भाग – 3
तयार मूर्तीला बॉडी कलर देऊन झाल्यानंतर, गणरायाला सजवायला बाप्पाला खूप आवडायचं. उत्तम रंगसंगती साधून शेला, कद तो नयनरम्य करायचा. मुकुट, कंठी, गळ्यातले इतर दागिने, दंडावरचे, हातातले दागिने, सोंडेवरचं नक्षीकाम, कोरीव प्रभावळ – महिरप; सगळं बाप्पा मनापासून करायचा. लाल, हिरवे, डाळिंबी, हिऱ्यासारखे चमकदार खडे वापरून तो गणपती बाप्पाचं सौंदर्य चमकवून टाकायचा.
मधल्याकाळात पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागल्याने पीओपीच्या मूर्तीविरुद्ध जनजागृती व्हायला लागली. पर्यावरणस्नेही मूर्तींची गरज आणि मागणी वाढली. पण पर्यावरण ऱ्हासाने सगळ्यांचाच घास घेतला होता. गणपतीसाठी लागणारी शाडूची माती दुर्मीळ व्हायला लागली. ही मूर्ती बनवायला खास कारागीर, कलाकार लागतो. साचा वापरून पीओपीची मूर्ती कोणीही, साधारण कसब असणारा बनवू शकतो. पण मातीचा गणपती बनवायला, मूर्तीकला अवगत असणारा खास कारागीरच लागतो. असे मूर्तिकार आता कमी झाले आहेत. शाडूच्या मूर्तीच्या काही मर्यादाही आहेत. तीन फुटांपेक्षा उंच मूर्ती बनवता येत नाहीत, त्या तडकू शकतात. त्यांचं वजन जास्त असतं. वाहतूक अवघड असते. या सर्व समस्यांचं निराकरण करता करता मूर्तीची किंमतही वाढते. सर्वसामान्य गणपती कारखान्यांना ते परवडत नाहीत. त्यांच्या आवाक्याबाहेर जातात.
बाप्पाच्या घरी पीओपीच्याच साच्यातील मूर्ती हमरापूरहून आणल्या जायच्या. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रंगकामाचा मुहूर्त व्हायचा. एकावर्षी घरापासून काही अंतरावरचं जुनं, पडीक गॅरेज त्यांना काही महिन्यांपुरतं भाड्याने मिळालं होतं. ताडपत्र्या, जाड प्लास्टिकचे तागे लावून पाण्याचा थेंब आत येणार नाही, याचा बंदोबस्त केला होता. कडेने सर्व मजलेवाल्या घडवंच्या लावल्या होत्या. त्यावर पांढऱ्या रंगहीन मूर्ती हारीने मांडल्या होत्या. रंग, वर्ख, निरनिराळ्या आकाराचे ब्रश, स्प्रे, मूर्ती रंगवताना लागणारा गोल फिरणारा पाट… सर्व जय्यत तयारी होती.
हेही वाचा – गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…
अपरात्री गाढ झोपेत असताना, खोल विवरातून आल्यासारखा आवाज त्याच्या कानावर आदळला. “बाप्पा, ऊठ! ऊठ! अरे, घुसमटतोय. नाका-तोंडात पाणी शिरतंय. ऊठ, बाप्पा ऊठ!” बाप्पा खडबडून जागा झाला. सगळं घर गाढ झोपलं होतं. बाहेर आडवा-तिडवा पाऊस पडत होता. चाळीचे पत्रे थाडथाड उडत होते. त्यावर पावसाच्या धारांचा अक्राळविक्राळ थयथयाट चालला होता. बाप्पा हडबडला.
‘अशी कशी कळीकाळासारखी झोप लागली?” त्याच्या डोक्यात क्षणार्धात विजा चमकल्या. तो ताडकन उठला. “देवा, देवा, अरे काय करून ठेवलंस हे! माझा बाप्पा… माझा बाप्पा…” दिवा देखील न लावता त्याने दार उघडलं. ओट्यावर उंबरठ्यामुळे थोपलेलं पाणी भसकन् आत शिरलं. तोपर्यंत गोंधळामुळे अख्खं घर जागं झालं होतं. घरातले दिवे लागले. अंधारातच, अनवाणी गॅरेजकडे धावत सुटलेल्या बाप्पाच्या मागे सगळं घर धावलं. धावता धावता शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या घराची दारं बडवत, हाकारे घालत सगळे धावत होते.
जमिनीवर फक्त सिमेंट ओतून तयार केलेल्या गॅरेजमध्ये तळातून पाणी घुसलं होतं. घडवंचीच्या तळाच्या कप्यातील गणपतीच्या सर्व मूर्ती भिजल्या होत्या. सगळे चाळकरी मदतीला आले. उरीपोटी उचलून, मिळतील ती आच्छादनं घालून सर्व मूर्ती सुरक्षित जागी आणल्या. मिळतील त्या निवाऱ्याच्या जागी ठेवल्या. वाचवता येईल तेवढं इतर सामान वाचवलं. त्यावर्षी आलेला तो अवकाळी पाऊस दोन दिवस कोसळत होता. सर्वांच्या तोंडचं पाणी त्याने पळवलं.
हेही वाचा – गणरायाचे डोळे रंगविण्याचे कौशल्य
गणपतीच्याच कृपेने काम सुरू झालं. मुहूर्त गाठता आला. पण त्या दिवशी पाण्यात भिजल्यामुळे आई आजारी पडली. तिच्या प्रकृतीच्या काळजीपेक्षा सर्वांच्या मनात पहिली धास्ती उभी राहिली, ‘आता स्वयंपाक कोण करेल? चुलीसमोरच वेळ द्यावा लागला, तर गिऱ्हाईकांच्या मागण्या वेळेवर पूर्ण कशा करणार?’ आई बरी होतेय तोवर नेमका चुलत भाऊ मन्याला अपघात झाला. कुठे, कसा, कितपत लागलंय… हे सर्व मनात येण्याच्या आत, प्रथम डोक्यात विचार आला, “मरतोय की काय? आता डोळे कोण रंगवणार?” बाप्पाला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं… ‘गणपती आपलं सर्वस्व आहे, हे खरं आहे; पण त्याच्यासमोर मायेच्या माणसांची काळजी पण आपल्याला वाटू नये? त्यांच्या प्राणापेक्षा आपल्याला आधी आपलं काम आठवावं! एवढे आपण अमानुष, स्वार्थी कधी आणि कसे झालो?’ बाप्पा शरमिंदा झाला! देवाच्या दयेनं सर्व व्यवस्थित झालं. आई स्वयंपाक करू शकली. गणरायाचे डोळे मन्यानेच रंगवले… गिऱ्हाईकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या. सगळ्यांना संतोष झाला. पण बाप्पा स्वतःच्या नजरेतून उतरला. त्यानंतर तो पुन्हा कधी हमरापुरला गेला नाही. तिरीमिरीत त्याने निर्णय घेऊन टाकला. नकोच ते दरवर्षीचे टेन्शन! गणपतीचा कारखाना बंद झाला.


