आता येत्या 12-15 दिवसांत श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यांत अनेकांचे, प्रामुख्याने महिलांचे उपासतपास सुरू होतील. भगर, आमटी, साबुदाणा वडे तसेच वेफर्स, फराळी चिवडा, शेंगदाणा आणि गुळाचे लाडू असे काही ना काही पदार्थ अनेक घरांत होतील. तरीही, संध्याकाळी सात वाजता, “आई भूक लागली, काहीतरी खायला कर…” हा पुकारा असतोच! वस्तुत:, वर्षातून दोन-तीन महत्त्वाचे उपास घरातील सर्वांनीच करायला हवेत, या मताची मी असल्याने सर्वांना उपवासाचे महत्त्व सांगून आषाढी आणि कार्तिक एकादशी, महाशिवरात्र असे दोन-तीन उपवास करायायला लावते. मग त्याकरिता मला थोडा त्रास झाला तरी चालतो.
उपवासाचे थालिपीठ करायचे असतील तर, त्यासाठी घरीच भाजणी तयार करते. आषाढी एकादशीला केप्र या कंपनीचे उपवासाच्या भाजणीचे पीठ वापरून थालिपीठ करायचे ठरवले, पण मिनी साईजमध्ये! काहीतरी वेगळे करावं म्हणून हा प्रकार केला. चवीला नेहमीप्रमाणेच! प्रमाणही तेच फक्त आकार बदलला आणि ते थालिपीठ दिसायला आकर्षक असल्यामुळे की, काय परंतु मुलांनीही मिनी थालिपीठ हा हा म्हणता फस्त केले.
हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?
साहित्य
- केप्र उपवासाचे भाजणीचे पीठ – एक पाकीट (अन्य कंपनीचेही वापरून पाहू शकता)
- हिरव्या मिरच्या – 4 (बारीक चिरलेल्या)
- लाल तिखट – 2 चमचे (चवीनुसार ठरवावे)
- मीठ – चवीनुसार
- शेंगदाण्याचे कूट – अर्धी वाटी
- जिरे – दोन टीस्पून
- सालं काढून किसलेले बटाटे – 2 (मध्यम आकाराचे)
- तेल – आवश्यकतेनुसार (थालीपीठ शेकण्याकरिता)
कृती
- भाजणीच्या पिठात हिरव्या मिरच्या, किसलेले बटाटे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे आणि शेंगदाण्याचे कूट घालून हे सर्व साहित्य छान मिक्स करावे.
- नंतर त्याचे अगदी लिंबाइतके गोळे करावे आणि नॅानस्टिकच्या मिनी साइज असलेल्या तव्यावर ही छोटी छोटी थालीपीठ दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घ्यावी.
- ही गरमागरम थालिपीठ शेंगदाण्याचा दह्यातील चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत अथवा लोणी असेल तर त्यासोबत खायला द्यावी.
हेही वाचा – Recipe : उपवासासाठी भगरचे पॅटीस अन् इडली
माझ्याकडे मिनीसाईजचे थालिपीठ, उत्तपम, दोसे, धिरडे होऊ शकतील असा चार खण असलेला हा नॅानस्टिकचा तवा आहे. एका वेळेस चार थालिपीठ झाल्यामुळे माझा वेळ वाचला आणि मी केलेला थालिपीठाच्या आकाराचा हा छोटासा बदलही सर्वांना आवडला. त्यामुळे केलेल्या कामाचे समाधानही मिळाले. कधीकधी अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला आनंद देऊन जाते नाही का!
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


