आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा, असं वाटे… पानं मोठी होत जाताना बघणं फार आनंदाचं वाटत होतं. अगदी गॅलरीतल्या कठड्याजवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…
एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली…
“अरे, म्हणजे आता चिंचा येणार!”
मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले… कोवळी नाजूक चिंच दिसली… हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेने मी बघत होते.
होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले. ते बघून मन मागे गेले… शाळेच्या दारात बसून चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या…
नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली. घरी कोणी आलं की, आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि कौतुकाने हे झाड दाखवायचं…
हेही वाचा – पावसाळा
एकदा मैत्रीण आणि तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली,
“अगं नीता, आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीत आम्ही अभ्यास केला. मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा झाडाखाली झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ… त्या झाडाची आठवण आली.”
विलक्षण प्रेमाने ती बोलत होती. झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता… निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…
झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या. एक मध्यम वयाचं जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.
“आम्हाला थोड्या चिंचा द्या, बाकी तुम्ही घेऊन जा,” म्हणून सांगितलं.
त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खूश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं… कवटाळलं… नमस्कार केला… देवाला करावा तसा!
मी बघत होते.
“फार झोडपलं झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा…” त्या म्हणाल्या. झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता! पुढे सांगत होत्या…
“आम्ही शेतकरी आहोत. भावकी सुरू झाली, छोटा तुकडा वाट्याला आला. मग शेती विकली, पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला…”
काय बोलावं मला पण काही सुचेना… डोळे भरून आले…
“बरं ताई, येतो आम्ही परत पुढच्या वर्षी,” असं म्हणून दोघं निघाले. निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं.
हाडाचे शेतकरी होते ते!
खारूताईचं चिंच खाणं बघत राहावं, असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मधे चिंच धरायच्या आणि खात बसायच्या… काही दिवसांनी लक्षात आलं की, झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे… मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले,
“पक्षांचा थवा इथून उडत जातो. त्यातले हे दोघे इथे येऊन बसतात. प्रेमात पडलेले असतील बहुतेक!”
ती बघायला लागली… म्हटलं, “चल ये आत… कॉफी करते.”
तर ती तिथेच उभी… लक्ष त्या पक्षांकडे… म्हणाली, “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात, हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी!”
पक्षांना बघून तिचं खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं… अशावेळी काही बोलू नये. शांतपणे मी आत आले. नंतर पण घरी आली की, गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…
का अजून काही आठवायची…?
हेही वाचा – ते दोघे…
या झाडाच्या तर मी प्रेमात पडले होते. री-डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाड दिसणार नाही म्हणून वाईट वाटत होते. दोन्ही नातवंड आली. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण ममत्व होतं… माझी दोन्ही नातवंडं वाळलेल्या चिंचा फोडायची, आतला चिंचोका काढायची, चिंच वाळवायची… सगळ्यांना चिंच वाटायची. हा उद्योग फार आनंदाने करायची.
नातवाला म्हटलं,
“आता खाली पार्किंग येणार, मग आपला फ्लॅट अजून वर जाणार. तेव्हा गॅलरीत हे झाड नसणार रे!”
तर तो म्हणाला, “अगं आजी, तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का?”
“अरे हो, खरंच की!”
त्याच्या बोलण्याने मन आनंदून गेलं.
निघताना झाडाचाही निरोप घेतला. त्याला सांगितलं, “भेटू काही वर्षांनी… मधून मधून येत जाईन रे तुला बघायला.”
वारा आला… फांद्या हलल्या… माझं मलाच छान वाटलं.
असा जीव जडला की, लांब जाताना त्रासच होतो… मग तो झाडावर जडलेला असला तरी!


