शिवथर घळीच्या ट्रीपला निघालो होतो. पावसाळा संपत आला होता. आमच्याबरोबर वनस्पतीचे अभ्यासक श्री. पंचवाघ सर होते. ब्रेकफास्टसाठी आम्ही एका हॉटेलला थांबलो. त्याच्या दारातच बुचाच्या फुलांचे झाड होते. खाली फुलांचा सडा पडला होता. आम्ही ती पटापट वेचली… त्यांचा मंद सुगंध मला फार आवडतो. सरांनी पण फुलं घेतली आणि म्हणाले,
“या फुलांना तुम्ही बुचाची फुलं म्हणता, पण याचं खरं नाव काय आहे माहीत आहे का?”
आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. सर थोडे पुढे आले. दोन्ही हात पसरून वर बघत म्हणाले,
“हा वृक्ष खूप उंच उंच जातो. त्याची फुलं आकाशाच्या पार्श्वभूमीवरच दिसतात. म्हणून या फुलांचे नाव आहे ‘आकाशफुले’…”
त्यांनी वृक्षाची माहिती सांगितली. या वृक्षाचे आतले खोड मऊ असते, त्यामुळे काचेच्या बाटल्यांची बुचं बनवायला याचा उपयोग करतात. म्हणून त्याला बुचाचे झाड असे म्हणतात.
आम्ही सगळ्यांनी माना वर करून बघितलं… आकाशफुले! खरंच हे किती सार्थ नाव आहे… आत्तापर्यंत हे आम्हाला माहीत नव्हते. आज समजल्यावर एक नवीन आनंद मिळाला. हा शब्द मला फार आवडला. तो अगदी चपखल आहे.
हेही वाचा – आठवणींची पेटी… वाट शाळेची!
माझ्या बाल्कनीतून हे झाड दिसते. असंख्य पोपट सकाळी त्यावर येतात. अत्यंत विलोभनीय असे ते दृश्य असते. तसचं या वृक्षाशी माझा खूप जुना ऋणानुबंध आहे…
माझ्या शाळेच्या वाटेवर हे झाड होते. माझी मैत्रीण उषा, तिची आजी या फुलांची वेणी गुंफायची. आम्हाला ती जमायची नाही. शाळेतून येताना आम्ही फुलं आणत असू… आजीला ती वेणी बनवताना बघणं, याचं सुद्धा तेव्हा आम्हाला अप्रूप वाटायचं. शाळेतून यायला उशीर झाला की, मी उषाकडे असणार हे आईला समजायचे…
शाळेतल्या कटककर बाई आमच्या फार लाडक्या होत्या. त्या अंबाडा घालायच्या. एकदा त्यांच्यासाठी वेणी न्यायची आम्ही ठरवलं. गुरुवारी त्यांचा पहिला तास असायचा… त्या दिवशी आम्ही आधी जाऊन फुलं घेऊन आलो. उषाच्या आजींनी सुरेख वेणी बनवून दिली. उषा ती अलगद हातात घेऊन आली. बाईंना ती दिली. त्या गोड हसल्या… त्यांनी आजींचं कौतुक केलं. वेणी अंबाड्यावर माळली… आम्हाला खूप खूप आनंद झाला…
अशी ही बुचाची फुलं! अहं… आता त्यांना मी नेहमी ‘आकाशफुले’च म्हणते… रस्त्यात कुठे दिसली तर तुम्ही बघा. म्हणजे मी काय म्हणते ते तुम्हाला समजेल… फार सुरेख असतात ही आकाशफुले. सध्या ही झाडं फुलांनी अक्षरशः लगडलेली आहेत. त्याची असंख्य फुले खाली पडलेली असतात. ती दिसली की, सहज जाता जाता थोडं थांबायचं… खाली वाकून चार फुलं हातात घ्यायची त्यांचा वास घ्यायचा…
आज या फुलांनी मला शाळेच्या वर्गात नेलं आणि आभाळभर आनंद दिला. मैत्रिणी, बाई, आजी, आई… सारं काही आठवलं. खरोखर आपण कधीच काही विसरलेलो नसतो. मनात खोलवर कुठेतरी ते असतंच… काही निमित्त मिळालं की, ते असं आपसूक बाहेर येतं. आयुष्य म्हणजे तरी काय असतं? अशा छोट्या छोट्या आठवणींचा एक संग्रह असतो. असा हाताशी असलेला सहजानंद घेऊन जगत रहायचं… नाहीतरी जगायला अजून काय हवं असतं?
हेही वाचा – पावसाळा
निसर्गाने आपल्या रोजच्या चालण्याच्या वाटेवर अशी फुलांची पखरण करून ठेवलेली आहे. तो भरभरून देतो आहे, आपण घ्यायला शिकू… त्याच्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागत नाही, मनात आस धरायची आणि फुलांच्या वाटा शोधायच्या… कुठे? कसं? कधी जायचं? हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचे… आतून ओढ लागली की निघायचं… आणि डोळे उघडे ठेवून बघायचं… मग ते कुठेतरी दिसतंच… या वाटा सुखाच्या आणि मनाला समाधान देणाऱ्या आहेत.
एक सांगू – या वाटांवरून एकदा चालून अनुभव घेऊन बघा ना!


