“डॉक्टर, आईशपथ खरं सांगतोय…” समोर बसलेला तरुण पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होता आणि त्याच्या डोळ्यांत भीती होती, पण चेहऱ्यावर आत्मविश्वासही होता. त्याच्यासोबत आलेले नातेवाईक मात्र हळूच कानात म्हणाले, “डॉक्टर, याच्यावर विश्वास ठेवू नका. हा इतका सराईत खोटं बोलतो की, त्याला स्वतःलाही खरं वाटू लागतं.”
सहा महिन्यांपासून व्यसनमुक्त झाल्यानंतर “काल यानं पुन्हा पार्टी केली,” असा नातलगांचा आरोप होता, तर “पार्टी केली, पण मी प्यालो नाही,” असा त्याचा दावा होता.
मी त्याला म्हणालो, “चल, आपण तुझं ‘युरिन’ चेक करूया, ना तू बोलेगा, ना मैं… बोलेगी तेरी पेशाब!” असं म्हटलं तर पठ्ठ्याचा चेहराच पडला!
क्षणभर मला प्रश्न पडला, “माणूस खोटं बोलतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं का? किंवा एखादं इंजेक्शन दिलं, अन् तो आपोआप सत्य बोलू लागला तर?”
हेही वाचा – आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!
अर्थातच, हा प्रश्न नवीन नाही. याच प्रश्नाचं उत्तर शोधताना जवळपास शंभर वर्षांपूर्वी एका डॉक्टरनं संपूर्ण जगाला थक्क केलं होतं.
अमेरिकास्थित टेक्सासमधील हा डॉक्टर प्रसूतीदरम्यान महिलांना ‘स्कोपोलामाईन’ हे औषध दिल्यानंतर एका गोष्टीची टेस्ट घेत होता… औषधामुळं त्या अर्ध्या शुद्धीत असत. जे काही विचारलं जायचं, त्याला त्या सहज उत्तर देत. त्यावरून या डॉक्टरने एक धाडसी निष्कर्ष काढला, “या अवस्थेत माणूस खोटं बोलू शकत नाही.” आणि जन्म झाला ‘ट्रुथ सिरम’चा! या डॉक्टरचे नाव होते डॉक्टर रॉबर्ट हाऊस.
1924पासून टेक्सासमधील काही तपास यंत्रणांनी संशयितांना स्कोपोलामाईन देऊन चौकशी सुरू केली. त्याच्या जगभरात बातम्या झाल्या… लोकांना वाटलं, “आता गुन्हेगारांचं काही खरं नाही..”
पण विज्ञानाला लोकप्रिय कथा मान्य नसतात, काही वर्षांनी वास्तव समोर आलं स्कोपोलामाईन घेतलेल्या व्यक्ती खोटं बोलत नव्हत्या, पण त्या जे मनात येईल ते बोलत होत्या!
स्वप्न… कल्पना… भ्रम… आठवणी आणि वास्तव… सगळंच एकमेकांत मिसळत होतं म्हणजेच पसरट बोलणं म्हणजे खरं बोलणं नव्हे!
1950च्या दशकात अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनीही अशा औषधांवर संशोधन केलं निष्कर्ष तोच – “कोणतंही औषध माणसाकडून हमखास सत्य वदवू शकत नाही.”
आज न्यायालयात अशा औषधांखाली दिलेली कबुली विश्वासार्ह पुरावा मानली जात नाही. चित्रपटात दाखवतात – एखादं इंजेक्शन देऊन “सगळं खरं बाहेर येतं…” पण असं प्रत्यक्ष आयुष्यात होत नाही. आज घडीला तपास अनेक वैज्ञानिक पद्धतींच्या एकत्रित वापरावर आधारित असतो.
आता ‘पॉलिग्राफ टेस्ट’ अर्थात ‘लाय डिटेक्टर’ चाचणी लोकप्रिय आहे, पण ती खोटं पकडत नाही, ती मोजते हृदयगती – रक्तदाब – श्वसन – घाम…
खोटं बोलताना काही व्यक्तींमध्ये ताण वाढू शकतो. पण प्रत्येक ताण म्हणजे खोटं नसतं आणि प्रत्येक खोटारडा ताण अनुभवेलच, असंही नाही म्हणूनच पॉलिग्राफ हा अंतिम पुरावा मानला जात नाही..
हेही वाचा – ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!
मध्यंतरी तेलगी प्रकरणात भारतात ब्रेन मॅपिंग आणि नार्को-विश्लेषण याबद्दल मोठी चर्चा झाली. यात औषधांच्या प्रभावाखाली प्रश्न विचारले जात… परंतु न्यायवैद्यक आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांनी स्पष्ट केलं – अशा अवस्थेतील उत्तरांची सत्यता निश्चित नसते.
भारतातही व्यक्तीच्या संमतीशिवाय अशा चाचण्या घेण्यास परवानगी नाही आणि त्या स्वतःपुरत्या निर्णायक पुरावा मानल्या जात नाहीत..
अनुभवी तपास अधिकारी अनेकदा प्रश्नांपेक्षा, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवर भर देतात. घटनाक्रम पुन्हा सांगायला लावणं, वेगवेगळ्या क्रमाने विचारणं, विसंगती शोधणं (जसं दृश्यममधलं फॅमिली इंटरॉगेशन) अन् हे अनेकदा औषधांपेक्षा प्रभावी ठरतं!
डॉक्टर म्हणून मला प्रकर्षानं जाणवतं, ते म्हणजे ओपीडीत अनेकदा रुग्ण म्हणतो, “डॉक्टर,मी औषधं नियमित घेतो.”
दोन मिनिटांनी त्याची पत्नी सांगते, “डॉक्टर, तीन दिवसांनी आठवलं तर घेतात.”
दोघंही खोटं बोलत असतात असं नाही, पण दोघंही आपापल्या आठवणींनुसार खरं सांगत असतात म्हणूनच वैद्यकशास्त्राने एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे तो म्हणजे, “स्मृती आणि सत्य या नेहमीच समानार्थी नसतात…”
रॉबर्ट हाऊसचं स्वप्न मोहक होतं… “एक इंजेक्शन आणि ये बाहर निकली सच्चाई”! पण विज्ञानानं पुन्हा एकदा नम्रपणे सांगितलं, “सत्याला शॉर्टकट नसतो”. आज सत्य शोधण्यासाठी औषधांपेक्षा जास्त विश्वास ठेवला जातो, पुराव्यावर, विज्ञानावर, तर्कावर आणि निष्पक्ष तपासावर! कारण माणूस कधी कधी खोटं बोलतो, कधी आठवण चुकते, कधी भीती बोलते, कधी भ्रम बोलतो… पण पुरावे, विज्ञान आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण यांची भाषा मात्र वेगळी असते.. आणि म्हणूनच आधुनिक न्यायव्यवस्थेचा खरा ‘ट्रुथ सिरम’ एखाद्या कुपीत नसतो तो असतो विज्ञान, फॉरेन्सिक पुरावे आणि चिकित्सक विचारसरणी यांच्यात!


