सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून भारताने जाहीर केलं, कारण आपल्या कैक पिढ्या याच भरडधान्यावर पोसल्या गेल्या आहेत. भारतात जवळपास सर्वचं राज्यात वेगवेगळ्या प्रकारची भरडधान्य ऋतुमानानुसार आहारात समाविष्ट होत असतात. महाराष्ट्रात तर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये यांचा रोजच वापर केला जातो. माझ्या घरी मिलेट्स मी मागील पाच वर्षांपासून वापरते आहे. त्यामध्ये फॅाक्सटेल मिलेट्स, लिटील मिलेट्स, बार्नयार्ड मिलेट्स, कोदो मिलेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, बाजरी, ज्वारी, भगर, नाचणी, नागली यासारखे मिलेट्स तर आपण नेहमीच वापरत आलेले आहोत. त्यातीलच बाजरी (ज्याला पर्ल मिलेट्स असं म्हणतात) हिरवी मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, आणि तांदुळ यांचे डोसे आणि इडल्यांची रेसिपी सांगणार आहे. कुठलेही मिलेटस शिजवून खाण्याआधी ते कमीत कमी नऊ तास तरी भिजवायला हवेत, असं मिलेट्स मॅन डॉ. खादरवल्ली सांगतात. मला या मिश्रणाचे डोसे आणि इडल्या करायच्या होत्या. त्याकरिता मी बाजरी नऊ तास आधी भिजत घातली होती.
हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
साहित्य
- बाजरी – एक पेला
- मूगडाळ – पाऊण पेला
- तांदूळ – एक वाटी
- जाड पोहे – मुठभर
- मेथीदाणे – एक टी-स्पून
- मीठ – चवीनुसार
(बाजरी वेगळी नऊ तास भिजत घालावी. तर, मूगडाळ, मेथीदाणे आणि तांदूळ एकत्र करून ते सहा ते सात तास भिजत घालावे.)
कृती
- नऊ तासानंतर पाण्यात भिजवलेली बाजरी उपसून कोरड्या कपड्यावर पसरवून वाळवून घ्यावी. नंतर ती मिक्सरमध्ये रवाळ वाटुन घ्यावी.
- त्यानंतर मूग डाळ, मेथीदाणे आणि तांदूळही मिक्सरमधून रवाळ वाटावे. ते वाटतानाच त्यामध्ये मुठभर जाड पोहे मिक्स करावेत.
- आता बाजरी, मूगडाळ, तांदूळ आणि पोह्याचे मिश्रण एकत्र करावे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून ते हाताने चांगले फेटून एकजीव करावे आणि परत हे पीठ आंबवायला चार-पाच तास एखाद्या उबदार जागेवर ठेवून द्यावे.
- चार-पाच तासांनी हे मिश्रण छान फुलून येईल. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर, तुम्ही यामध्ये थोडे इनो घालू शकता. परंतु खाण्याच्या सोड्याचा वापर काही पदार्थांमध्ये गरज असेल तरच करावा. नैसर्गिकरीत्या इडली बॅटरसारखा पदार्थ जितका आंबेल किंवा फुलेल तितकं चांगलं, असं मला वाटतं.
- बाजरी आणि मूगडाळीच्या मिश्रणाचे हे इडलीचे पीठ चार-पाच तास आंबवल्यावर ते परत एकदा छान फेटून घेऊन नेहमीप्रमाणे जशा इडल्या करतो, त्याप्रमाणे इडली कुकरमध्ये इडल्या करून घ्याव्यात.
- हेच मिश्रण थोडे पाणी घालून सरसरीत करावे आणि त्याचे जाळीदार डोसे करावेत.
- हे गरमागरम डोसे आणि मऊ लुसलुशीत इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
हेही वाचा – Recipe : अंबाडीची फुले आणि पुदिन्याची चटणी
चटणीची रेसिपी
- अर्धी वाटी ओले खोबरे, तीन ते चार हिरव्या मिरच्या, मूठभर डाळवा, बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर, स्वादानुसार पुदिना, तीन ते चार लसूण पाकळ्या, एक टीस्पून जिरे, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि साखर हे एकत्र करून वाटून घ्यावे.
- त्यानंतर वरून मोहरी, हिंग, लाल सुकी मिरची, कढीपत्ता आणि सात-आठ मेथीदाणे टाकून, अर्धा चमचा उडीद डाळ टाकून चुरचुरीत फोडणी या चटणीला द्यावी.
टीप्स
- बाजरी आणि मूगडाळ तांदळाचे मिश्रण वाटताना खूप जाडसरही ठेवू नये, कारण आपल्याला त्याची इडली फुललेली तसेच स्पंजी हवी आहे. शिवाय, डोसाही जाळीदार हवा आहे.
- आपण बाजरी भिजवून, सुकवून आणि मग रवाळ (coarse) वाटतो, तेव्हा पिठात जो दाणेदारपणा येतो, तो इडलीला एक उत्तम ‘Texture’ (पोत) देतो.
- बाजरी वाळवून वाटल्यामुळे पिठातील पाण्याचे प्रमाण तुमच्या नियंत्रणात राहते. डाळ-तांदूळ वाटताना लागणारे पाणी आणि हा बाजरीचा रवा जेव्हा एकत्र होतात, तेव्हा पिठाची सुसंगतता (consistency) अगदी योग्य राहते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


