वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥23॥
ज्ञानियाचां हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥129॥ जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथी ॥130॥ परी तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥131॥ भोगीं अवस्था एकी उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेंसि आंठी । गाढेपणें ॥132॥ तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळी । वेगळें न दिसे ॥133॥ कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरुपें । सुरतीं तिये ॥134॥ ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ॥135॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥24॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥25॥
म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥136॥ जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखळ वोतले । सामरस्याचे ॥137॥ ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधें विहार । केले जैसे ॥138॥ ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥139॥ ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥140॥ तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळी बोल देखसी । सनागर ॥141॥ परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करीं साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ॥142॥ ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥143॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं…
अर्थ
इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतो, तोच योगी आणि तोच सुखी होय ॥23॥
आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर, या दु:खरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती आपल्या आधीन ठेवल्या आहेत. ॥129॥ त्यांना अंत:करणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. ॥130॥ परंतु पक्षी जसे फळ खातो (म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते) तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने (भोक्ता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी कायम ठेऊन) भोगण्यासारखे नाही. तर, तेथे भोक्तेपणही विसरले पाहिजे. (म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजेच तद्रूपतेचे असते). ॥ 131॥ त्या भोगांमध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की, ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो ॥132॥ पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. (म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते.) ॥133॥ अथवा आकाशात वायूचा लय झाला की ,आकाश आणि वायू हे दोन आहेत, असे म्हणता येत नाही; तसे या भागामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने रहाते. ॥134॥ अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे तर, तसे ऐक्य जाणून ,‘ऐक्य आहे’ असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे? ॥135॥
जो अंत:सुखी (आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वत:च सुखरूप बनलेला), अंतराराम (आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा), याप्रमाणे अंतर्ज्योती (ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे) असा जो योगी, तो ब्रह्मच होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. ॥24॥ ज्यांचे दोष नष्ट झालेले आहेत, ज्यांचे संशय तुटले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणिमात्रांच्या हितांविषयी जे रत आहेत, असे ऋषी मोक्ष मिळवितात. ॥25॥
म्हणून हे मागील सगळे असू दे. जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे, तोच हे मर्म सहज जाणील. ॥136॥ जे अशा सुखाने धुंद झाले आहेत आणि आपल्या ठिकाणीच ते आपण रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत, असे मी समजतो. ॥137॥ ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ॥138॥ ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ॥139॥ ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक वर्णन कोठवर करणार ? ॥140॥ तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस, तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहात नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. ॥141॥ परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर आणि सज्जनांच्या अंत:करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात:काल कर. ॥142॥ याप्रमाणे श्रीगुरूंची सूचना निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाली. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले, तेच ऐका. ॥143॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणोनि विषयभोगीं जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख


