सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
नोहे तोचि हा शिरीं । मुकुट लेइलासि श्रीहरी । परि आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहुवें ॥294॥ तेंचि हें वरिलिये हातीं । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खुण ॥295॥ येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥296 ॥ आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणोनि जाणें ॥297॥ परि कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पवाडु नाहीं मज । चित्त होऊनि जात आहे निर्बुज । आश्चर्यें येणें ॥298॥ हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥299॥ एथचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसे हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ॥300॥ हो कां महातेजाचां महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंचां पालवीं । झांकलें गगन ॥301॥ नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचु बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचांहि डोळां । पाहवेना ॥302॥ उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदासु । पडत दिव्यचक्षूंही त्रासु । न्याहाळितां ॥303॥ हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचां ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढु । फुटला जैसा ॥304॥ तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥305॥ ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥306॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे
अर्थ
हे श्रीकृष्णा, तोच हा मुगुट आपल्या मस्तकावर धारण केला आहेस, नव्हे का? परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा, ही काही मोठी विलक्षण आहेत. ॥294॥ हे विश्वमूर्ती देवा, तेच हे चक्र वरच्या हातात फिरविण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही. ॥295॥ आणि दुसर्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? चक्र आणि गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रावाचून असून तेही, श्रीकृष्णा, घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय? ॥296॥ आणि याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर, परमेश्वरा, तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो. ॥297॥ परंतु हे नवल कसले आहे? मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही. (कारण) या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे. ॥298॥ हे विश्वरूप येथे आहे की नाही, अशा विचाराने नुसता श्वास सुद्धा घेता येत नाही. काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की, ती कशी एकसारखी दाट भरलेली आहे! ॥299॥ येथे (विश्वरूपाच्या तेजात) दृष्टी करपून जाते आणि सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात. असे या तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे. ॥300॥ जणू काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे! अथवा आकाश तर प्रलयकाळच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे. ॥301॥ अथवा प्रलयकाळच्या तेजाच्या ज्वाळा तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे. आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहावत नाही. ॥302॥ अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पाहण्यास दिव्यचक्षूलाही त्रास पडतो. ॥303॥ अथवा महाप्रलयकाळचा अग्नीचा भडभडाट, जो कालाग्निनामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची (अग्नीची) कळी उमलावी, त्याप्रमाणे पसरला आहे. ॥304॥ त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. ॥305॥ अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाचा जणू काय राशीच, असे तुझे आश्चर्यकारक रूप, माझ्या जन्मात आजच मी पाहिले. महाराज, आपल्या तेजाला आणि व्याप्तीला सीमा नाही. ॥306॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसें चहूं भुजांचें सांवळें, पाहतां वोल्हावती मन डोळे


