वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाचवा
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥87॥ ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें । तयांची समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ॥88॥ एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥89॥ परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥90॥ नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥91॥ हें असो संतापु कैसा । चंद्र न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥92॥
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पण्डिताः । समदर्शिनः ॥18॥
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ॥93॥ ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥94॥ एथ भेदु तरी कीं देखा । जरी अंहभावा उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषम काई ॥95॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥19॥
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥96॥ जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परि भोगिली निसंगता । कामेंविण ॥97॥ जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । परि सांडिले निदसुरें । लौकिकु हें ॥98॥ जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरी तो परि संसारु । नोळखें तयांतें ॥99॥ हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळे । कल्लोळ हे ॥100॥ तैसें नाम रूप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥101॥ ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥102॥
हेही वाचा – Dnyaneshwari : तो जयाकडे वास पाहे, तेउती सुखाची सृष्टि होये…
अर्थ
आत्मज्ञानासंबंधी त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे, साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्णब्रह्माकार ठेऊन तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ॥87॥ असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा शोध करीत आले आहे (ज्यांना प्राप्त झाले आहे), त्यांची जी समतादृष्टी होते, तिचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू! ॥88॥ ते जसे आपल्यालाचा ब्रह्मरूप पहातात, ते जसे सर्व जगाला (ब्रह्मरूप) पाहातात, हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे? ॥89॥ परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहात नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे भ्रांतीला जाणत नाही. ॥90॥ किंवा अंधकाराचा प्रकार ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही ॥91॥ हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. ॥92॥
विद्या आणि विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. ॥18॥
मग (त्यांचे ठिकाणी) हे चिलट आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलिकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार? ॥93॥ अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच (हे कोठले?) हे राहू दे. जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार? ॥94॥ आणि जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार (तर) अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला? ॥95॥
(अशा) समदृष्टीमध्ये ज्यांचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. कारण ब्रह्म (सर्व भूतांच्या ठिकाणी) सम आहे आणि (विषमतारुपी) दोषरहित आहे. यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल (स्थिर) झालेले असतात. (आणि म्हणून ते सर्वत्र सम आहेत). ॥19॥
म्हणून सर्व ठिकाणी, सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत, हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो. ॥96॥ ज्यांनी विषयांचा संबंध न टाकता आणि इंद्रियांचे दमन न करता निरिच्छ असल्यामुळे अलिप्तता भोगली. ॥97॥ जे लोकांना अनुसरून, लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणार्या अज्ञानाचा त्याग केला आहे; ॥98॥ ज्याप्रमाणे पिशाच्च जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. ॥99॥ हे राहू दे, वार्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी (लाटारूपाने) खेळते, (पण) लोक त्यास या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत, असे म्हणतात. ॥100॥ त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे. ॥101॥ अशा तर्हेने जो समदृष्टीने असतो, त्या पुरुषाला (ओळखण्याचे) लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर, ॥102॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं…


