अध्याय तेरावा
तरि संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारें होये । तोषु जया ॥656॥ गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचां ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥657॥ आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं । उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥658॥ घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा । करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥659॥ आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची । तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥660॥ आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें । तैसें जयाचेनि आचरें । जगा दुःख ॥661॥ कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनि तीख रुपे । विषाहुनि संकल्पें । मारकु जो ॥662॥ तयातें बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचें निधान । हिंसेसि आयतन । जयाचें जिणें ॥663॥ आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे । तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे ॥664॥ पडली वारयाचा वळसा । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥665॥ निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थेंबें विरे वारेनि शोखे । चिखलु जैसा ॥666॥ तैसा मानापमानीं होये । जो कोण्हीही उर्मी न साहे । तयाचां ठायीं आहे । अज्ञान पुरें ॥667॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे
अर्थ
तरी जो प्रतिष्ठेकरिता जगतो, जो मानाची वाट पाहतो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो. ॥656॥ पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज. ॥657॥ आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते ॥658॥ विद्येचा पसारा घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो. ॥659॥ स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करीत असता हा त्यांस फसवीत राहतो, तो अज्ञानाची खाण आहे, असे समज. ॥660॥ आणि ज्याप्रमाणे रानात वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे त्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते, ॥661॥ आणि तो सहज जे जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो ॥662॥ आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे (इतकेच नव्हे) तर तोच अज्ञानाचा खजिना आहे. ॥663॥ जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो, त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हृष्ट होतो अथवा दु:खी होतो ॥664॥ वार्याच्या भोवर्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते असा स्तुतीच्या वेळी जो आनंदाने चढून जातो. ॥665॥ जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो व जसा चिखल पाण्याच्या एका थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्याने तो वाळतो; ॥666॥ त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणात्याही विकाराचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. ॥667॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा


