Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा
    ललित

    नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा

    Team AvaantarBy Team AvaantarDecember 3, 2025No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीआर्टिकल, नानांचे दुकान, नानांचा बंगला, नानांची बाग, मुग्धाने वाचवली बाग, मुग्धाचे आजोबाप्रेम, विवेकचे मनपरिवर्तन, प्रसादचे मनपरिवर्तन, अंकितचे मनपरिवर्तन
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दीपक तांबोळी

    भाग – 1

    माळी आल्याची चाहूल लागली तसे नाना मागच्या दरवाजाने बागेत शिरले. पेरूच्या झाडाकडे त्यांचं लक्ष गेलं. शेकडो पेरू तिथे लागले होते. शेजारच्या सीताफळाच्या झाडावर देखील बरीच सीताफळं लटकत होती. एकेका झाडाचं निरीक्षण करत ते आंब्याच्या झाडाजवळ आले. त्या उंच डेरेदार झाडावर त्यांनी मायेने हात फिरवला. उन्हाळ्यात याच झाडाला शेकडो कैऱ्या लागायच्या. लोणच्यासाठी कैरी आणायची कित्येक वर्षात कधी गरजच पडली नव्हती. नातेवाईक, मित्रांना कैऱ्या वाटून झाल्या की, आंबे पिकवले जायचे. नानांनी चिकू, डाळिंब, पपई यांच्या झाडावर नजर टाकली. कुठे काही किड लागली नसल्याची खात्री केली. मग ते भाज्यांकडे वळले. कांदे, बटाटे आणि काही भाज्या सोडल्या तर जवळजवळ सर्वच भाज्या या बागेत होत्या. त्याही सेंद्रीय खतावर वाढलेल्या. रासायनिक खतांचा वापर आयुष्यात नानांनी केला नव्हता. मागच्या दोन वर्षांपर्यंत बागेची काळजी नाना आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई घेत असतं. सावित्रीबाई गेल्या आणि तेव्हापासून नानांनी माळी लावून घेतला होता.

    मेन रोडला लागून असलेल्या सात हजार स्क्वेअरफूट प्लॉटमध्ये तीन हजार स्क्वेअरफूटाचा तीन मजली प्रशस्त बंगला होता. उरलेल्या चार हजार स्क्वेअर फूट जागेत नाना आणि सावित्रीबाईंनी ही बाग फुलवली होती. खूप काळजीने तिला पोटच्या मुलांसारखं जोपासलं होतं. रस्त्याने येणारा जाणारा प्रत्येकजण त्या हिरवाईने नटलेल्या बंगल्याकडे पाहून थबकायचा.

    पालक, मेथी, भेंडी चांगलीच तरारली होती. त्यांच्याकडे नजर टाकून नानांनी झाडांना पाणी देणाऱ्या माळ्याला हाक मारली. तो आल्यावर ते म्हणाले…

    “सदू ते गिलके, कारले, भोपळ्याचे वेल व्यवस्थित बांधून घे… घरात मेथी आणि भेंडी घेऊन जा. सुनबाईला भाजी करायला सांग.”

    “बरं. नाना ते गिलके, भोपळेही खूप लागलेत. काय करायचं त्यांचं?”

    “घरच्यासाठी काढून ठेव काही. काही तू घेऊन जा भाजीसाठी. बाकी उरलेले बाजारात विकून टाक…”

    “बरं!”

    नानांनी समाधानाची एक नजर बागेवर टाकली. पूजेसाठी चांदणी आणि जास्वंदाची फुलं तोडून ते घरात शिरले. नाना पूजेला बसले. मुलांना शाळेत पाठवायचं म्हणून दोन्ही मोठ्या सुना उठल्या होत्या. तिसऱ्या सुनेची मुलगी दुपारी शाळेत जायची, त्यामुळे तीन नंबरची सून अजून झोपलेलीच होती. तिन्ही मुलं तर कधीच नऊच्या आत उठायची नाहीत. त्यामुळे सकाळी सातच्या आत देवपूजा झालीच पाहिजे, असा नियम लावणाऱ्या नानांना स्वतःच पूजा करावी लागायची. तीन-तीन मुलं असताना पूजा आपल्याला करावी लागते याचा नानांना खूप राग यायचा. सावित्रीबाई असताना तो ते व्यक्तही करायचे; पण त्या गेल्या आणि नानांनी तोंडाला कुलूप लावून घेतलं. मुलंही इतकी बेशरम की, बापाला या जबाबदारीतून मुक्त करावं, असं त्यांना चुकूनही वाटायचं नाही. उलट नानांनी आता बिझनेसमध्ये लक्ष न देता देवदेव करत राहावं, असं त्यांचं म्हणणं असायचं.

    नानांची पूजा झाली. चहा घेऊन ते पेपर वाचत बसले. नऊ वाजता मुलं उठल्यावर नाश्ता झाला. साडेदहा वाजता दोन मुलांसोबत गाडीने ते दुकानात पोहचले. धाकटा मुलगा त्याच्या बायकोला बँकेत सोडून मग दुकानात येणार होता. रस्त्याने जाता जाता कपड्याची आधुनिक दुकानं पाहून आपल्या दुकानाचंही नूतनीकरण करायला हवं, याची नानांना जाणीव झाली. पण ते स्वतः काय करू शकणार होते? पाच-सहा वर्षांपासून त्यांनी दुकानातलं लक्ष कमी केलं होतं. वेगवेगळ्या यात्रांना जाणं, नातेवाईकांची लग्नं, मित्रमंडळीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावणं यात त्यांनी स्वतःला व्यग्र करुन टाकलं होतं.

    त्यांचंही बरोबर होतं. किती दिवस ते जबाबदाऱ्या पेलणार होते? सायकलीवर कपड्यांचे गठ्ठे बांधून घरोघरी विक्री करण्यापासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. मेहनत, सचोटी आणि कल्पकता या जोरावर त्यांनी प्रचंड प्रगती केली होती. दहा-बारा वर्षांतच कपड्यांच्या एका मोठ्या शो रुममध्ये त्यांचा व्यवसाय शिफ्ट झाला. पूर्ण जिल्ह्यात नानांच्या दुकानाएवढं मोठं आणि आलिशान दुकान नव्हतं. दिवाळी आणि लग्नसराईत तर इतकी झुंबड उडायची की, नानांना जेवायची सुद्धा फुरसत मिळायची नाही. या दुकानाच्या जोरावर नानांनी तो प्रशस्त बंगला बांधला होता. घरात तीन चारचाकी गाड्या आल्या.

    हेही वाचा – नावात काय आहे?

    मुलं मोठी झाली म्हणून त्यांच्या हाती नानांनी आपला व्यवसाय सोपवला आणि इथंच गडबड झाली. तसं सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण मुलांची लग्नं झाली आणि मुलांची नियत बदलली. मधल्या प्रसादचं सासर श्रीमंत होतं. वेळोवेळी त्याला सासरकडून आर्थिक मदत व्हायची. त्यातून तो होता नंबर एकचा आळशी! दुपारी तीन-चार तास झोपल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. घरी झोपू दिलं नाही की, तो दुकानात झोपायचा.

    धाकट्या अंकितची तर, बायकोच बँकेत नोकरीला होती, त्यामुळे दुकानाच्या उत्पन्नावर तो अवलंबून नव्हता. त्यातून साहेबांना वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा शौक! त्या शौकासाठी अंकित पंधरा-पंधरा दिवस दुकानाला दांडी मारून जंगलात भटकायचा. त्याचं हे बेजबाबदार वागणं दोघा भावांनाच काय नानांनादेखील आवडत नव्हतं. मात्र नाना त्याला काही बोलले की, त्याची बायको मधेच येऊन म्हणायची, “नाना तुमच्या पैशांनी नव्हते गेले ते. मी दिले होते त्यांना पैसे!” काही दिवसांनी नानांनी बोलणंच सोडलं.

    दोघा भावांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्याने थोरला विवेक हैराण झाला होता. आधीच तो रागीट स्वभावाचा  होता. थोड्याथोड्या गोष्टींनी हायपर व्हायचा. व्यवसाय करायचा तर जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असावा लागतो, ही गोष्ट तर त्याला माहीतच नव्हती. भावांनाही तो फटकळपणे काहीतरी बोलून बसायचा… “दोघं मजा मारत असताना मीच का दुकानाची जबाबदारी घ्यायची?” असं तो बायकोजवळ बोलायचा आणि एखाद्या लग्नकार्यासारखी संधी मिळाली की, दहा-पंधरा दिवस दुकानाचं तोंड बघायचा नाही. या सर्वांचा परीणाम साहजिकच दुकानातल्या कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि विक्रीवर झाला होता. सर्व्हिस चांगली मिळत नसल्याने दुकानाचे परमनंट ग्राहक दुसरीकडे वळाले होते. दुकानात जुना माल पडून होता. नवीन व्हरायटी येत नसल्याने तरुण वर्ग दुकानात येत नव्हता. आता दुकान चालू होतं ते फक्त नानांच्या पुण्याईवर! घर चालेल एवढंच उत्पन्न येत होतं. या प्रक्रियेत नानांनी घेऊन ठेवलेले तीन प्लॉटही खर्ची पडले होते.

    नाना कॅश काऊंटरवर बसून सगळीकडे नजर फिरवत होते. विवेक फुटकळ ग्राहकांना कपडे दाखवत होता. तर, प्रसाद वरच्या मजल्यावरच्या रेडिमेड गारमेंटच्या सेक्शनमध्ये मोबाइलवर गेम खेळताना सी.सी.टी.व्ही.वर दिसत होता. अंकीतचा अजून पत्ताच नव्हता. तुफान गर्दीचे दिवस नानांना आठवले आणि त्यांचं मन खंतावलं. ते दिवस परत येतील का, असा प्रश्न त्यांना पडत होता. आपल्यानंतर या मुलांचं कसं होणार, ही काळजी त्यांना सतावू लागली.

    “नाना बघा, हा अंकीत अजून आला नाही…” विवेकच्या बोलण्याने त्यांची तंद्री भंगली.

    “लाव फोन त्याला. विचार का येत नाहीये तो?”

    “मी लावला त्याला फोन… उचलत नाहीये तो!”

    नानांनी आपल्या मोबाइलवरून त्याला फोन लावला. बऱ्याच वेळाने त्यानं तो उचलला.

    “हो, येतोच आहे नाना. आपला डबेवाला आज येणार नाहीये. म्हणून मी स्वतःच डबा घेऊन येतोय.”

    “आज ठीक आहे, पण तुझं हे नेहमीचंच आहे अंकीत. अरे, कधी समजणार आहेस तू तुझी जबाबदारी?” नाना रागावून म्हणाले. क्षणभर शांतता पसरली. मग दुसऱ्या क्षणाला अंकीत म्हणाला,

    “नाना तिथं आलो की, बोलतो मी…” असं म्हणून त्यानं फोन ठेवला.

    “येतोय. आपला डबा घेऊन येतोय…” विवेककडे पहात नाना म्हणाले.

    “हो. त्याला तर रोज काहीतरी बहाणाच पाहिजे. नाना एक दिवस सोक्षमोक्ष लावून टाका बरं एकदाचा! मला आजकाल हे सहन होत नाहीये…”

    “घरी गेल्यावर बोलू विवेक. दुकानात तमाशे नको!”

    विवेक चूप बसला, पण त्याच्या मनात राग धुमसत होताच. अंकीत डबा घेऊन आला तेव्हा विवेक दोन ग्राहकांना सांभाळत होता.

    “डबा ठेव आणि गिऱ्हाईकांकडे बघ…” नानांनी हुकूम सोडला.

    अंकीत तिकडे गेला.

    दुपारी दोन वाजता प्रसाद खाली आला.

    “नाना, मी घरी जाऊ जेवायला?” त्याने विचारलं.

    “कमाल करतोस. तुझा डबा आणलाय. तू आणि विवेक बसून घ्या. मी आणि अंकीत बघतो गिऱ्हाईकांकडे…”

    ” मला नाही आवडत दुकानात जेवायला! नाना सकाळपासून एकही कस्टमर नाहीये वरती आणि संध्याकाळपर्यंत येईल, असं वाटत नाही…”

    “तू घरी गेलास की, चारपाच तास झोपूनच येशील. काही जायचं नाही,” विवेक रागाने म्हणाला. प्रसादनेही त्याच्याकडे रागाने पाहिलं.

    “प्रसाद, आज आठेवडेबाजाराचा दिवस. गिऱ्हाईक केव्हा येईल ते सांगता येत नाही. आज राहू दे…” नाना कठोर आवाजात म्हणाले. प्रसाद तणतणत वर गेला. तिघा मुलांमधला तणाव नानांच्या लक्षात आला. आज रात्री भांडणं तर, होणार नाही ना? अशी भीती त्यांना वाटून गेली.

    रात्री नऊ वाजता दुकान बंद करून सगळे परतले आणि टीव्हीवरचा कार्यक्रम बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून ठिणगी पडली. वादाला तोंड फुटलं… आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. नाना आपल्या रूममध्ये बसून सगळं ऐकत होते. मुलांच्या भांडणात पडायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण आवाज वाढू लागले आणि मग प्रसादचा मुलगा त्यांना बोलवायला आला, तेव्हा त्यांना जावंच लागलं!

    हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा

    “नाना, या विवेकदादाची दादागिरी फार वाढलीये. जेव्हा बघावं तेव्हा आम्हाला बोलत असतो. खूप झालं… आम्ही आता सहन करणार नाही. नाना ते दुकान विकून टाका बरं! आम्ही वेगवेगळे बिझनेस करू, नाहीतर नोकऱ्या करू… पण आता त्या दुकानात जाणार नाही. नकोच ती कटकट…” अंकीत तावातावाने म्हणाला. नानांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

    “वा फार छान! सल्ला देतोहेस तू?” नाना भरल्या डोळ्यांनी बोलू लागले, “अरे, ज्या दुकानाला उभं करण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं. ज्या दुकानाच्या कमाईवर एवढा मोठा बंगला उभा राहिला. घरात एवढ्या सुखसोयी आल्या. चारचाकी गाड्या झाल्या. ज्याच्या बळावर तुम्ही एवढे मोठे झालात. त्या दुकानाला विकून टाकायचं? का तर तुम्हाला धंदा चालवता येत नाही म्हणून! हे तर सोन्याचं अंडं देणारी कोंबडी विकून टाकण्यासारखं झालं!”

    “सध्या ती कोंबडी अंडही देत नाहीये नाना!” प्रसाद फटकून म्हणाला.

    “याचं कारण तुम्ही नालायक आहात…” नाना गरजले, “अरे, अख्ख्या जिल्ह्यात एक नंबरवर होतं आपलं दुकान. तुम्ही बेजबाबदारीने रसातळाला नेलं.”

    क्षणभर कोणीच काही बोललं नाही, कारण नाना खरंच बोलत होते.

    “मी जिवंत असेपर्यंत तरी ते दुकान मी विकू देणार नाही. तुम्हाला दुसरे धंदे करायचे असतील तर, त्यासाठी तुम्ही मोकळे आहात… पण माझ्याकडून एक रुपयाच्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका…”

    तिघं भाऊ चूप बसले, कारण वेगळा व्यवसाय सुरू करून तो यशस्वी करण्याची एकातही धमक नव्हती.

    नाना जायला वळाले… अचानक काहीतरी आठवून म्हणाले, “…आणि हो आता तुमचे वेगळे निघण्याचे बेत शिजू लागतील. बिनधास्त वेगळे व्हा… पण लक्षात ठेवा वेगळा होणाऱ्याला माझ्या प्रॉपर्टीतला एक छदामही देणार नाही!”

    नानांनी पाचर मारली… तिघं भाऊ आणि त्यांच्या बायकांच्या मनात धडकी भरली. आता नाईलाजाने दुकान चालवणं आणि एकत्र रहाणं भाग पडणार होतं!

    दोन दिवसांनी नाना वीस दिवसांकरिता चारधाम यात्रेला निघून गेले. नाना असे गेले की, तिन्ही भावांच्या बायका खूश होऊन जायच्या. किचन एकच असलं तरी, तिघी वेगवेगळा स्वयंपाक करायच्या. तिघांची कुटुंब वेगवेगळ्या वेळी जेवणं करायची. अंकितची बायको नोकरी करत असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचं संध्याकाळचं जेवण सहसा बाहेर हॉटेलमध्येच व्हायचं. बच्चे कंपनी मात्र नाराज असायची. नाना रोज संध्याकाळी त्यांना घरच्या बागेत घेऊन जात. खेळणं झालं की, त्यांना गोष्टी सांगत… कधी झाडांची, पक्ष्यांची, पर्यावरणाची माहिती देत. नानांमुळे मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण झाली होती. नानांच्या अनुपस्थितीत संध्याकाळी झाडांना पाणी द्यायचं काम ही मुलंच करत. विवेकची बारा वर्षांची मुलगी मुग्धा या सगळ्यांची ताई होती. नाना असे बाहेरगावी गेले की, मुलांना टीव्ही पाहू न देता बागेत खेळवण्याचं अवघड काम मुग्धाच करायची. घरातल्या बायकांच्या टीव्ही सीरियल्स संध्याकाळी सुरू व्हायच्या त्या रात्री साडेनऊपर्यंत चालायच्या. रात्री पुरुष मंडळी घरी आली की, सीरियल्स बंद होऊन न्यूज चॅनेल्स सुरू होत. ही लहान मुलं कधीही त्यांना डिस्टर्ब करत नसत. मुळात त्यांना टीव्ही बघणंच आवडत नव्हतं आणि त्यामागे नानांचे संस्कार होते. आजोबा नसले की, ही मुलं उदास व्हायची. रात्री झोपण्यापूर्वी फोनवर का होईना शाळेत, घरात घडलेल्या घडामोडी आजोबांना सांगितल्याशिवाय त्यांना रहावत नसे.

    क्रमश:


    मोबाइल – 9209763049

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Most Popular

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.