वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥20॥
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥103॥ तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥
ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते ॥21॥
जया आपणपे सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥105॥ सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडें अंतरें । रचिला म्हणऊनि बाहिरें । पाऊल न घली ॥106॥ सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे ॥107॥ तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपांचिं फावलें । तया विषयो सहजे सांडवले । म्हणो काई ॥108॥ एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥109॥
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥22॥
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंक कां आळुकैलें । तुषातें सेवी ॥110॥ नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥111॥ तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥112॥ एऱ्हवीं विषयीं काइ सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥113॥ सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसें अभ्रछायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥114॥ म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महुर कां म्हणिजे । विषकंदातें ॥115॥ नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥116॥ हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ॥117॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं…
अर्थ
प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पावू नय, (अशी समदृष्टी ज्यांची आहे) तोच स्थिरबुद्धी, मोहरहित, ब्रह्म आणि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर आहेत. ॥20॥
मृगजळाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत (किंचितही) ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता, ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत; ॥103॥ तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना, तोच ते ब्रह्म. ॥104॥
बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्यांचे अंत:करण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे, ते मिळते. तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त झालेला पुरुष अक्षय्य सुखाचा अनुभव घेतो. ॥21॥
जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, (म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करीत नाही), तो विषय सेवन करीत नाही, यात आश्चर्य ते काय आहे? ॥105॥ अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंत:करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. (विषयांकडे प्रवृत्त होत नाही.) ॥106॥ सांग, कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो वाळूचे कण चाटत बसेल काय? ॥107॥ त्याप्रमाणे ज्याला स्वत:च आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले, हे काय सांगावयास पाहिजे? ॥108॥ एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात? ॥109॥
विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे भोग, ते दु:खालाच कारण होतात. कारण, त्यांना आदि आहे आणि अंत आहे. हे कौंतेया, ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रममाण होत नाहीत. ॥22॥
ज्याप्रमाणे भुकेलेला दरिद्री पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. ॥110॥ अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खर्या पाण्याला विसरून (मृगजळाला) पाणी आहे, असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. ॥111॥ तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहेमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. ॥112॥ एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्याच्या देखील योग्यतेचे नाही. नाहीतर, विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही? ॥113॥ सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा (खटाटोप) का करावा? ॥114॥ म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला (बचनागाला) मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे, असे जे म्हणतात ती (विषयांचे खरे स्वरूप न जाणताच) व्यर्थ केलेली बडबड आहे (असे समज). ॥115॥ किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, (पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो) किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणार्या अनुभवाला ‘सुख’ म्हणणे व्यर्थ बडबड आहे. ॥116॥ हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फणाची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे? ॥117॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आपणचि अद्वय ब्रह्म, हें संपूर्ण जाणें वर्म…


