अध्याय तेरावा
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी ॥643॥ तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांसि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि येथ ॥644॥ म्हणोनि यया वाखाणा- । पासीं से आली चौगुणा । ना म्हणों नये देखणा । होसी ज्ञानी ॥645॥ तरी आतां ययावरी । प्रज्ञेचा माजु घरीं । पदें साच करीं । निरूपणीं ॥646॥ या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । माझेंही जी ऐसें । मनोगत ॥647॥ यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी । तरी वायां वागू मी । वाढों नेदी ॥648॥ एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा । श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली ॥649॥ मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥650॥ करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें ज्ञान आम्हीं डोळां । दाविलें तुज ॥651॥ आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती । तेंही सांगों व्यक्ती । लक्षणेंसीं ॥652॥ एऱ्हवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान जाणवे धनंजया । जें ज्ञान नव्हे तें अपैसया । अज्ञानचि ॥653॥ पाहें पां दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं ॥654॥ तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं । तरि सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥655॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान
अर्थ
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली, तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपावयाचे माहीत नसते, असे असते. ॥643॥ तसा हा प्रसंग झाला! कारण की, आम्हाला ज्ञानाची आवड आहे आणि तुलाही येथे (ज्ञानाच्या ठिकाणी) प्रीति आहे. ॥644॥ म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ति आली. तू ज्ञानामधे डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही, ॥645॥ तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर. ॥646॥ या संतांच्या आज्ञेबरोबर ‘महाराज, माझाही हेतु असाच आहे’ असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले. ॥647॥ आणखी महाराज, मला तुमचाही तसाच हुकुम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही. ॥648॥ याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली, ऐका. ॥649॥ यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात, असे श्रीकृष्ण म्हणाले. ॥650॥ तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखविले. ॥651॥ यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना अज्ञान असे जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो. ॥652॥ अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की, जे ज्ञान नाही ते आपोआप (निराळे न सांगता) अज्ञानच आहे. ॥653॥ अर्जुना, असे पाहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते. ॥654॥ त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण मी काही काही लक्षणे सांगतो ॥655॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे


