अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात, ते पूर्ण होतात. ॥1142॥ (संजय धृतराष्ट्रास म्हणतो) महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा असा प्रकृति-पुरुष-विचाराचा सर्व हिशोब दिला. ॥1143॥ ज्याप्रमाणे एका घागरीतील (पाणी) दुसर्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपला बोध त्या अर्जुनाला दिला ॥1144॥ आणि कोण कोणाला देणारा आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे, ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा (अर्जुन) मी (श्रीकृष्ण) आहे असे (अध्याय १० श्लोक ३७) श्रीकृष्ण म्हणालेही. ॥1145॥ परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलत आहे? फार काय सांगावे! श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले. ॥1146॥ तथापि तो अर्जुन मनामधे अजून तृप्ति मानीत नव्हता, (तर उलट) अधिकाधिकच (ज्ञानश्रवणाची) इच्छा वाढवीत होता. ॥1147॥ भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी (अधिक वाढलेली) इच्छा झाली. ॥1148॥ जेथे उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोक्तेही मिळाले आहेत, तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, ॥1149॥ महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी (उत्सुकता) पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. ॥1150॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती


