सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य पर निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥18॥
देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुति जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥307॥ जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥308॥ तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥309॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥19॥
तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥310॥ पैं चंद्रचंडांशुडोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचां डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥311॥ जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें । पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥312॥ वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥313॥ इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥314॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः । दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥20॥
कां जे भूर्लोक पाताळ । पृथिवी हन अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥315॥ तें आघवेंचि तुवां एकें । भरलें देखत आहें कौतुकें । परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥316॥ ना तरी अद्भुतरसाचां कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळी । तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ॥317॥ नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण । सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरी जग ॥318॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसें चहूं भुजांचें सांवळें, पाहतां वोल्हावती मन डोळे
अर्थ
वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. तू अव्यय आणि शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन पुरुष तू आहेस, असे मला वाटते. ॥18॥
देवा, आपण परब्रह्म आहात, आपण (ॐकाराच्या) साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहात आणि आपले ठिकाण वेद शोधित आहेत ॥307॥ जे आकारमात्रांचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार, गहन आणि अविनाश, ते महाराज आपण आहात. ॥308॥ तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचाच सिद्ध आहेस आणि नित्य नवा आहेस. तू छत्तीस तत्वांहून निराळा सदतिसावा अलौकिक पुरुष आहेस, असे मी जाणतो ॥309॥
ज्याला आदि, मध्य आणि अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे हात अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे डोळे आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने जो या विश्वाला (जणू काय) जाळून टाकीत आहे, अशा तुला मी पाहात आहे. ॥19॥
तू आदि, मध्य आणि अंतरहित आहेस. स्वत:च्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात आणि पाय आहेत, आणि तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही, ॥310॥ आणि चंद्र आणि सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या तसेच कृपेच्या लीला दाखवत आहेस आणि कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करतोस. ॥311॥ देवा, मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप पाहात आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे, तसे हे तुझे तोंड आहे. ॥312॥ वणव्याने चोहोकडून पर्वत पेटावेत, म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो, त्याप्रमाणे दात आणि दाढा चाटीत असलेली जीभ लोळत आहे. ॥313॥ या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे. ॥314॥
स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील हा (सर्व) प्रदेश (अंतरिक्ष) आणि सर्व दिशाही तू एकट्याने व्यापल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत आणि उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. ॥20॥
किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा दहा दिशा आणि सर्व क्षितीज- ॥315॥ वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहे, हे मी कौतुकाने पाहात आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर (वस्तूने) आकाशासह सर्व जग बुडवावे (तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहातो. ॥316॥ अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी चौदाही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशाकशाचे आकलन करावे? ॥317॥ तुझी (विश्वरूपाची) व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही आणि तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही. (यामुळे) सुख तर दूरच राहिले, परंतु जग आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. ॥318॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एथचीही दिठी करपत, सूर्य खद्योतु तैसे हारपत


