भाग – 26
“चला… चला… पटकन नाव घ्या दोघे आणि लवकरात लवकर प्रवेश करा घरात,” आजी अजून काही बोलण्यापूर्वी घाई करत आकाश म्हणाला.
“काय नाव घ्या? मला असलं काही येत नाही… मॉम जे काही असेल ते पटकन उरक… मला जाम कंटाळा आलाय इथे उभं राहून!” शिव वैतागून म्हणाला.
“अजिबात नाही… जोपर्यंत तुम्ही उखाणा घेत नाहीत, तोपर्यंत मी घरात येणारं नाही…” आरूने आता आजीवरचा राग शिववर काढत म्हटलं.
त्यावर त्याच्या भुवया उंचावल्या… पण काही क्षणच! समोर आरू होती, ती कधी कशी वागेल, कधी काय बोलेल याचा नेम नव्हता… त्याच्या बाबतीत तर तिचा मूड कधीही आणि कसाही बदलत होता… त्यात त्याचा राग आलेला तिला.
“क्या बात वहिनी… सही हैं,” समर मोठ्याने हसत म्हणाला.
“सुधाsss” आतून पुन्हा आजीचा करारी आवाज आला.
तसं सुधा यांनी त्यांच्या आवाजाचा हेतू समजून घेत नुसतं “हो आई” एवढंच म्हणाली.
“शिव घे ना उखाणा… येऊदे तिला आत, थकली असेल ती… किती वेळ ताटकळत ठेवायचं तिला दारात,” सुधा तिच्याकडे पाहून हसत काळजीने म्हणाल्या.
हेही वाचा – शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!
आता सगळे शिवकडे पाहायला लागले. आरूने पण त्याच्याकडे पाहिलं, हसतच डोळ्यांनी त्याला चिडवलं.
“ओके, I will try…” असं म्हणतं त्याने थोडा विचार केला आणि तिच्याकडे पाहिलं…
एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला… “चंद्राला सोबत चांदणीची, सूर्याला सोबत आगीची, तशी मला मिळाली सोबत आराधनाची…” (स्वरचित)
तो तिच्याकडे पाहून म्हणाला, तसं तिने लाजून मान खाली घातली.
“वाव दादू, कसला भारी उखाणा घेतला तू! एकदम भारी,” समर आनंदाने किंचाळत म्हणाला.
सुधा पण कौतुकाने त्याच्याकडे पाहून हसल्या. आकाशने पण एक भुवई उडवत, त्याला ‘क्या बात चा’ इशारा केला. पण त्याची नजर आरूवर होती, जी लाजून खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती.
पहिल्यांदाच त्याने तिचं नाव घेतले… त्याचे शब्द तिच्या मनात तरंग उठवून गेले… काळीज जोरजोरात धडधडत होतं… उगाचच शहारून आल्यासारखं झालं तिला… काय होतंय? कसल्या या अनोळखी वाटणाऱ्या भावना?… तिच्या समजण्यापलीकडे होतं… पण तरीही हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या भावना! तिचं मन सुखावून गेलं… मनात उठणारे तरंग तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरवून गेले…
“आता वहिनी तुझी बरी… तुला तर येतच असतील ना उखाणे?” समर आरूला म्हणाला.
त्यावर आरूने हळूच मान वर करून समोर बघितलं… चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव होते…
“येत असतील म्हणजे काय, येतातच!” भावना समरच्या बोलण्याला तोडत म्हणाली.
“येत असतील काय, येत असतील? मला नाही येत उखाणा… मी कधी पाठ नाही केला… ” आरू जरा चिडून भावनाकडे पाहात मोठ्यानेच म्हणाली.
“आरे यार वहिनी, हे हे चुकीचं आहे, हां… मघाशी दादावर तर अशा हसत होता तुम्ही, जसे काय खूप सारे उखाणे येतात तुम्हाला… आणि आता नाही म्हणता?” समर.
“मी… मी.. ते… तर… त्यांना उखाणा म्हणजे काय ते माहीत नाही, म्हणून हसले. मला खरंच नाही येत उखाणा! ते तर आधी पाठ करायचे असतात आणि मी पाठ नाही केले,” ती बारीक तोंड करून म्हणाली. समरच्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं.
तो तर मस्करी करत होता, पण आपण मघाशी शिववर हसलो म्हणून त्यांनी टोमणा मारला, असं तिला वाटलं… आणि आजी पण त्यावरून बोलल्या होत्या. डोळे पण लगेच भरून आले तिचे…
“हे… हे वहिनी, मी मस्करी करत होता… तुम्ही रडू नका,” समर तिच्या डोळ्यांत पाणी पाहून लगेच म्हणाला.
“हं… पण मला खरंच येत नाही,” ती इवलंसं तोंड करून म्हणाली. सगळ्यांनाच तिची दया आली. मग शिव कसा गप्प बसेल!
“मॉम मी घेतला ना उखाणा? मग तिने घ्यायलाच हवा असं काही नाही ना! बास झालं आता, पटकन आवर,” शिव नाईलाजाने म्हणाला.
खरंतर त्यालाही ऐकायच होतं आपलं नाव तिच्या तोंडून! पण तिचा तो बारीक झालेला चेहरा पाहून त्यालाच वाईट वाटलं. खरंतर थकून गेली होती ती… निस्तेज झाला होता चेहरा तिचा… पण तरीही वैतागलेले भाव नव्हते चेहऱ्यावर तिच्या!
“बेटा, रीत असते ही… पण काही हरकत नाही, नंतर पूजेच्या वेळी पाठ करून ठेव हं,” सुधा तिला प्रेमाने समजावत म्हणाल्या आणि पुढे होऊन त्यांनी तिला हळद-कुंकू लावलं आणि शिवच्या कपाळी टिळा… दोघांच्या डोक्यावरून फुलं, तांदूळ टाकून दोघांना औक्षण केलं आणि सोबत हातात तांदळाचा कलश घेउन उभ्या मावशींनी तो कलश दरात ठेवला.
“आरू बेटा, हा कलश उजव्या पायाने दारातून आत ढकल आणि मग दोघे सोबत घरात प्रवेश करा…” सुधा यांनी सांगितले, तसे आरुने त्या कलशाला पायाने आत लोटलं आणि दोघे आत आले… पुढे कुंकवाच्या पाण्यात पाय देऊन आरूने लक्ष्मीच्या पावलांनी शिवच्या आयुष्यात आणि सरपोतदार घराण्यात पाऊल टाकलं..
दोघांनी आत आल्यावर आधी देवघरात देवाच दर्शन घेतलं. त्यानंतर आजोबांच्या फोटोसमोर आरूच्या हाताने दिवा लावून त्यांचे देखील आशीर्वाद घेतले…
लीला आजी सोफ्यावर बसलेल्या होत्या, दिनकरराव पण त्यांच्याशेजारी बसले होते.
शिव आणि आराधना त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. शिवने खाली वाकून आजीच्या पायाला स्पर्श केला, तसं आरूने पण खाली वाकून त्यांना नमस्कार केला.
“औक्षवंत हो… अष्टपुत्रा सौभाग्यवती भव…” आजीने दोघांना आशीर्वाद दिला, पण चेहरा मात्र निर्विकार होता त्यांचा. नातं आपल्या बरोबरीच्यात झालं नाही, त्यामुळे नाराजी होती आणि ती त्यांच्या कृतीतून त्या दाखवून देत होत्या.
सुधा आणि शिवने ‘नाही’ अशी मान हलवत, सुस्कारा सोडला. त्यानंतर शिव आईसमोर आला, “मॉम, अजून काही राहीलं आहे का? असेल तर आता सगळं राहू दे! आय एम व्हेरी टायर्ड…” त्याने दिनकररावांना सरळ सरळ इग्नोर केलं… आणि ते आरूने नोटीस केलं. तिला शिवचा पुन्हा राग आला, “यांना तर वडिलांचा मान पण ठेवता येत नाही… एवढं कोण वाईट वागू शकतं?” ती मनातच म्हणाली आणि त्याच्याकडे पाहून नाक मुरडतच ती दिनकररावांच्या पाया पडण्यासाठी त्यांच्यासमोर जाऊन खाली वाकली.
ती खाली वाकली तसं दिनकरराव मागे सरकून उठून उभे राहिले.
“असू दे. तुमची पावले घरात पडली आणि आमच्या मुलाने आम्हाला दुर्लक्षित करायला सुरुवात केली. संस्कारी असण्याची ढोंग करायची गरज नाही,” असं बोलून दिनकरराव आपल्या रूममध्ये निघून गेले. पण त्यांचं ऐकून शिवच्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या. तर, आरूच्या डोळ्यांत पाणी आलंच… आणि तिने भरल्या डोळ्यांनीच शिवकडे रागात पाहिलं. जणू डोळ्यांनीच सांगत होती, “याला तुम्हीच जबादार आहात.”
त्याने पण तिच्याकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्याने डोळे बंद करून राग आवरण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा डोळे उघडून तिच्याकडे पाहिले, पण तिने नजर फिरवून घेतली. भावनाने तिच्या शेजारी येत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला.
दिनकररावांच्या बोलण्याने आरू खूप दुखावली. मुळात ती खूप हळवी होती. आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही, याची ती काळजी घ्यायची.
तिच्यासोबत अशा कठोर शब्दांत कोणीच बोललं नव्हतं. तिने कधी ती वेळच येऊ दिली नव्हती… ती नेहमी सगळ्यांशी नम्रपणे वागायची. पण जिथे काही चुकीचं घडत असेल तर, गप्प देखील बसायची नाही. चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच वागणारी आरू…
सध्या तिच्या नजरेत शिव वाईट होता… त्याचे वडील आपल्या मुलाच्या वागण्यामुळे दुखावलेले होते… त्यामुळे त्यांचं बोलणं तिला चुकीचं वाटलं नाही… पण त्याच्या वागण्यामुळे तिच्यावर आरोप केला गेला होता!
तसं तर हे तिच्यासाठी नवीन नव्हतं… तिने गावातील इतर सूनांना, नवऱ्याची चूक असताना देखील बोलणी ऐकावी लागत असल्याचे पाहात आली होती. पण नव्या घरात प्रवेश केल्याबरोबर तिच्या वाट्याला असं काही येईल, याची तिने कल्पनाच केली नसेल. डोळ्यांतून पाणी वहायला लागलं होतं तिच्या… शेजारी ऊभी राहून भावना तिला धीर देत होती… तिच्यासाठी पण हे शॉकिंग होतं हे! मघाशी आजीचं ते कडवट बोलणं आणि आता दिनकररावांच बोलणं… हे सगळं पाहून आता तिला घरातल्या वातावरणाची चिंता वाटू लागली. कारण, आरू जास्त वेळ हे सगळं सहन करेल की नाही, याची तिला शाश्वती नव्हती. तिला माहीत होतं, अशा चुकीच्या गोष्टींवरून ती नेहमी मामी, म्हणजे आपल्या आई सोबत वाद घालायची… ती फक्त रामचं ऐकायची आणि शांत व्हायची.
पण सध्या आरूला फक्त रडायला येत होतं. तिला रडताना पाहून आकाश आणि समरला पण वाईट वाटलं. तर शिवच्या हाताच्या मुठी गच्च होत होत्या रागाने… तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या हृदयात वेदना उठवून जात होतं.
“शिव राग आवर…” सुधा त्याच्याजवळ येत, त्याच्या खांद्यावर हात ठेवत, त्याला डोळ्यांनीच शांत व्हायला सांगत होत्या.
“मॉमsss” त्याने आरूकडे पाहात मॉमला डोळ्यांनीच आरूला शांत करायला सांगितलं.
“हं… मी बघते…” असं म्हणूण त्या आरूकडे गेल्या.
“आरू बाळा शांत हो… ते जरा सध्या रागात आहेत म्हणून असं बोलून गेले. पण तू मनाला लावून नको घेऊस बेटा… आता बास रडायचं नाही. दिवसभर थकली असशील ना! रूममध्ये जा आणि फ्रेश हो,” सुधा तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत प्रेमाने म्हणाल्या.
आरू तर त्यांच्याकडे पाहातच राहिली. “अशी पण सासू असते…” तिला प्रश्नच पडला. “नाही, नवीन आहोत ना म्हणून असेल!” मनात असे अतरंगी विचार सुरू झाले. क्षणात प्रसंग बदलत होते आणि त्याबरोबर तिचे विचार…
“कमल, यांना घेऊन जा आणि रूम दाखव…” त्या घरात काम करणाऱ्या कमलला म्हणाल्या.
“हो, या वहिनीताई माझ्यासोबत,” कमल पुढे होत म्हणाली. तिचं ते ‘वहिनीताई’ ऐकून आरूला पुन्हा रडता रडता हसू आलं…
इकडे तिच्या चेहऱ्यावरची स्माइल पाहून शिवचा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि तो एकटक तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहू लागला.
कमलसोबत आरू आणि भावना जाऊ लागल्या. जाता जाता तिने शिवकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच पाहात होता… पण त्याच्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले आणि तिने रागात तोंड फिरवून घेतले… कमलच्या मागे निघून गेली.
शिव तर तिच्या या कृतीवर डोळे मोठे करून पाहातच राहिला. आकाशचं यांच्या या नजरेच्या खेळावर लक्ष गेलं, तसं तो शिवजवळ येऊन हसत म्हणाला, “तुला माहिती आहे शिव, या बायका ना, सगळ्या दुनियेच्या चुकांचं खापर बिचाऱ्या नवऱ्याच्या डोक्यावर फोडतात! खास करून गावाकडच्या मुली…” आकाश एकदम सीरियस असं काहीतरी सांगत असल्यासारखा म्हणाला.
“कायsss” शिवला तो काय म्हणाला ते कळलंच नाही.
“कळलं नाही? हं.. कळेल कळेल, लवकरच कळेल! एनीवे, हॅप्पी मॅरिड लाइफ शिवराज सरपोतदार… गडबडीत विश करायचं राहून गेलं होतं…” आकाश मिश्किल हसत म्हणाला आणि शिवला मिठी मारून पाठीवर थोपटत शुभेच्छा देऊन बाजूला झाला.
शिवकडे पाहून त्याचं खट्याळ हसणं सुरूच होतं…
“तुला नाही वाटत, तू जरा अति करतोयस? विसरू नकोस मी बॉस आहे तुझा… आणि आता पुन्हा तोच डायलॉग मारू नकोस…” शिव त्याच्यावर नजर रोखत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये गेला.
0000
इकडे राम आणि सियाचा आत्याच्या घरात गृहप्रवेश झाला होता… दोघांनी ही सगळ्यांच्या सांगण्यावरून एकमेकांची उखण्यात नावे घेतली होती… आणि आता घरातील देवाचं दर्शन घेऊन, मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन सिया रूममध्ये आली होती. तीही आज खूप थकली होती, पण तरीही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता… आरशासमोर बसून ती तिचा साज काढत होती… आज तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज झळकत होतं. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, त्याची ती संगिनी झाली होती!
हेही वाचा – लीला आजीचं बोलणं ऐकून आरू आणि शिव दोघेही चिडले
तिचा राम आयुष्याचा जोडीदार म्हणून तिचा कायमचा झाला होता… प्रेम, विरह पुन्हा एकत्र येणं, असा हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता… त्यासाठी तिला खूप काही सहन करावं लागलं होतं… आणि त्याचबरोबर घटस्पोटानंतर रामसोबत लग्न… ते तर खूप कठीण होतं, तिच्या मते अशक्यच! .. पण ते अशक्य शिवने शक्य करून दाखवलं… अर्थात, त्यासाठी त्याने काय केलंय याची कल्पना तिला अजिबात नव्हती. सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती ती… आणि आता तिला ती गोष्ट कोणी कळूही देणार नव्हतं, रामदेखील नाही!
जो की सध्या दारात उभा राहून तिलाच न्याहळण्याचं काम करत होता… तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिकून ठेवण्यासाठी जे काही घडलं, त्यातलं तो तिला काहीच कळू देणार नव्हता… यापुढे तिच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच भरणार होता तो…
लग्न झाल्यावर जो काही त्रास तिला सहन करावा लागला, तिच्यावर झालेला अन्याय, अत्याचार… शिवने रामला सगळं सांगितलं होतं.
एकूण काय तर इथून पुढे राम आणि सियाच्या आयुष्यात फक्त आणि फक्त प्रेमच असणार होतं!
सिया तिच्या केसातले गजरे काढून टेबलवर ठेवत होती, पण गजऱ्यात लावलेल्या काही पिना निघत नव्हत्या आणि त्यामुळे तिचे केस ओढले जात होते.
“आह… ही पूर्वी कुठे जाऊन बसली? हे निघत नाहीये… म्हणतं होते, नको इतके सारे गजरे लावू, पण ऐकेल ती पूर्वी कसली! किती त्रास…” ती वैतागून बोलत होती, तोच तिला तिच्या हातावर एक राकट हातचा स्पर्श झाला…


