वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥143॥ अर्जुना अनंत सुखाचां डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनी तेही । तेंचि जाहले ॥144॥ अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥145॥ जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥146॥ जें महर्षीं वाढलें । विरक्तां भागा फिटलें । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥147॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥26॥
जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥148॥ तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥149॥ ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें ही पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥150॥
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः । प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥27॥
तरी वैराग्यचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥151॥
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी । तेथ पाठमोरी दिठी । पारुखोनियां ॥152॥ सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥153॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः । विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥28॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणोनि विषयभोगीं जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख
अर्थ
अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. ॥144॥ अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो, आपणच विश्व आहोत, असे जाणतो, तो या देहामध्येच परब्रह्म आहे, असे खुशाल म्हणता येईल. ॥145॥ जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित तसेच अमर्याद आहे आणि निष्काम पुरुष ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत; ॥146॥ जे थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यावानांच्या वाट्याला आलेले आहे आणि जे नेहेमी संशयरहितास फालद्रूप होते. ॥147॥
काम आणि क्रोध यांनी विरहित मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच (या देहातच) ब्रह्म बनतात. ॥26॥
ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले आधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन: जागे होत नाहीत (वृत्तीवर येत नाहीत) ॥148॥ जे मोक्षरूप परब्रह्म, आत्मज्ञान्यांचे जे साध्य, तेच ते पुरुष आहेत, असे अर्जुना तू समज. ॥149॥ असे जे देहात असतानाच ब्रह्मभावास आले, ते असे कशाने झाले, हेही विचारशील तर ते आम्ही चांगले (पण) थोडक्यात सांगतो. ॥150॥
बाह्य विषयांना दूर करून, दोन भुवयांमधे दृष्टी ठेऊन, नासिकेमधे असलेले प्राण आणि अपान यांना समान करून, ॥27॥
तरी वैराग्याच्या आश्रयानें अंत:करणातील विषय-वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. ॥151॥ इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो, तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात ॥152॥ उजव्या (पिंगळा) आणि डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती (रेचक आणि पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायू) आणि अपान (गुदस्थ वायू) यांची सुषुम्नेत समगति म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात. ॥153॥
इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो आणि इच्छा, भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत, तो सर्वदा मुक्तच समजावा. ॥28॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : भोगीं अवस्था एकी उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी…


