वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥118॥ हें विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टि- । सारिखें दिसे ॥119॥ म्हणोनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय करिती मूर्ख । न सेवितां न सरे ॥120॥ ते अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे । सांगें पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥121॥ तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळातें जलचर । सांडिती केवीं ॥122।। आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ति । धरिती जीव ॥123॥ नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट । हे विसांवेनवीण वाट । वाहावी कवणें ॥124॥ जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषी कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ॥125॥ म्हणोनि अविद्यजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥126॥ या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥127॥ पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष । निराशां तयां दुःख । दाविलें नावडे ॥128॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आपणचि अद्वय ब्रह्म, हें संपूर्ण जाणें वर्म…
अर्थ
अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमीषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही, तोपर्यंतच ठीक. त्याप्रमाणे विषयांच्या संगाची स्थिती आहे, हे तू नि:संशय समज. ॥118॥ विरक्तांच्या दृष्टीने पाहिले तर हे विषयसुख, अर्जुना, पंडुरोगामध्ये आलेल्या सुजेप्रमाणे (घातक) आहे, असे समज. ॥119॥ म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते, ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दु:खच आहे, हे समज. परंतु काय करतील मूर्ख? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. ॥120॥ ते बिचारे मूर्ख, त्या विषयांचे आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे अगत्य सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय? ॥121॥ त्या दु:खी लोकांना दु:खच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयोपभोगरूपी पाण्याला कसे टाकतील? ॥122॥ शिवाय, जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील, तर दु:खदायक योनी ज्या आहेत, त्या निरर्थक होणार नाहीत काय? ॥123॥ अथवा, गर्भात रहाणे वगैरे संकटे किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट, हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा? ॥124॥ जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर, मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कोठे मिळणार? आणि मग या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय ? ॥125॥ म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दु:खच सुख या समजुतीने स्वीकारले, त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले. ॥126॥ अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर, हे विषय वाईट आहेत. तू कदाचित चुकून कधी त्या मार्गाला जाशील, तर जाऊ नकोस. ॥127॥ जे विरक्त पुरुष आहेत, ते या विषयांना, जसे काही ते विषच आहेत, असे समजून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरिच्छ असल्याकारणाने विषयांनी दाखवलेले दु:खरूपी सुख त्यांना आवडत नाही. ॥128॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे, हे बोलणेंचि सारिखें नोहे…


