माधवी जोशी माहुलकर
भाद्रपदेचा महिना आला…
आम्हा मुलींना आनंद झाला…
पार्वती म्हणे शंकराला,
चला हो माझ्या माहेरला,
माहेरी गेल्यावर पाट बसायला,
फुगड्या खेळू, गाणी गाऊ
प्रसाद घेऊन घरी जाऊ…
व्रत वैकल्याचा सोवळा श्रावण संपला की, भाद्रपद महिना लागतो. हा महिना सुरु झाला की, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे. हरतालिका झाली की, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. त्याला आवडणारे विविध प्रकारचे मोदक, लाडू, करंज्या अशा विविध प्रसादांची दहा दिवस रेलचेल असते. त्या प्रसन्न आणि उल्हासित अशा वातावरणात षोडशोपचारे पूजा करून मंत्रोच्चाराच्या खणखणीत स्वरात ‘मंगलमूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा सर्वांचा लाडका ‘बाप्पा’ दीड दिवसांपासून दहा दिवसांच्या मुक्कामाने घराघरांत विराजमान होतो आणि सगळीकडचे वातावरण हर्षोल्हासित करतो.
‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा… बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे… चरणी ठेवितो माथा..’ हे प्रल्हाद शिंदेंनी गायलेले गाणे सगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या लाऊड स्पिकरवर दणदणीत आवाजात ऐकायला मिळतं. सकाळ-संध्याकाळ घराघरातून तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपातून रामदास स्वामींनी रचलेली आणि लता दिदींनी गायलेली अजरामर आरती ‘सुखकर्ता दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची नुरवी…’ ही आरती टाळ, चिपळ्या, मृदंग आणि घंटांच्या नादात कानावर पडते… आणि या गणरायासमोर आपण सगळे नतमस्तक होतो. ‘घालीन लोटांगण…’ म्हणताना अक्षरशः सर्वच तल्लीन होतात आणि टाळांचा गजर अजुनच वाढतो. त्यानंतर खालच्या पट्टीतील धीरगंभीर आवाजात म्हटली जाणारी ‘मंत्र पुष्पांजली’ ऐकली की, गणपती बाप्पा खरचं प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे पाहात असल्याचा भास होतो आणि नकळत आपण आपल्या चिंता विसरून जातो आणि तो आपले जगणे सुखकारक करेलच, या विचाराने आश्वस्त होतो.
‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली की, तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार असते. त्याकरिता घरातील स्त्रियांची लगबग सुरू होते. महालक्ष्मीच्या स्थापनेत काही कमी पडायला नको म्हणून अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी आठवून आठवून केल्या जातात. ज्यांच्या घरी महालक्ष्मी नाहीत, त्या माहेरवाशिणी आपल्या माहेरी आलेल्या असतात. आपल्या भाचरांसोबत, बहीण-भावांसोबत गप्पागोष्टींमधे रमतात. नातेवाईकांनी घर भरून जातं. त्यांच्या गप्पागोष्टींमधे, हसण्या खिदळण्यामुळे घर आनंदाने न्हाऊन निघते.
हेही वाचा – मनाचिये गुंती…
गणेशोत्सवात महालक्ष्मींच्या आगमनाचे वेध लागले असतात. लाडू, करंजा, साटोऱ्या, अनारसे, सांजोऱ्या, पापड्या यांच्या सुवासाने घर पुन्हा एकदा दरवळलायला लागतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील स्त्रिया न्हाऊनमाखून तयार होतात आणि मुहूर्तावर या ज्येष्ठा कनिष्ठांना आवाहन केले जाते. त्यांची स्थापना करण्यासाठी मखरं, झुंबर, तोरणे आधीच सजवून तयार असतात. घराच्या समोर रांगोळ्या काढलेल्या असतात. अशी त्यांच्या आगमनाची तयारी झाली की, महालक्ष्म्यांच्या मुखवट्यांचे दारामधे औक्षण करून त्यांना सगळं घर दाखवले जाते. नंतर त्यांच्या स्थापनेची तयारी केली जाते.
गृहिणींची खरी परीक्षा सुरू होते ती महालक्ष्म्यांना साड्या नेसवताना! ज्येष्ठा आपली समजूतदारपणे पटकन साडी नेसवून घेते. मोठीच ती… समजूतदारपणा तिनेच दाखवायचा असतो. कनिष्ठा मात्र थोडी हट्टी… लहान असल्याने तिचे सगळे हट्ट लक्षात ठेवून पुरवावे लागतात. हट्ट जर पुरवले गेले नाहीत तर, खरचं ती हट्टाला पेटते आणि लवकर आवरतं घेत नाही! कधी साडी नीट बसत नाही तर, कधी पदर, कधी तिची मानच तिरपी होते तर, कधी खाली झुकते… नाहीतर एकदम वर, ताठ होते. तिला मग नमस्कार करून काही चुकलं असेल तर माफ कर म्हणावं लागतं… तेव्हा घरातील एखादी आजी आठवण करुन देते, “अगं औक्षण केलं तेव्हा तिच्यापुढे साखर ठेवली होती का?” जणू त्या आजीच्या मुखातून तीच आज्ञा देत असते…. मग सगळ्यांना एकदम लक्षात येत की, ‘अरे खरंच, साखरेची वाटी तिच्या पुढ्यात ठेवायला विसरलोच की आपण!’ मग पटकन साखरेची वाटी तिच्यासमोर ठेवून नाक घासले जाते. त्या छोट्याशा कृतीने ती कनिष्ठा प्रसन्न होते आणि लगेच दहा मिनिटांतच तयार होते. या सगळ्या जरी आपल्या मनाच्या समजुती असल्या तरी, हे सर्व पाहिलं की, अचंबित व्हायला होतं!
महालक्ष्मींची स्थापना केल्यानंतर ही जगद्जननी प्रसन्न झाली पाहिजे म्हणून तिची मनोभावे आराधना केली जाते. घरातील आयाबाया तिचा फुलोरा करण्यात मग्न होतात. महालक्ष्म्यांचे मुखवटे अगदी आनंदाने प्रसन्न दिसतात. दुसऱ्या दिवशी या महालक्ष्म्यांना पुरणावरणाचा सोवळ्यात केलेला नैवेद्य दाखवला जातो. परिचयाचे पाचपन्नास लोक जेवायला घरी बोलावले जातात. सवाष्ण, ब्राह्मण यांच्यासह पंगतीवर पंगती उठतात. यामध्ये महालक्ष्म्यांचा मुख्य प्रसाद जो आंबील असतो, त्यामधे टाकलेली सुपारी कोणत्या नशीबवान माणसाला मिळते, ते बघायला सगळे उत्सुक असतात. या सगळ्या सोहळ्यामुळे ते घर आणि घरातील सर्व सदस्य समाधानी दिसतात.
अशा या अडीच दिवसाच्या माहेरवाशिणी तिसऱ्या दिवशी हळदीकुंकू आटोपले की, त्या नांदत्या घराला भक्कम आशीर्वाद देऊन आपल्या घरी जाण्याची तयारी करतात. त्या दिवशी त्यांचे चेहरे थोडे मलूल दिसतात. हीपण आपल्या मनाची समजूत बरं का? कारण जसा भाव तसा देव दिसतो…
हेही वाचा – गणपती तू गुणपती तू…
महालक्ष्मीचे विसर्जन आटोपले की, अनेक घरांमध्ये गणपती बाप्पा देखील आपला मुक्काम हलवण्याचे ठरवतात. चारचं दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला गणरायाचा मुक्काम हलतो आणि गणेशभक्त साश्रू नयनांनी आपल्या बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागतात. दहा दिवस हर्षोउल्हासित वातावरणात गेल्यावर भरल्या अंतःकरणाने ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा प्रेमळ आग्रह करत गणरायाला निरोप दिला जातो.
त्या दहा दिवसांत आपण त्या परमात्म्याशी इतके एकरुप झालेले असतो की, तो गणपती आपल्यातलाच एक वाटायला लागतो. जिथे चित्तवृत्ती प्रसन्न असतात, तिथे देवाचा अधिवास असतो. त्या दहा दिवसात आपल्याला ही प्रचिती आलेली असते आणि म्हणून ते दहा दिवस आपल्याला मंतरलेले वाटतात. त्याचा प्रभाव कमी होत गेल्यावर आपल्याला एकदम कसे रिकामे रिकामे वाटते, कशाची तरी कमतरता वाटते… आणि मग आपला प्रवास पुन्हा याच मंतरलेल्या दिवसांच्या प्रतीक्षेत पुढे सरकतो… हीच आपली शिदोरी असते!