सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
देवा देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें । आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥319॥ एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥320॥ जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥321॥ तेवींचि तूतें देखिलियासाठीं । काइ सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी संकटीं । राहों केवीं ॥322॥ म्हणोनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥323॥ ऐसा माझारिलि सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥324॥ जैसा आरंबळला आगी । समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचां तरंगीं । आगळा बिहे ॥325॥ तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानसुरांचे मेळावे ॥326॥
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृणन्ति । स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघा: स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥21॥
हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें । मिळत तुजआंतु निजें । सद्भावेसीं ॥327॥ आणिक एक साविया भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥328॥ देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों । स्वर्गसंसाराचां सांकडलों । दोहीं भागीं ॥329॥ ऐसा आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥330॥ आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥331॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एथचीही दिठी करपत, सूर्य खद्योतु तैसे हारपत
अर्थ
देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली, हे कळत नाही. प्रस्तुत दु:खांच्या लाटांत तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. ॥319॥ सहज विचार करून पाहिले तर, तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय आणि दु:ख यांचा योग का व्हावा? परंतु हे (विश्वरूपाचे दर्शन) सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही, ते कारण मला (आता) कळून आले. ॥320॥ जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषयसुख चांगले वाटते. आता ज्याअर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले, त्याअर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे. ॥321॥ त्याप्रमाणे, तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय? बरे आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? ॥322॥ म्हणून (तुला मिठी न मारता) मागे सरावे, तर अनिवार असा हा जन्ममरणरूप संसार मागे सरण्याला आडवा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्याकारणाने आकळता येत नाहीस. ॥323॥ याप्रमाणे मधेच असलेल्या या संकटात (सापडलेल्या) बिचार्या त्रैलोक्याचा हुरडा होता आहे, असा माझा खरोखर अभिप्राय झालेला आहे, ॥324॥ जसा अग्नीने पोळलेला (मनुष्य) थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो, त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भितो, ॥325॥ या जगाची तशी स्थिती झाली आहे. तुला पाहून (तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर) ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत ॥326॥
हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत, कोणी भयभीत होऊन हात जोडून (तुझे) स्तवन करत आहेत. महर्षी आणि सिद्ध यांचे समुदाय ‘स्वस्ति’ असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. ॥21॥
हे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे (जी अज्ञान, वासना वगैरे ती) जाळून, आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात. ॥327॥ आणखी कित्येक जे स्वभावत: भयभीत झालेले आहेत, ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून, हात जोडून तुझी प्रार्थना करतात. ॥328॥ हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुदात पडलो आहोत आणि महाराज, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत तसेच, स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. ॥329॥ अशा आमची मुक्तता तुझ्यावाचून कोण करील? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत, असे ते म्हणतात. ॥330॥ आणि महर्षी अथवा सिद्ध (कृतार्थ पुरुष) अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे ‘तुझे कल्याण असो’ असे म्हणतात आणि स्तुति करतात. ॥331॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु


