काही वेळेस पदार्थ बिघडतो, काहीतरी कमी जास्त होते किंवा खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच काही टिप्स आपण आज पाहुयात –
- टोमॅटोचे नारळाच्या दुधातले सार करताना एक किलो टोमॅटो असतील तर, दीड वाटी ओले खोबरे घेऊन त्यात मुठभर सुके किसलेले खोबरे थोड्याशा पाण्यात भिजवून घालावे. नंतर हे सर्व खोबरे मिक्सरमधून काढून, पिळून त्या रसात एक वाटी साधे दूध आणि एक वाटी गोड ताक घालून नेहमीप्रमाणे सार करावे. त्यामुळे नारळाची बचत होतेच, शिवाय साराला छान चव येते.
- टोमॅटोचे सार करताना टोमॅटो चिरून मग उकडून घेण्यापेक्षा, टोमॅटोत सुरी किवा काटा चमचा घालून टोमॅटो गॅसवर धरल्यास अगदी पटकन साल सुटते. साल काढून मिक्सरमध्ये वाटून घेतल्यास अगदी थोडा चोथा उरतो आणि त्याचा गर जास्त होतो. गॅस आणि वेळ या दोन्हींची बचत होते.
हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना…
- भोपळ्याची सालासह भाजी करणे ही जीवनसत्वे राहण्यासाठी उत्तम पद्धत. पण सालासह भाजी म्हणून घरातल्यांना आवडत नसेल, तर भोपळ्याची साले किसणीवर किसून हा कीस भाजीत घालावा. यामुळे भाजी मिळून येते. सालीचा स्वाद मिळतो. खाणाऱ्याला समजतही नाही, की सालीचा किस आहे. सालही वाया जात नाही.
- स्वयंपाकात सत्वयुक्त पदार्थ करण्याला जितकं महत्त्व आहे, त्यापेक्षा पदार्थ दिसायला मनपसंत, सुंदर झाला पाहिजे, याकडे हल्ली जास्त लक्ष दिले जाते आणि म्हणून फळांच्या-फळभाजीच्या साली, ज्यात भरपूर सत्व असतं, अशा साली काढून टाकल्याने खऱ्या सत्वला मुकतात. त्याला उपाय – त्या दिवशी भाजी-आमटीला पाणी लागेल ते स्टीलच्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्या दिवशी काढलेल्या फळांच्या-भाजीच्या साली, देठ- जसे काकडी, दोडके, भोपळा यांच्या साली, वांग्याचे देठ, कोथिंबीर, पालक वगैरे पालेभाज्यांच्या जाड निबर काड्या, सर्व उकळून नंतर गाळून ते पाणी स्वयंपाकात वापरावे. पदार्थ सत्वयुक्त, रुचकर, स्वादिष्ट होतो.
- कारल्याची भाजी करताना थोडी तुरटी घालावी. कडूपणा कमी होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स
- गवार, दुधीभोपळा, शेवग्याच्या शेंगा या भाज्या शिजत असताना थोडे दूध घालावे. चव चांगली येते. त्याबरोबर थोडा ओवा, जिरे ठेचून घालावेत. दूध भाजीबरोबर शिजताना पनीर घातल्याची चव येते.
- कुठलीही रस्सा भाजी करताना कांदा बारीक चिरून घालण्यापेक्षा तो कांदा आणि सुके खोबरे एकत्र वाटावे. रस्सा करताना हे वाटण तेलात परतून घ्यावे. नंतर हळद, तिखट घालून पाणी घालावे. यामुळे खोबरे कमी लागते आणि रस्साही दाटसर होतो.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


