वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पाच
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सकृतं विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥15॥
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखे । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ॥80॥ पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥81॥ तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरीं । ते अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥82॥
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवत् ज्ञान प्रकाशयति तत् परम् ॥16॥
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचें ॥83॥ एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसे मानले जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥84॥ ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं । देखे आपुलिया प्रतीती । जगचि मुक्त ॥85॥ जैशी पूर्वदिशेचां राउळीं । उदयाची सूर्ये दिवाळी । की येरींहि दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥86॥
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः । गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥17॥
हेही वाचा – Dnyaneshwari : योगिये तोही करिती, परी कर्में तेणें न बंधिजती…
अर्थ
ईश्वर कोणाचे पाप घेत नाही आणि पुण्यही घेत नाही, अज्ञानाने ज्ञान आच्छादिलेले आहे, म्हणून प्राणी मोह पावतात. (म्हणजे ईश्वरच सर्व कर्ता आहे, असे समजतात) ॥15॥
(प्राणिमात्राकडून होणारी संपूर्ण) पापपुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असून, तो त्यांना जाणत नाही. (फार काय) तो त्यांचा साक्षीही होऊन राहात नाही तर, मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे? ॥80॥ सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. ॥81॥ तो उत्पन्न करतो, पालन करतो आणि संहार करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक. ते केवळ अज्ञान आहे. ॥82॥
पण ज्यांचे ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान (सर्व वस्तूंच्या ठिकाणी) पर जी वस्तु आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. ॥16॥
ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व प्रतीतीला येते. ॥83॥ आणि ईश्वर एक अकर्ता आहे, असे चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत: तोच (ईश्वरच) मी आहे. (तर मीही उघडच अकर्ता आहे) ॥84॥ अशा विचाराने चित्तात उदय केला असता, त्याला तिन्ही लोकांत भेद कशाचा? तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे, असे पहातो. ॥85॥ ज्याप्रमाणे पूर्वदिशेच्या राजवाड्यात सूर्योदयरूपी दिवाळी झाली असता, त्याच वेळेला दुसर्याही दिशांतील काळोख नाहीसा होतो. ॥86॥
ज्यांची बुद्धी परब्रह्माचे ठिकाणी रंगली आहे, ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे, त्यांच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे (तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत), आणि जे तत्परायण आहेत (त्याचाच निजध्यास ज्यांची बुद्धी करते;) (अशा रीतीने) ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष नाहीसे झाले आहेत, त्यांना पुन्हा संसार (जन्ममरण) प्राप्त होत नाही. ॥17॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तो जयाकडे वास पाहे, तेउती सुखाची सृष्टि होये…


