भाग – 1
“हल्ली मुलींच्या आई-वडिलांना नेमकं काय झालंय, हेच समजेनासं झालंय. मुलीचं लग्न ठरवताना त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात की, मुलाचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. जावयाला सरकारी नोकरी हवी. फक्त नोकरी नव्हे, तर मोठ्या पदावरची हवी. पगार भरपूर हवा. गावाकडे जमीन हवी. शहरात फ्लॅट हवा. चार चाकी गाडी हवी. भविष्यात अजून मोठं पद मिळणार, याची खात्री हवी. आई-वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. मुलगा नम्र, आज्ञाधारक आणि मुलीला ‘राणी’सारखं ठेवणारा हवा. मुलीच्या माहेरच्यांनी त्याच्या स्वाभिमानावर रोज पाय ठेवला तरी, तो हसतमुख रहायला हवा!
एकूणच काय तर मुलीच्या आई-वडिलांना मुलगा नको असतो… त्यांना एक ‘पॅकेज’ हवं असतं. बरं, पॅकेज तर पॅकेज… परंतु त्या पॅकेजमध्ये प्रेम, स्वभाव, माणुसकी, समजूतदारपणा हे घटक कमी असतात. ‘अपेक्षा’ हा घटकच फार मोठा असतो. त्यामुळे अनेक चांगली स्थळं केवळ दिखाऊपणा आणि अवास्तव मागण्यांच्या ओझ्याखाली चिरडली जातात. म्हणूनच आजकाल लग्न ठरवण्याचा कार्यक्रम म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन कमी आणि एखाद्या उमेदवाराची उच्चस्तरीय चौकशी जास्त वाटते. पण आयुष्याची गंमत अशी असते की, तुम्ही कितीही चौकशी करा, मुलगा- मुलगीचा स्वभाव, संस्कार, कुटुंबाच्या चालीरीती, माणुसकी आणि जुळवून घेण्याची वृत्ती नसेल तर, लग्नाच्या भवितव्याचा निकाल ठरलेला असतो…”
स्कॉर्पियो गाडीत ड्रायव्हर शेजारी बसलेले महेशराव तावातावाने बोलत होते. पाठीमागच्या सीटवर आनंदराव दादा, शरद नाना, मानकर आण्णा, दिलीप बिरुटे, नारायण आप्पा आणि पांडुरंग काका हे दाटीवाटीने बसले होते. रस्ता हायवेचा होता. काळ्या रंगाची स्कॉर्पियो सुसाट वेगाने पळत होती. थोड्या अंतरावर चढ लागला आणि ड्रायव्हरने गियर बदलला. खिडकीची काच खाली घेत पांडुरंग काका म्हणाले, “आता तरी गरीब आणि समजूतदार कुटुंब आहे ना? नाहीतर अव्वाच्या सव्वा अपेक्षा असल्या म्हणजे मागचं तेच पुढं? या तीन महिन्यांत हे सहावं स्थळ बघायला निघालोय आपण.”
हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!
“घेरडीच्या पाहुण्याने चौकशी तर केली आहे. तो म्हणाला की, साधी रहाणीमान आहे. उच्चशिक्षित कुटुंब आहे. फार अपेक्षा नाहीत.”
त्यांना मधेच तोडत, शरद नाना म्हणाले, “देव करो आणि मागचा अनुभव न येवो.”
सर्वजण हसायला लागले. परंतु महेशराव मात्र चिंतीत झाले. त्यांना मागचा प्रसंग जसाच्या तसा आठवला…
बरोबर तीन महिन्यांपूर्वी आजच्यासारखेच संदीपसाठी स्थळ पहायला गेलो होतो. संदीप देशमुख. माझा पुतण्या, म्हणजे थोरल्या भावाचा मुलगा. गावाकडच्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आला. घरात पैशांची श्रीमंती नव्हती. मात्र, संस्कारांची श्रीमंती होती. वडील कष्टकरी होते. आई साधीभोळी आहे. लहानपणापासून हुशार आहे तो. पाचवीला असताना प्रवेश परीक्षा दिली आणि नवोदयमध्ये निवड झाली. गावातल्या चिखलातून, कंदिलाच्या उजेडातून, आईच्या कष्टाच्या भाकरीतून आणि वडिलांच्या फाटलेल्या अंगरख्यातून तो पुढे गेला.
त्याने रात्रीचा दिवा करून अभ्यास केला. खूप संघर्ष केला. अपयश आल्यावर पुन्हा प्रयत्न केला. सगळं सहन करून तो उभा राहिला. कधी कधी वडापाव खाऊन दिवस काढले, पण तो ढळला नाही. एलएलबी झाला. ‘रुनवाल’ या जगप्रसिद्ध रियल इस्टेट कंपनीमध्ये ‘लॉ ऑफिसर’ या पदावर त्याची निवड झाली. कुणालाही सहजासहजी मिळत नाही, अशी नोकरी त्याने मिळवली. त्या दिवशी त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, “बाळा, आज तुझ्या बापाच्या आयुष्याचं सार्थक झालं.” त्याने आईच्या चरणी माथा टेकला. उठून म्हणाला, “आई, मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. मी स्पर्धा परीक्षा देणार. नक्की क्लास वन अधिकारी होणार.”
संदीपच्या यशाने गाव उजळलं. नातेवाईकांची गर्दी वाढली. ज्यांनी पूर्वी वडिलांच्या माघारी याचे काय होणार? असे प्रश्न उपस्थित केले होते, तेच आता म्हणू लागले, “आमचा संदीप, साहेब झाला!”
आणि मग सुरू झाला… लग्नाचा विषय.
स्थळं येऊ लागली. फोटो, बायोडाटा, चौकशा, नातेवाईक, मध्यस्थ… जणू मुलगा नव्हे, तर एखाद्या मालमत्तेचा लिलाव सुरू आहे, असा भास व्हायला लागला. कोणाला सरकारी नोकरी हवी होती. कोणाला मोठं घर हवं होतं. कोणाला शहरात फ्लॅट हवा होता. कोणाला मुलगा दिसायला गोरा हवा होता, तर कोणाला “अजून वरची पोस्ट मिळणार आहे ना?” याची खात्री हवी होती.
संदीप मात्र शांत होता. तो आईला एकच म्हणायचा, “आई, मुलगी स्वभावाने चांगली असावी. घर गरीब असो, श्रीमंत असो, मला काही फरक पडत नाही. पण स्वभाव आणि संस्कार महत्त्वाचे.” आई हसायची. “तुझ्यासारखा साधा मुलगा आहे म्हणून हे बोलतोस. पण जग इतकं साधं राहिलेलं नाही रे.” आईचं ते वाक्य किती खरं आहे, याचा अनुभव त्याला लवकरच यायला लागला.
एके दिवशी गडहिंग्लज गावचं स्थळ आलं. मुलगी पदवीधर होती. दिसायला छान. घरची परिस्थिती बेताची. वडील एका छोट्या सहकारी संस्थेत कारकून. आई गृहिणी. नातेवाईकांच्या माध्यमातून बोलणी पुढे गेली. “मुलगी चांगली आहे.” मध्यस्थाने सांगितलं. “घर जरी साधं असलं तरी लोक थोडे चौकस आहेत… पण तुमच्या मुलासाठी योग्य स्थळ आहे. जमून जाईल. आजकाल थोडीफार चौकशी सगळेच करतात.”
आम्ही गडहिंग्लजला गेलो. रतनबापू मध्यस्थी होते. आमची वाट पाहत ते बसस्थानकावर उभे होते. आम्ही बसस्थानकावर गेलो. त्यांना गाडीत घेतले. थेट मुलीच्या घराकडे गेलो.
रतनबापूंनी मुलीच्या अंगणातच गाडी उभा केली. आम्ही खाली उतरलो. घर साधंच होतं. पण अंगण मात्र ऐसपैस होतं. अंगणातच उजवीकडच्या कोपऱ्यात नळ होता. आम्ही हात पाय धुतले. तोपर्यंत गोविंदराव बाहेर आले. रतनबापूनी त्यांची ओळख करून दिली. म्हणाले, “हे मुलीचे वडील.” आम्ही सर्वांनी नमस्कार केला. त्यांच्या मागोमाग आत गेलो.
छोट्या हॉलमध्ये बरेच लोक बसले होते. काही महिला पण बसल्या होत्या. ते सर्वजण नीटनेटके होते. रतनबापूंनी दोन्हीकडील लोकांच्या एकमेकांशी ओळखी करून दिल्या. वातावरण सैल झालं. तोपर्यंत चहा आला. चहा घेत घेत पाऊसपाणी, शेतमालाला दर अशा ओघाने गप्पा सुरू झाल्या.
सुरुवातीला मुलीच्या वडिलानी, गोविंदरावनी खूप नम्रपणे विचारलं, “साहेब, पगार किती आहे सध्या?” संदीपने हसत उत्तर दिलं, “कंपनीचा पगार आहे. नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा.”
मुलीची आई थोडी पुढे झुकली, “हं… आणि वरचे काही असते का?”
संदीपला प्रश्नाचा अर्थ कळला. पण त्याने शांतपणे उत्तर दिलं, “आई, मी पगारावर जगतो. बाकी काही सवय नाही.”
क्षणभर वातावरण गारठलं. मग दुसरा प्रश्न. “जमीन किती आहे गावाकडे?” संदीपच्या काकांनी, महेशरावनी साधेपणाने सांगितलं, “चार एकर आहे. पावसावर आहे. फार काही उत्पन्न नाही. पण आमचं पोट भरतं.”
“फक्त चार एकर?” मुलीच्या मामांनी भुवया उंचावल्या. संदीपने मनातल्या मनात दीर्घ श्वास घेतला. महेशराव म्हणाले, “परंतु मुलगा ‘लॉ ऑफिसर’ आहे. तो अजूनही स्पर्धा परीक्षा देत आहे. तो आज ना उद्या न्यायाधीश होणार आहे.”
नंतर प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली. फ्लॅट आहे का? गाडी कोणती आहे? पुढे बदली कुठे होऊ शकते? आई सोबत राहणार का? मुलगा किती खर्चिक आहे, नातेवाईक कसे आहेत. आमच्या शिकलेल्या मुलीला नोकरी लावणार का? तिने नोकरी केली तर घरामध्ये स्वयंपाक कोण करणार?… असे एकामागून एक प्रश्न. जणू लग्नाची बोलणी नव्हती, एक उच्चस्तरीय चौकशी आयोग बसला होता.
तरीही संदीप शांत होता. मुलगी मात्र जास्त बोलत नव्हती. ती आईकडे पाहूनच उत्तरे देत होती. तिच्या चेहऱ्यावर स्वतःचं मत नसल्याची सावली दिसत होती. थोड्या वेळाने मुलीची आई म्हणाली,
“आम्हाला ऐकिवात आलंय की, तुम्ही सहावीनंतर नवोदयला होता?” संदीपने मान हलवली. “हो. निवड झाली होती.”
“मग खरंच होता काय? कारण आजकाल लोक खूप काही सांगतात. आम्ही चौकशी करून घेऊ का? काही हरकत नाही ना?”
हे वाक्य ऐकताच खोलीत काही क्षण अगदी शांतता पसरली.
संदीपच्या आईच्या चेहऱ्यावर अपमानाची रेषा उमटली. ती गोष्ट महेशरावांच्या जिव्हारी लागली. संदीपच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. रतनबापू तर खूप अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी उमटली. संदीपने मात्र हळूच पाण्याचा ग्लास उचलला. एक घोट घेतला आणि अतिशय स्थिर आणि शांत आवाजात म्हणाला, “चौकशी जरूर करा. सहावीला नवोदयला होतो की नाही, तेही तपासा. सहावीतल्या प्रगतीपुस्तकापासून ते बारावीच्या मेरिट लिस्टपर्यंत सगळं पाहा. आमची काही हरकत नाही.”
हेही वाचा – दादू… लेकीच्या उदारपणाने गाव गहिवरला
महेशरावांनी अजूनही खाली मान घातली होती. मुलाच्या कष्टाची, मुलाच्या प्रामाणिकतेची, घरच्या संस्कारांची, सगळ्याचीच जणू खिल्ली उडाली होती. त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाला, मुलाच्या प्रामाणिकपणाला, घरच्या संस्कारांना जणू कोणी उघडपणे संशयाच्या कचऱ्यात फेकून दिलं होतं. मुलाच्या सध्याच्या नोकरीबाबत, पगाराबाबत चौकशी करणं, आपण समजू शकतो. परंतु तो पाचवीला असताना काय करत होता? सहावीला असताना मार्क किती होते? याची चौकशी करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट होती. कोणी काही बोललं नाही. त्या भेटीचा शेवट औपचारिक हसण्यात झाला.
घरी परतल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आलं.
“संदीप बाळा, एवढं सगळं करूनही आपल्याला लोक मोजतात… जमीन, पगार, नवोदय, वरची कमाई…” संदीपने आईचा हात धरला. “आई, त्यांना काय मोजायचं ते मोजू दे. आपण स्वतःला विकायला बसलो नाही. तू कशाला काळजी करतेस?”
दुसऱ्या दिवशी मध्यस्थाचा, रतनबापूंचा संदीपला फोन आला. “त्यांना काय सांगू साहेब… मुलीकडून अजून थोडी चौकशी बाकी आहे. नवोदयची खात्री, पदाची खात्री, पुढे प्रमोशनची शक्यता… त्यांना थोडा वेळ द्या. बाकी त्यांना स्थळ बऱ्यापैकी पसंत आहे.” संदीपने निर्विकारपणे उत्तर दिलं. “नको बापू. मला अशा प्रकारची मुलगी पण नको… आणि अशा प्रकारचे मुलीचे आई-वडील पण नकोत.”
फोन कट झाला. त्या एका वाक्यात त्याने फक्त नातं नाही तोडलं, तर स्वतःचा स्वाभिमान वाचवला.


