वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्री मिळे । मग एकैक वेगळें । निवडूं नये ॥154॥ तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥155॥ जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं ॥156॥ तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे । म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥157॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदम् सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥29॥
आम्ही मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणऊनिया ॥158॥ आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥159॥
तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रंपचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥160॥ ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला ॥161॥ तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । तें काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ॥162॥ तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥163॥ म्यां जें कांहीं विवरुनि पुसावें । तें आधींचि कळलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि ॥164॥
हेही वाचा – Dnyaneshwari : भोगीं अवस्था एकी उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी…
अर्थ
तेथे, ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला (एक हे गटारातील पाणी आणि एक गंगेचे पाणी अशी) वेगवेगळी निवड करता येत नाही. ॥154॥ त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्निआकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. ॥155॥ ज्या ठिकाणी हे संसाररूप चित्र उमटते, तो मनोरूपी पडदा फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते, ॥156॥ त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळी नाहीसे झाल्यावर मग ‘मी देह’ वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले? म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. ॥157॥
यज्ञ आणि तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि प्राणिमात्रांचा मित्र मी आहे, अशा प्रकारे जो मला जाणतो, त्याला शांती प्राप्त होते. ॥29॥
जे देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून ॥158॥ आणि यमनियमांचे डोंगर आणि अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला (ब्रह्मत्वाला) पोहोचले. ॥159॥ त्यांनी स्वत:ला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य जे ब्रह्म तद्रूप ते होऊन राहिले. ॥160॥ जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला. ॥161॥ श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? ॥162॥ यावर अर्जुन म्हणाला, देवा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला ओळखलात. ॥163॥ मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा, आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोलला तेच स्पष्ट करून सांगा. ॥164॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तें परब्रह्म निर्वाण, जें आत्मविदांचें कारण…


