सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणि पेरिले ॥582॥ ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥583॥ मग देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥584॥ जी कल्पादीलागोनी । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुलीं होउनी । गेलीं जन्में ॥585॥ तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥ बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥587॥ तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥588॥ तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरि माझें मन झालें । हृष्ट देवा ॥589॥ परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥590॥ ते येचि स्वरूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे । आणि कोणा खेंव देइजे । तुज लेख नाहीं ॥591॥ म्हणोनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ॥592॥ यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणोनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥593॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता
अर्थ
ज्या अमृताच्या थेंबाकरिता कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण चार महिने पाडलात आणि सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तीमध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात (फणांच्या रेषात) चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत ॥582॥ महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत आणि जे शंकर आणि ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही, ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविलेत. ॥583॥ मग ते त्यांना (प्रत्यक्ष) पाहावयाची गोष्ट कशाला पाहिजे? ज्यांचे उपनिषदांना दर्शन नाही, अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केली. ॥584॥ महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून (एवढ्या काळात) माझे जितके जन्म होऊन गेले, ॥585॥ त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहात आहे, पण ही गोष्ट (विश्वरूपाचे दर्शन) ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. ॥586॥ बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या (विश्वरूपाच्या) अंगणातसुद्धा येत नाही आणि अंत:करणाला कल्पनासुद्धा करता येत नाही. ॥587॥ अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे, ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे? फार काय सांगावे? हे पूर्वी कधीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही, ॥588॥ ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा, माझे मन आनंदित झाले. ॥589॥ परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की, तुझ्याशी गोष्टी कराव्यात आणि तुझे सान्निध्य भोगावे आणि तुला आलिंगन द्यावे. ॥590॥ या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले, तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे? आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे? ॥591॥ एवढ्याकरिता वार्याबरोबर पळणे जमणार नाही आणि आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी? ॥592॥ याकरिता हे श्रीकृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की, आपण प्रकट केलेले विश्वरूप आता परत आवरून घ्यावे. ॥593॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध


